शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

दुनियादारी - माझ्या नजरेने !

दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले. माझी एक वाईट सवय आहे कुठलेली पुस्तक हातात आले की लगेच मी सर्वात प्रथम व सर्वात शेवटचे पानं वाचतो, पण दुनियादारी बद्दल एवढे वाचले होते (प्रतिसाद व खरडी) की हिंमत झाली नाही शेवटचे पान वाचण्याची ना पाहण्याची,

सुरवातीपासून वाचण्यास सुरवात केली व सरळ शेवट करुन पुस्तक बंद केले. व विचार केला हे पुस्तक आपण का व कश्यामुळे पुर्ण एका बैठकीत ते पण ऒफिसमध्ये ज्याकाळात जेवायला फुरसत नाही तेव्हा वाचले, का ? कारण सरळ होते एक तर मिपावर जरुर वाचावे असे पुस्तक असा शेरा मिळाला होता व मनात एक हुरहुर होती जे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशीत झाले ते आजच्या जगाबद्दल कसे व्यक्तव्य करु शकते ? पण मिपावरील लेखामध्ये आलेले प्रतिसाद व लेख वाचून मनात होते की हे पुस्तक व्यवस्थीत वाचायचे व मगच विचार करायचा, एकदा वाचले एका बैठकीत, परत वाचले दुस-या बैठकीत एकाच दिवशी आधी न घेता व नंतर घेतल्यानंतर. फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? ते जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील पण मनातील हुरहुर मिटवणे गरजेचे त्यासाठी हा लेखन प्रचंच.

**************************************

दुनियादारी कुठून सुरु व कुठून समाप्त हे कळतच नाही हे वास्तव आहे, कुठल्याही पात्राच्या जागी तुम्ही स्वत:ला पहाणे हे यश आहे ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे. भन्नाट वेग व एकापेक्षा एक सरस व्यक्ती हेच ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे यशाचे कारण. कोण कुठले श्रेयस , डिएसपी, अशोक, एम के, श्री, नितीन, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन , मिस्टर व मिसेस तळवळकर, कोण अशोकची आई व कोण दिन्याची फॆमेली, कोण जाणे कुठले एसपी कॊलेज पण आपण वाचनाता अचानक गुरफटले जातो व वाटते अरे आम्ही तर ह्यांना ओळखतो जर जवळून नसेल तर दुरुन सही पण आम्ही ओळखतो सर्वांना, पुस्तक वाचण्याआधी व वाचल्यानंतर आपले भावविश्व एकदम वेगळे होऊन जाते, आपण का जाणे अचानक एका वेगळ्याच विश्वामध्ये रमतो, जो आपल्याला नेहमी खटकत असतो जिवनामध्ये तो पण आपलासा वाटू लागतो त्याचा चुकीचा दृष्टीकोन देखील आपण जरा तपासून पाहू लागतो., मित्र, कॊलेज, मारामा-या व तो संतोष बार पाहिला नाही असे नाही कुठे ही जा कोल्हापुरात, पुण्यात अथवा अस्सल दिल्ली मध्ये नाहीतर कानपुरमध्ये सर्वत्र हेच मग ह्या पुस्तकात असे काय आहे ज्याने मला वेड लावले तर ते आहे प्रत्येक व्यक्तीरेखेचे भावविश्व.

अरे वाचताना हदयावर खड्डे पडतात यार हेच यश. चार पानं हसण्याची तर चार पानं निरंतर अश्रु ढाळण्याची, माझ्या मित्रांनी मला कधी एवढे इमोशनल पाहिले नव्हते ते जरा चरकलेच पण हा एक पुस्तक इफेक्ट आहे हे कळाल्यावर चार शिव्या देऊन गप्प झाले पण मी गप्प होऊ शकलो नाही, डोक्यात कुणाला दोष द्यावा हाच विचार चालू होता व आहे.

***************************************
शेयस तळवळकर, हा तुम्हाला कुठे ही भेटेल अगदी तुमच्या जवळपास वावरत असेल, नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर / रुम वर पडिक, मित्रांमध्ये रमलेला, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा पण काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला. मीनू एक नजर काफी, आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी अशी मिनू तुम्ही देखील कधी ना कधी पाहिलेली, अंगात रग असलेला पण रस्ता माहीत नसलेला, मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि एस पी देखील तुम्हाला कोप-या कोप-यावर भेटेल, मित्रांना नेहमी हसवणारे / प्रत्येक वेळी साथ देणारे नितीन, मध्या व श्री देखील भेटतील, तसेच मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे प्राणी देखील आपल्या आसपास भेटतीलच. कुठल्याही बार वर जा तुम्हाला एम के जरुर भेटेल जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम. नातेगोती कधी अश्या क्षणाला पोहचली की जेथे तोंड दाखवायला जागा राहिली नाही की मनमोकळेपणा अशी अनेक जोडपी आपलाला आसपास दिसतील.

ह्या पुस्तकात आहे तरी काय ? ह्या २७२ पानी पुस्तकात एक कॊलेज आहे, एक कट्टा आहे, काही मित्र आहेत काही मैत्रीणी आहेत, आई-वडील आहेत एक एमके आहे व एक त्याची कोणीच नसलेली पण सर्व काही असलेली स्त्री आहे, प्रेमाच्या अथांग सागराला कसा वळसा देणे आहे हे माहीत असलेली शिरिन आहे तर नात्यांना किती किंमत द्यावी हे माहीत असलेला तीचा भाऊ आहे, प्रेम म्हणजे एक दरी आहे व दरीच्या काठावर उभे असलेले सुर्यास्त व सुर्योदय निहारत असलेले जोडपे आहे तर प्रेम म्हणजे काय माहीत नसलेली व एका मुर्खाशी लग्न करायला एका पायावर तयार असलेली प्रियसी देखील आपल्याला भेटते. प्रत्येक जण वेगळा पण एकमेकाशी जुडलेला ह्या ना त्या कारणाने.

लहानपणापासून आई-वडिलांच्यापासून दुरावलेला एक मुलगा, वडिलांच्या इच्छे खातिर लग्न केलेली व प्रेमाचा बळी देलेली आई, बायको दुस-यावर प्रेम करते हे माहीत असून देखील लग्न केले व लग्न टिकवण्याचा व नाते जपण्याचा निरंतर प्रयत्न करणारा पती, पतीने धोका दिला म्हणून विचित्र अवस्थेत प्रियेसी, स्वत:ला प्रियतमे ने सोडला म्हणुन निराशेच्या गर्तेत डुबक्या मारणारा एम के, एक गावगुंड पण मनात दोस्तीचा दर्या असलेला व मनाने हळवा डिएसपी व त्यांचा अफाट मित्रसंग्रह.

***************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: