बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

नियती....

*

केव्हा पासून मी असा वेड्यासारखा पळत आहे, किती दिवस.. किती महिने.. किती वर्ष झाली.. खोल दरीतून डोंगर माथ्यापर्यंत... माथ्यावरुन खाली पायथ्यापर्यंत... रानातून.. जंगलातून.. रणरणत्या उन्हातून असाच सुसाट वेड्या सारखा पळत आहे मी.. ना थकलो.. ना हरलो. का ? कश्यासाठी... माझं गाव तर केव्हाच मागे राहिले तरी देखील मी असा हा वेड्यासारखा धावत आहे... मला ते हवे आहे ते... जे समोर उंच डोगरावर दिसत आहे... जे चमकत आहे तेच तेच ते हवे आहे मला. किती ही कष्ट करायला लागू दे मला ते हवेच आहे.. अरे हे कोण माझी वाट अडवून उभे आहे... जाउ द्या हो मला का उगाच माझी वाट अडवत आहात तुम्ही... मला ते हवे आहे... जाऊ द्या..

*

अरे थांब रे, किती धावशील जरा थांब. मी किती वेळा तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तु थांबतच नाही आहेस, शेवटी मलाच तुझ्या समोर यावे लागले, मी कोण आहे ? मी मी आहे.. मीच तो विश्वकर्मा... परमेश्वर... तुझा देव व मीच तो निसर्ग आहे ! सर्वकाही असलेला मीच तो सर्वशक्तीमान आहे. पण तु सांग मला तु एवढा जीव तोडून पळत का आहेस.. कुठे लागले खरचडले.. अगणित जख्मा झाल्या आहेत तुझ्या शरिरावर.. तु किती जणांना जखमा देऊ इथवर पोहचला आहेस.. पण का जेवढा पळत आहेस ? अरे ती प्रत्येक चमकती वस्तु तुझ्यासाठी नाही आहे रे, का धावतो आहेस जीव तोडून. तुझ्या नियती मध्ये जे लिहले आहे मी तेच तुला भेटणार आहे, जरा थांब, मागे वळून तरी बघ.

*

अरे असाल तुम्ही सर्वशक्तीमान परमेश्वर ! पण हे जे मी मिळवत आलो आहे हे मी मिळवलं आहे.. माझं रक्त जाळलं आहे मी इंथवर पोहचायला स्वतः स्वतः कष्ट केले आहे, व जे समोर दिसत आहे ना ते देखील मी मिळवणारच तुम्ही कोण मला अडवणारे ? तुमची कधी मदत घेतली मी इथवर पोहचायला ? कधी अपेक्षा तरी केली का मी तुमच्या मदतीची ? तरी ही इथ पर्यंत पोहचलोच ना. माझे लक्ष्य मी ठरवलं व मी मीळवलं ह्यात तुमचा काय संबध ? का अडवत आहात माझी वाट तुम्ही.. जाऊ द्या मला.

*

थांब, थांब. ठीक आहे रे तुला वाटत आहे ना सर्व तुच मिळवलंस.. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर.. बुध्दीच्या जोरावर ? पण जे तुला मिळालं ते तुलाच का मिळाले इतरांना का नाही मिळालं ? व जे इतरांना मिळाले ते तुला का नाही मिळालं ? ह्याचा कधी विचार केला आहेस ? कधी करणार तु विचार तु तर फक्त पळतो आहेस.. जरा बघ पाहू तुला काय काय मिळालं ? तुला जे जे भेटलं ते सर्व अप्रतिमच होते ना ? तरी ही तु नव नव्या वस्तुचा हव्यास ठेवत गेला व पळत राहिला... व एक एक वस्तु तु जी मिळवत गेलास त्या जागी आपली एक एक वस्तू सोडत आलास तु ? प्रत्येक नव्या वस्तू साठी तु जुनी वस्तू टाकतच आला आहेस रे. मगं असे कसे म्हणतो आहेस की सर्वकाही तुच मिळवलं आहेस... व तुझ्याकडेच आहे. अरे मुर्खा तुझी झोळी रिकामीच राहिली रे तु फक्त नव्याचा हव्यास धरला आहेस व सुसाट पळत सुटलास ह्यालाच नियती म्हणतात रे.. जे मागे राहीले ते सोड आता पण कमीत कमी जे आहे तुझ्याजवळ ते तर संभाळ रे.

*

माझं काय चुकलं ? तुम्हीच माझी नियती लिहलीत अशी जगावेगळी त्याला मी काय करु ? माझी काय चूक ? मला जे हवे ते कधीच मिळू दिले नाही साधा प्रयत्न जरी केला तरी अडथळांचा डोंगर उभा केला तुम्ही माझ्यासमोर.. तरी ही मी जिद्दीने सर्व अडथळे पुर्ण करत गेलोच ना.. पण तुम्ही परत माझ्याबरोबर खेळी केली.. माझी झोळी फाटकीच ठेवली तुम्ही.. असू दे माझी झोळी फाटली.. मी प्रयत्न करणारच. मी पण पाहू इच्छीत आहे माझी जिद्द मोठी की तुमची नियती.. मी भांडणार आहे तुमच्याशी .. तुम्ही लिहलेल्या नियतीशी ! बंडखोर आहे मी.. समजा बंड केले आहे मी तुमच्या विरुध्द .. माझ्या नियती विरुध्द ! पाहू कोण मला थोपवतं.. जेव्हा जेव्हा मदती साठी आजूबाजुला पाहीले तर दुर दुर पर्यंत तुम्ही कोठेच नव्हता.. धडपडलो.. पडलो.. तरी ही स्वतःच उभा राहीलो.. जेथे रस्ता नव्हता तेथे मार्ग मी शोधला.. रक्ताचे पाणी करत मी येथेवर पोहचलो व आता अचानक तुम्ही समोर उभे राहता व म्हणता थांब ? का ? का मी थांबावे ?

*

अरे नियम आहे रे हा.. निसर्गाचा नियम आहे, तु ज्या वस्तुच्या मागे धावत आहेस ती तुझ्या नियती मध्येच नाही आहे म्हणून मी तुला थोपवत आहे.. तुझे कष्ट वाचवत आहे.. तु जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे मान्य.. पण शेवटी जर तुला ती वस्तु मीळालीच नाही तर ? तुझ्यासमोर जे शुन्य उभे राहील त्याचे काय ? ज्या वस्तु साथी तु आपला श्वास विसरुन कष्ट करत आहेस तीच मिळाली नाही तर तुझे श्वास तरी तुझी साथ देतील काय रे ? आपली हद्द ओळख रे.. केव्हा पासून तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे हद्द ओळख.. जर नियती करण्यावर आली तर असल्याचे नसले होऊन जाईल... तुझ्या हातातील हिरे माणिक मोती.. मातीमोल होऊन जातील व तु काहीच करु शकणार नाहीस... असाच उभा राहशील ह्या दगडा सारख ! जरा थांब.. व मागे वळून तरी बघ.. तुझी हद्द तर तु नाहि ना सोडून आलास मागे ?

*

माझी हद्द मी ठरवणार आहे ह्यावेळी.. खुप झाले तुमचे व तुमच्या नियतीचे.. प्रत्येक वेळी मीच का हार मानावी ? मला काही हवे तर लगेच म्हणे आपली हद्द ओळख.. मला नाही माहीत माझी हद्द काय आहे.. व राहिला श्वासांचा प्रश्न तर माझ्या ध्येयासाठी मी ते पण त्यागेन.. पण मी प्रयत्न करणारच भले सर्व काही मातीमोल होवो.. पण हा शेवटाचा प्रयत्न मी करणारच... असेच जर नियती नियती करुन थांबू लागलो तर माझ्यातला मीच हरवेल व मीच हरवलो तर मग ध्येय काय कामाचे व काय कामाचे हे हिरे मोती माणिक ? तेव्हा रस्ता सोडा.. मी पुढे जाणारच आहे.. हार तर हार पण ती हार वीरासारखी छातीवर छेलणार आहे... पण नियती विरुध्द एकदातरी बंड करुन पाहणार आहे....

*

३ टिप्पण्या:

साळसूद पाचोळा म्हणाले...

मस्तच रे ...लिखान वेगवान वाटले...
keep it up...

क्रांति म्हणाले...

khoop chhan. niyatishi samna karnyatch ayushyach sarthak ahe.

vinod म्हणाले...

खूप खूप छान अप्रतिम लिहिले आहेस ...वाचून डोके एकदम फ्रेश झाले,,,खरच सुंदर जितके बोलेले तितके कमीच आहे ,,,