" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर " बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.
" थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी ?" पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही ;) )
"
"किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे " मोठी माऊशी.
" तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा ? आमचा राजा कुठे आहे ? " रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली.
"कुठ थोबाड फोडून घेतलं रे " माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून.
" अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ ? " एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.
असं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे ! भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.
असो,
आता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळा वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो " काट डाल सबकुछ... " तो दचकला व म्हणाला " क्या साहब ? सबकुछ सफाचट ? गंजा होणा है क्या ? " अरे लेका... " नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट."
तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला " साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो " बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो.."
पंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.
फक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला " साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा" मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला " नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं" त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आठवला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला " हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो." मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.
काही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली ! पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला " देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. " आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो " बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब." त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला" साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है" त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं... आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो... थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.
त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता... भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला "साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा" माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला "देखो साब, हो गया कितना आसान था" मी माझ्या भुवया चोळत म्हणालो " बहोत आसान था... कितना हुवा "
खिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत... जे आहे, जसं आहे तसं आपलं !
हा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला " क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे! एकदम हिरो लगेगा भाई तु " माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो.... हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून !
माझं थोबाड समाप्त !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा