सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

माझं कोल्हापुर - भाग १

एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल.

कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला.

रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.

तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार.

आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.

त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत.

शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.

पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.

मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: