रविवार, २८ सप्टेंबर, २००८

जिवनामधील महत्त्वाचे घटक

आपल्या रोजच्याच वापरातील काही गोष्टींनी आपल्या जीवनावर ताबा मिळवलेला असतो पण आपण एकदम गाफील राहतो व एक दिवशी वापरातील एखाद्या गोष्टीने दगा दिला तर काय मनस्ताप होतो ते आपल्यालाच माहीत मी खाली काही माझ्या रोजच्या वापरातील महत्वाच्या घटकांची माहिती लिहिली आहे व मी विचार केला अरे खरंच ह्यातील एखाद्या गोष्टीने दगा दिलातर माझा संपूर्ण दिवसच अस्ताव्यस्त होतो... असेच काही घटक तुमच्या जीवनामध्ये देखील असतील त्याची माहिती द्या.वीज: ह्यांच्या शिवाय जीवन..... नुसतीचं कल्पना करा, आहाकार माजेल. ही जर १ तास जरी गायब राहिली तर मला एका युगासारखे वाटते... ह्याच्या शिवाय जीवनाला काहीच अर्थ राहत नाही.

संगणक : ह्या ने मला जगण्यातला खरा आनंद दिला व खरंतर माझ्या पोटापाण्याची व्यवस्था केली. ह्याच्या शिवाय जीवन..

कल्पना नाही कसे असेल.

महाजाल : कोल्हापूर सारख्या एका लहान शहरातला बिघडलेला मुलगा कधी महाजालाच्या प्रेमात पडला हे कळलेच, ह्या महाजालाने काय नाही दिले, जगभरातील माहिती, विविध मित्र, संगीत व पैसा. सर्व काही एका टिचकी मध्ये सामावलेले.

युनिकोड : जेव्हा महाराष्ट्रापासून ८ वर्षे दूर राहिलो व मराठी वाचन करण्याची प्रचंड भूक आवाक्याबाहेर जाऊ लागली तेव्हाच २००१ च्या आसपास युनिकोड वापरलेली विविध संकेतस्थळामध्ये मराठी संकेतस्थळे ही गाजू लागली व मनोगत सारखे एक प्रचंड मोठे व सोयी युक्त संकेतस्थळामुळे मला येथे दूरवर बसून ही महाराष्ट्रातील मृद्गंधाचा आनंद घेता येऊ लागला, दिवसाची सुरवात मनोगतापासून व दिवसाची समाप्ती देखील मनोगतावरूनच.

आय-पॊड : संगीत, काही कळो ना कळो पण गाणे ऐकणे हा एकच धर्म मी नियमित पाळतो, पहील्या पहिल्यांदा रेडिओ व नंतर संगणकावर तासंतास गाणी वाजायची... पण काम करता करता, बाहेर फिरता फिरता संगीत माझ्या जवळ २४ तास राहील ह्याची काळजी ह्याच वस्तूने घेतली.

चारचाकी : गुरगांव सारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणाली नावाची वस्तू नसलेल्या शहरामध्ये चारचाकी किती महत्वाची आहे हे येथे आल्या शिवाय लक्षात येणार नाही, साधी भाजी आणण्यासाठी देखील ३-४ कि.मी. जेव्हा जावे लागते तेव्हाच कळते. ह्याच्या शिवाय गुरगांव मध्ये जगणे अशक्य.

दूरध्वनी : फिरता दूरध्वनी ... एकच शब्द आजच्या जगातील सर्वात महत्वाची व उपयोगी वस्तू. पण ही कधी कधी त्रासदायक देखील वाटते पण धरलं तर चावते व सोडले तर पळते अशीच गत. ह्याच्या शिवाय जीवनामध्ये अर्थच नाही. ह्याच्या मुळेच फिरता फिरता महाजाल पण आपल्यासंगे, जास्त नाही तरी ईपत्रे वैगेरा वाचता व उत्तरे पाठवता येतात हे काय कमी आहे.

दूरदर्शन (टी.वी.) चा रिमोट: ह्याचा उपयोग, सर्वांनाच माहीत आहे. ह्याच्या शिवाय करमणूक साध्य नाही..

गूगल सेवा : हा पठ्ठा कानामागून आला व तिखट झाला असा आहे, रोज काहींना काही नवीन सुविधा पुरवतच राहतो.गूगल शोध यंत्र माझे काम किती सोपे करतो हे शब्दात सांगणे कठीण. व गूगल अर्थ वर तर सगळे जग फिरून झाले अजून काय हवे ? :) जीमेल मुळे तर ईपत्र नष्ट करणेच विसरून गेलो आहे.


राज जैन

शनिवार, २७ सप्टेंबर, २००८

फाइनांशियल क्राइसिस 2008जानेवारी ११,२००८
रिस्की लोन मध्ये पैसा बुडाल्यामुळे बँक ऑफ अमेरीका ने कन्ट्रीवाइड फायनान्सियल ला ४ बिलियन डॉलरची मदत दिली.

जानेवारी २०,२००८
यूबीएस ने अडकलेल्या कर्जाची किंमत ४ बिलियन डॉलर ने कमी केली व अश्याच पध्दतीने सबप्राईम कर्जा संबधी राईटडाउन्स वाढून १८.४ बिलियन डॉलर च्यावर वर गेले.

फेब्रुवारी १७,२००८
ब्रिटन ची बँक नॉर्दर्न रॉक पैशाची कमरतता भासू लागली म्हणून सरकार ने सरकारी केले.

मार्च १७,२००८
बेयर स्टर्न्स ला अमेरीकन इनवेस्टमेंट बँक जेमी मोर्गन चेज ने विकत घेतले प्रति शेयर २ डॉलर रेट ने !

जुलै १३,२००८
अमेरीकेतील रियल ईस्टेट मार्केटला वाचवण्यासाठी युएस फेडरल रिजर्व ने फेनी व फ्रेडी मेक ह्यांचे जवळ जवळ सर्व कार्य आपल्या हाती घेतले.

सप्टेंबर १५,२००८
९/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेन मार्केट मधी ७ वर्षातील सर्वात काळा दिवस . लीमैन ब्रदर्स दिवाळेखोर झाली व मैरिल लिन्च ला सरकारने मदतीने वाचवले व जगातील सर्वात मोठी इन्स्युरन्स कंपनी एआयजी अडचणीत सापडली.

सप्टेंबर १६,२००८
सरकारी बँकानी आर्थिक मंदी व क्राइसिस पासून वाचवण्यासाठी अरबों रुपये मार्केट मध्ये आणले, एआयजीचा शेयर ५०% डाऊन झाला तेव्हा अमेरिकन सरकारने एआयजीला ८५ बिलियन डॉलर ची मदत दिली व बार्कलेज बँकने लीमैन १.७५ बिलियन मध्ये विकत घेतले.

सप्टेंबर १७,२००८
गोल्डमैन सैक्स व मोर्गन स्टेन्ली चे शेयर खुप खाली आले व ब्रिटन ची लीयड टीएसबी ने राइवल एचबीओएस ला विकत घेतले व युएस सिक्योरिटीज & एक्सजेंज कमिशन ने शॉर्ट सेलिंग वर बंदी आणली. (ह्यामुळे भारतीय मार्केट संभाळले गेले नाहीतर त्याच आठवड्यात आपण ११००० च्या पण खाली गेलो असतो)

सप्टेंबर १९,२०,२१ २००८
अमेरिका सरकारने ७०० बिलियन पैसे ओतून मंदीच्या मारामध्ये सापडलेल्या कंपन्या विकत घेण्याची तयारी दर्शवली व त्यामुळे जगभरातील मार्केट मध्ये तेजी आली

सप्टेंबर २५, २००८
अमेरीकेचा सर्व मोठा बँक वॉशिंगटन म्युच्युअल बरबाद झाला व त्याची संपत्ती जेपी मोर्गन चेज ने १.९ बिलियन डॉलरला विकत घेतली.


माहीती स्त्रोत्र : इकानॉकिक्स टाइम

ह्यामुळे काय झालं ?

ह्यामुळे भारतीय शेयर बजार जो २१००० पॉइंन्ट होता जानेवारी मध्ये तो आज १३२०० वर आला आहे, मोठ मोठे शेयर आपल्या नेहमीच्या भावापेक्षा १५०-२०० रु खाली आले आहेत, आयसीआयसीआय बँक मागील दोन आठवड्यामध्ये ७३९ वरुन सरळ ५३२ पर्यंत गेला... मोठ मोठ्या बँका आपल्या कर्मचारी वर्गाना नोकरीवरुन कमी करत आहेत आजच एचएसबीसी व एचपीने आपले हजारो कर्मचारी नोकरीवरुन कमी केले ! लीमैन ब्रदर्स ब्रदर्समुळे भारतातील २५००० लोकांच्या नोकर्या गेल्या व तीतक्याच लोकांच्या नोक-या धोक्यात आहेत.

बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ४

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

मार मार मारला... एकदम बैलाला मारावा तसा... चागंले अर्धातास धुलाई झाली वर घरी पत्र पाठवा व आई-वडीलांना बोलवून घ्या असा आदेश ही भेटला !
दुस-या दिवशी एक पत्र लिहले व अण्णाला दाखवले व अण्णाने ते पोस्टहॉफिस मध्ये स्वतः जमा केले (विश्वास नव्हता की जमा करेनच की काय माहीत नाही) संध्याकाळी मला बोलवले व एकदम आपुलकीने विचारले की "बाळा, येथे तुला काय त्रास आहे, का सारखा सारखा पळून जाण्याच्या मागे लागलेला आहेस ? " मी त्यांच्या चेह-याकडे पाहतच राहीला ... डुकरा सारखं रोज मारता वरुन सकाळी चार वाजता लात मारुन उठवता.. जबरदस्ती संध्याकाळी आठलाच झोपवता वरुन विचारत आहात की त्रास काय आहे मी मनातील हे सर्व प्रश्न मनातच ठेवले व गप्प बसलो.. त्यांनी एक कानाखाली वाजवावी ह्यासाठी हात उचलला असे मला वाटले पण त्यांनी तोच हात मागे घेत आपली मान खाजवली व जा म्हणाले व तेथून लगेच पसार झालो.. !

१० एक दिवसानंतर आई-बाबा आले रविवारी !
मी आईला बघून तीच्या कडे एकदम पळतच गेलो मिठी मारायला.. तोच एक जोरदार थप्पड गालावर पडला व त्या बरोबर मी देखील तेथेच मातील लोळलो... पुन्हा बाबानीं उठवला व पुन्हा एक वाजवली.. व म्हणाले " खबरदार पुन्हा येथून पळालास तर" माझा पुन्हा पोपट झाला होता... मी विचार केला होता की आई-बाबा आल्यावर सर्व अडचण सांगेन व ते मला घेऊन घरी जातील.. पण कैच्या कैक.. येथेतर उलटा मलाच मार बसला विनाकारण ! बाबा म्हणाले " तुझ्यावर पाचशे रुपये खर्च केले आहेत वर्षासाठी आगाऊ, वर्ष संपायच्या आत घरी आलास तर तंगडी तोडून लटकवेन घराबाहेरील खुट्याला" मी आई कडे बघतीलं व म्हणालो "मला बोलु तरी द्या" तोच आई म्हणाली " दादया, बाळा येथून सारखं सारखं पळून नको जाऊस... कोठे तरी रस्त्यात हरवलास तर काय करायचं... शाळापण बुडेल... तु नापास होशील... एक महीना झालाच आहे तुला येथे येऊन... तीन-चार महीन्यात दिवाळीची सुट्टी पडेल तेव्हा घरी ये ठीक आहे बाळा" बाळाला तोंडात बोळा घालून मारल्या सारखं मला वाटू लागलं होतं, कुणाला माझ्या दुखःचे काहीच वाटत नव्हतं.

मी पुन्हा रडारड चालू केली तोच निल आला व म्हणाला... " जरा हळू रड.. तो अण्णा बाहेर व्हराड्यातच आहे.. लगेच वर येईल... काकी तुम्ही काळजी करु नका... ह्याचावर हा काळी पळणार नाही... व ह्याच्यामुळे जी दुसरी मुलं पळायच्या तयारीत होती ती पण पळणार नाहीत... शाळेने व हॉस्टेलने गेटच्या बाहेर जाण्यासच मज्जाव केला आहे " मी त्याच्याकडे बघीतलं व म्हणालो " मी जाणारचं" बाबा समोर बसले होते... परत एक वाजवली... व म्हणाले " घरात आल्या आल्या तुला पंचगंगेत नाय फेकलं तर माझं नाव बदल" व आपल्या दाढीवर हात फिरवत तेथे आरामात बसले, आई म्हणाली " का उगाच पोराला मारताय, समजवून चार गोष्टी सागाच्या सोडून... तुम्ही मारु लागला.." जरा मला समाधान वाटलं.. व आईला माझी सर्व अडचण सांगितली तशी ती म्हणाली " ह्यामुळे तुला चांगलं वळण लागेल.. सकाळी लवकर उठणे.. रात्री लवकर झोपणे ह्या चांगल्या गोष्टी आहेत.. हेच येथे शिवतात बाळा.. तुझा सुभाषमामा पण येथे शिकला होता ... व तुझे अप्पाकाका पण "

अण्णा समोर मला घेऊन बाबा गेले व म्हणाले " गुरुजी, हा पुन्हा पळाला ना... पाय तोडून ठेवा.. पण हो येथेच शिक्षण होणार ह्याचं दहावी पर्यंतचं" व माझी शेंडी पकडून म्हणाले " पुन्हा येथून बाहेर पडलास ह्याच्या परवानगी शिवाय तर बघ " मी चिमणी एवढे तोंड करुन बसलो होतो... आईने घरुन.. बेसनचे लाडू , शंकरपाळ्या व चिवडा आणला होता माझ्या साठी त्या सगळ्या पिशव्या माझ्या ताब्यात देत म्हणाली " बाळा, वाटून खा, व आठवण आली की फोन कर शेजारच्या काकूच्या घरी हा घे नंबर त्यांचा नवीन फोन लागला आहे त्यांच्या घरी, हे घे दहा रुपये.. खर्चा साठी.. त्यांना सांगू नकोस.. जपुन खर्च कर" मी अजून पण रडतच होतो व एकदम बारीक आवाजात आईला म्हणत होतो.. मी नाही राहणार येथे.. पण बाबा जवळ आले की, मी फक्त मुसमुसत नाक फुसत असे.. दिवस भर मी हेच रडगाणे लागले... शेवटी आई पण वैतागली व एक रप्पाटा घातला व म्हणाली " कार्ट हाय काय... अवदसा.. सकाळ पासून माग लागलं आहे... येथेच रहा.. आता दिवाळीला पण येऊन नको घरी..." व आई-बाबा संध्याकाळी पाच च्या बसने निघून गेले !

मी एक पंधरा दिवस व्यवस्थीत एक ही चुक न करता हॉस्टेल मध्ये जगत होतो... एक दिवस देखील मार खल्ला नाही ! एके दिवशी रविवारी सहावीच्या वर्गातील सर्व मुलांना अण्णांनी बोलवलं व म्हणाले की दहा वाजल्या पासून सर्व जण डोंगरामागच्या शेतातून हिरव्या मिर्ची तोडण्यासाठी जाणे आहे तेव्हा आपले ड्रेस काढून ठेवा व नियमीत वापराचे कपडे घालून तयार रहा ! नऊलाच जेवण करुन मुलं तयार झाली व आम्ही रांगेने डोंगराच्या मागे जाण्यासाठी आड रस्त्याने जाऊ लागलो सर्वात पुढे अण्णा होते व मागे मागे मुलं... जरा चढण चढल्यानंतर दुस-याबाजूची उतरण चालू झाली व थोडा पाय घसरला म्हणून पुढील मुलाला पकडण्यासाठी पुढे झालो पण त्याला धक्का लागला व तो पडला... पुढील मुलावर असे करत पुढील पाची मुलं पडली व त्यांच्या सोबत अण्णा देखील! त्यांनी मागे वळून पाहीले तर मी हसत उभा होतो एका फांदीला पकडून ... त्यांनी तीच छोटी फांदी तोडली व त्याच हिरव्यागार फांदीने मला सोलून काढले व सर्वांना शेतामध्ये दोन दोने ओळी दिल्या मिर्च्या तोडण्यासाठी व मला एकट्याला दहा ओळी दिल्या !

अण्णाचा राग काही गेला नाही, कधी मध्ये समोर आलो तरी काही ना काही कारण काढून धम्माकलाडू मिळत असे पाठी वर ... असाच एक दिवस मार खाऊन रुम मध्ये आलोच होतो तोच निल म्हणाला " मला पण पळून जायचे आहे... आईची आठवण येत आहे खुप" मी हसलो व म्हणालो... " मला देखील येथून जायचं आहे पण .. कोल्हापुरला गेल्यावर बाबा मारतील... एक काम करु.. मी तुझ्या घरी येईन ठीक आहे.. दोघे मिळून पळू "
आई ने दिलेले पैसे होतेच जवळ.. बस आता योग्य वेळ व मोका हाती आल्या आल्या येथून पार होणे ठरलंच !

क्रमशः

गुगल फोन ( ड्रीम) !
आज गुगल ने आपला गुगल फोन ड्रीम बझार मध्ये उतारला ;)

किमत कमी वाटत आहे आयफोन पेक्षा $१९९ (रु. ९००० च्या आसपास)१. Gphone will have a tilt sensor for gaming and a camera.
२. ३जी नेटवर्क साठी उपयुक्त !
३. वेगवान महाजाल समर्थक
४. जीपीएस सपोर्ट (थर्ड पार्टी)
५. 'open platform' वर आधारीत प्रणाली आहे युनीकोड ला सपोर्ट करु शकतो !

A slick communications suite, including "push" GMail, Google Calendars, and IM. Basically a consumer-oriented BlackBerry service. Perhaps some sort of built-in file syncing between a PC/Mac, the cloud, and your phone -- like Apple's MobileMe, but free, ad-supported... and functional.

Some buy-in from big game studios like Electronic Arts (ERTS). We're surprised how much time we've spent playing games on the iPhone; Spore, for example, is an addictive time suck. We're ready for more.

A Web browser that's fine-tuned to rock Google's Web services, like Google Docs.
Video recording that can upload straight to YouTube.
A way to sync the Android phone with our Mac/PC that's as simple and elegant as Apple's iTunes. No one has come close. (Ideally via wifi/3G, in addition to USB.)
"Visual voicemail" that transcribes your voicemail into an email.
Copy and paste. Seriously.

भारतात येणाची वाट पाहत आहे ;)सोमवार, १५ सप्टेंबर, २००८

शेयर मार्केट - काळा दिवस !

आज शेयर मार्केट मध्ये सेंसेक्स ७७० व निफ्टी २४१ अंक खाली आला आहे....
बँकींग तथा उर्जा क्षेत्रामध्ये खुप मोठी पडझड झालेली आहे.. अजून मार्केट सुरवाती तासामध्येच आहेच आहे.. पुढे अजून पडझड होण्याची आकांक्षा आहे... ह्या मागे लीमन ब्रदर्स ने स्वतःला दिवाळीखोर (bankruptcy) घोषीत करणासाठी अर्ज दिल्यामुळे गोल्बल मार्केट मध्ये हा क्रश झाला आहे व त्याचा परिणाम भारतीय बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला आहे, आशियाई मार्केट देखील खाली जात आहेत शक्यतो मार्केट ना पुढील डाऊन स्टॉप हा १२८०० च्या आसपास व १३५०० च्या दरम्यान राहील अशी आशा !

मोठ मोठे शेयर आपल्या नेहमी च्या पोझीशन पेक्षा ५ ते ७ % खाली आले आहेत.. गेल्या पाच दिवसामध्ये आयसीआयसीआय बँक १४० रु. खाली आला आहे तसेच रिलायन्स इंड्रस्टी २०० रु खाली आहे... डिएलफ देखील ७० रु. खाली आहे आज !
थोडाफार हातभार आतंकवाद्यामुळे देखील लागला आहेच मार्केटला खाली ढकलण्यात..

ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांनी गडबड न करता व्यवस्थीत योग्य वेळेची वाट पाहावी असे माझे मत आहे.. क्रुड ९८ च्या रेंज मध्ये पोहचले आहे हा जो गोल्बल इफेक्ट मुळे जो मार्केटचा डाऊन ट्रेन्ड चालू झाला आहे हा लवकर थांबेल !***
भारतात मंदी येत आहे का ?

माझ्या मते आली आहे... सुरवात मागील वर्षीच झाली होती... जमीनीचे भाव अव्वाच्या सव्वा झाली तेव्हाच

येथे हरयाणामध्ये मी एक गोष्ट नेहमी पाहतो ती येथे देत आहे....

एका गावात एक कंपनीची माणसं आली व म्हणाली आम्हाला काही जमीन विकत घेणे आहे.. व तेव्हाचा जोर बाजार भाव होता त्या भावाप्रमाणे जमीन खरेदी केली, काही दिवसांनी पुन्हा जमीन खरेदी करण्यासाठी ती माणसं आली... तेव्हा जरा चढ्या भावाने देखील जमीन खरेदी केली... असं करुन त्यांनी १ लाख किमतीच्या जमीनीचा तुकडा शेवटी शेवटी २० लाखापर्यंत विकत घेतला ! ह्यांच्यामुळे काय झालं की आसपास च्या सगळ्याच गावाच्या जमीनीच्या किमती गगनी भिडल्या व मातीचे सोनं झालं... थोड्या काळाने बाकीच्या कंपन्यानी देखील तेथे जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न चालू केला जेव्हा भाव ६० लाखावर आला... तेव्हा जी फालतू जमीन त्या कंपनीने विकत घेतली होती.. ( अव्हरेज प्राईझ - ३ लाख ) ती जमीन त्यांनी ६० लाखाला विकली (शेकडो एकर) कंपनीचा फायदाच फायदा झाला कंपनी मध्ये हिस्सेदार त्यावेळचे सरकार .. ईनोलो सरकार !!!!

ते गाव गुडगांव आहे व ती कंपनी डिएलफ त्या कंपनीने ज्या जमीनीला लाख रुपयात कोणी विचारत नव्हंत त्या जमीनीला करोडो रुपयांचा भाव मिळवून दिला !

*****
गुंतवणुकीसाठी

बँकींग मध्ये :

HDFC Bank Ltd. - सध्या - ११८१ वर आहे टार्गेट १२८५ ते १३००
आयसीआयची आय - सध्या ६१२ आहे टार्गेट ६९५ -७०५
एक्सिस बँक - सध्या ६५२ आहे टार्गेट ७१५-७२०
बँक ऑफ बडोदा - सध्या २९१ आहे टार्गेट ३१०-३१५

शुगर सेक्टर -
बजाज हिंन्द - सध्या १३६ आहे टार्गेट १५५-१६०
रेणुका शुगर - सध्या १०० आहे टार्गेट १२२-१२५

पॉवर सेक्टर -
रिलायन्स पॉवर - १५० आहे टार्गेट १६०-१६५ व जास्तीत जास्त १७० जाऊ शकतो !

कालावधी - एक महीना ते दिड महीना !

*
ह्या टिप्स माझ्या स्वतःच्या आहेत, आपले सर्व व्यवहार आपण आपली सदविवेक बुध्दी शाबुत ठेऊन / जाणकाराकडून मार्गदर्शन घेऊन मगच करावेत ही अपेक्षा !

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग २

मी म्हणालो " इतक्या लवकर ? " तो हसत म्हणाला " येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे... पाच दिवस झाले मला येथे येऊन... माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु"

एका मोठ्या हॉल मध्ये खाली लाकडाचे सहा सहा फुटी पाट व ओळीने बसलेली सर्व मुले.. व एका बाजूला स्वयंपाक घर व वाढपीची धावपळ ! प्रत्येकाच्या ताटात दोन गरम गरम भाक-या, भाजी व एका वाटीत ताक ( फोडणी घालेल्या ताकाला काय म्हणतात , विसरलो) व डाळीची आमटी ! घरात असलो असतो तर.. हे असलं जेवण कधीच घेतलं नसं.. ना वांग्याची भाजी.. ना शेपुची.. ना कांदा ना लसूण घातलेली आमटी... मी नाक मुरडतच पहीलं हॉटेलचे जेवण घेतलं व विचार केला की आता वर्ष भर हेच खावे लागणार आहे तेव्हा... गुमान खा ! जेवण संपवून ताट व वाट्या स्वतःच धुवायच्या ? छे ! हा एक नवीन त्रास जिवाला...

ताट व वाट्या हॉल मध्ये ठेऊन मी व निल मंदिरामध्ये फिरण्यासाठी निघालो... निल नांदेडचा व हुशार देखील होता शिक्षणामध्ये मागिल वर्षी पाचवी मध्ये तो आपल्या शाळेत प्रथम आला होता.. व देखील प्रथम आलो होतो... ( पण मागुन आमच्या जाधव बाई म्हणाल्या होत्या ) मी म्हणालो " निल जी मुलं आभ्यास करत नाहीत त्यांना हॉस्टेल मध्ये ठेवतात तु तर हुशार आहे.. मग तुला का हॉस्टेल मध्ये ठेवलं आहे तुझ्या आईवडीलांनी ? " तो म्हणाला " चांगले वळण लागावे ह्यासाठी, व सारखे सारखे हॉस्टेल काय म्हणतो आहेस हे गुरुकुल आहे.. आण्णाच्या समोर हॉस्टेल म्हणालास ना... धुलाई होईल" मी म्हणालो "अण्णा ? हो कोण ?" तो म्हणाला " वेताचा मार येवढ्यात विसरलास.. जे तुला मारत होते तेच अण्णा, गुरुकुलचे सर्व काही तेच पाहतात... रोज दोनचार मुलांची धुलाई करतात.. तेव्हा नियम पाळ... नियम तोडला की ... मार नक्की तो देखील सर्वांसमोर.. चल आता... संध्याकाळ झाली.. आठच्या आत हॉलमध्ये असायलाच हवे... लाईट बंद करतात नाही तर" मी म्हणालो " अरे, आठ वाजता झोपायचं ? अरे सवय नाही मला" तो म्हणाला" होईल सवय चल."

सकाळी चार वाजता... कोणी तरी पेकाटात लात घातली व मला जाग आली... समोर पाहीले तर आण्णा उभे ! " तुम्हाला पावणे चारची घंटा वाजलेली कळाली नाही ? " मी काही न बोलता.. मान खाली घालून उभा राहीलो होतो... तोच निल पुढ होत म्हणाला " चल, अंघोळीला जाउ.. टॉवेल घे आपला.." मी आपले कपडे व टॉवेल घेऊन अंघोळी साठी निघालो, कंबर जोरात दुखत होती... रागाने थर थर कापत होतो... पण करणार काय ? ... मी निल ला म्हणालो " कुठ जायचं आहे अंघोळीला ?" तो म्हणाला " तो म्हणाला " विहरी वर ! " थोड्या वेळातच विहरी वर पोहचलो, समोरचे दृष्य पाहून दंग राहीलो.... एक मोठी विहीर... त्या विहीरीला पाणी खेचण्यासाठी चार चार बालटी लटकवलेली... सगळे विद्यार्थी स्वतःच पाणी काढत होते बाल्टी डोक्यावर ओतून घेत होते.. झाली आंघोळ ! मी निल ला म्हणालो.. " थंड पाण्यानेच आंघोळ करयाची का ? मी नाही करणार... जरा उजाडल्यावर करेन पाणी गरम होईल तो पर्यंत " तो जोरात हसला व म्हणाला " आताच आंघोळ करायची, नंतर दिवस भर वेळ देखील मिळणार नाही व पाच नंतर विहरी वर सापडला कोणी की त्याची आण्णाशी गाठ नक्की " मी कशी बशी आंघोळ उरकली व नवीन आणलेले कपडे... शाळेचा गणवेश घातला... पांढरा शर्ट व काळी हाफ चड्डी !

साडे चार ला बरोबर... सगळे मैदानामध्ये जमले मी पण निल च्या पाठोपाठ तेथे पोहचलो , सगळे रांगेत उभे होते... लहान मुलांची एक रांग... त्यांच्या पेक्षा मोठ्या मुलांची एक रांग .. अश्या किती तरी रागा लागल्या होत्या... व समोर चबुत-यावर आण्णा हातात वेताची काठी घेऊन उभे होते व त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ वयाने मोठी मुले पाठी मागे हात घालून उभे होते... सर्वात प्रथम प्रर्थना व जिन वंदन केले गेले व थोड्या वेळाने व्यायामाला सुरवात झाली.... कधी हात वर तर कधी खाली... डावी कडे वाका... उजवी कडे वाका.. उड्या मारा.. व एक उडी चुकली व मी धडाम करुन खाली पडलो... सगळी मुलं हसली.. व आण्णा.. काही क्षणात तेथे पोहचले... दोन छड्या मारल्या पायावर व म्हणालो " पुन्हा पडलास, पाच फटके " व पुन्हा कसरत चालू !

मांडीवर वेताच्या छडीचे वळ पडले होते.. निल ने आचा-याकडे जाऊन थोडे हळद आणले व माझ्या वळांवर लावत म्हणाला " नियम पाळ.. गोट्या... नियम पाळ.. नाही तर रोज मार खाशील " मी म्हणालो " मी मुद्दाम थोडीच पडलो होतो.. चुकुन पडलो होतो.. " तो म्हणाला " चुकुन पण पुन्हा काही करु नकोस.. तो बघ... श्रेणीक येत आहे माझा नवीन मित्र आहे.. तो येथे दोन वर्षापासून आहे व आठवी मध्ये आहे तो..." तो श्रेणिक आला व माझ्या कडे पाहत म्हणाला " अरे छोट्या, तुच पडला होतास ना सकाळी " व हसू लागला. एक तर त्यांने मला छोट्या म्हणाला वर माझ्या वरच हसत होता... मी रागाने निल कडे पाहीले.. त्यांने लगेच श्रेणिकला म्हणाला " दादा, तो नवीन आहे.. घाबरला आहे... चार-पाच दिवसामध्येच ठीक होईल असे सगळेच हसले तर पळुन जाईल तो "
माझ्या डोक्यात एकदम विज चमकली "पळून जाईल तो " येथून पळ काढायचा आजच !

सहा ते सात मंदीरामध्ये भजन व सकाळी आठ वाजता जेवण हा रोजचा नियम ठरलेला व मी ह्याच वेळात पळून जाण्याचे ठरवले.. पेटी वजनाने जास्त मोठी होती व ती हात घेऊन बाहेर जरी पडलो तर सगळे समजतील मी पळून चाललो आहे... मी आहे त्याच गणवेश मध्ये पळून जाण्याचे ठरवले ! पुजे नंतर निल म्हणाला चल जेवण घेऊ.. मी भुक नाही असे सांगितले व एकटाच हॉल मध्ये बसून राहीलो. व पाच एक मिनिटाने गुपचुप पणे मी हॉलच्या बाहेर आलो व ग्राऊंड च्या बाजूने... विहीर जवळून शाळेच्या गेट पाशी आलो व बाहुबली मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या पाय वाटेने सरळ हातकलंगडे रस्त्यावर आलो.. मी वेगाने पळत पळत जास्त होतो अर्धा तास तरी पळालो... पण हातकलंगडे काही आलं नाही... पण एक गाव जरुर आलं .. तेथे एकाला विचारलं हातकलंगडे किती दुर आहे.. तो माझ्या कडे नखशिकांत पाहत म्हणाला " १२ कि.मी. आहे, हॉस्टेल मधुन पळून आलास ? " मी नाही म्हणालो व तेथून जाण्यासाठी मागे वळलो... त्यांने मानगुटीला पकडून सरळ सरळ वर उचलला मला व म्हणाला " पोरा मी तुझ्या सारखं लई नमुने बघीतली हाईत.. चल हॉस्टेल मध्ये" व आपल्या राजदुत वर बसवून... सरळ गुरुकुल मध्ये घेऊन आले.. व आण्णाच्या समोर उभे केले व म्हणाले " हे कबुतरं, पळून चाललं होतं.. नशीबानं मला सापडलं... लेकाचा.. त्या पोरं पळवणा-याच्या हाती लागलं असंत तर कळालं असंत... " आण्णा म्हणाले "पोलिस पाटिल, धन्यावाद तुमचे.. हा नवीनच आला आहे बघतो त्याला मी" चाललेला संवाद मला महत्वाचा नव्हता... बसणारा मार कसा चुकवावा ह्याचा विचार करत होतो.. तोच पाठीवर जोरात छडी पडली... पुढील पाच-दहा मिनिटामध्ये... दहा पंधरा थप्पड व सात-आठ छड्या पाठीवर... मांडीवर पडल्या व मी रडत खाली जमीनीवर लोळत होतो... आण्णा नी दोनचार मोठ्या मुलांना बोलावलं व मला उचलुन हॉल मध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितले !

थोड्यावेळाने निल मला खोत डॉक्टरांच्या कडे घेऊन गेला जे गुरुकुलचे डॉक्टर होते.. थोडा मलम माझ्या वळांवर लावत म्हणाले " कश्याला पळून जात आहेस.. बघ मी येथेच शिकुन गेलो होतो.. आता डॉक्टर होऊन येथेच सेवा करत आहे... आण्णा.. पण खुप शिकलेला आहे पण अविवाहीत राहून येथे सेवा करत आहे... येथे तुला खुप काही शिकायला मिळेल" थोडा मलम कागदावर देत निलला म्हणाले " रात्री झोपताना लाव एकदा !दिवस भर पडलेल्या मारामुळे मी हॉल मध्येच काढला, संध्याकाळी निल हात पकडून जेवण्यासाठी घेउन गेला... चालणे देखील मुश्कील होत होतं !

क्रमश:

गुरुवार, ११ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग १

प्रस्तावना

माझे एक वर्षाचे शिक्षण बाहुबली विद्यापीठ, बाहुबली, कुंभोज (जि. कोल्हापुर) येथे झालं त्याच्या काही आठवणी येथे देत आहे त्याला कारण गुगल ने मला अचानकच आमच्या विद्यापीठाचे संकेतस्थळ समोर आणून दिले, शोधत दुसरंच काही होतो.. !


हे शाळेचे ब्रिद वाक्यहे गुरुकुल म्हणजेच आमचं हॉस्टेल व त्यावेळची जेल ;)


हे मंदीर... चांगले उंच जागी आहे !


हेच ते ग्राउंड जेथे आम्ही रोज चकरा मारल्या ... चुका केल्यामुळे ;)


घरच्या एका पत्रासाठी डोळे लावून आम्ही वाट पाहत असू.. शाळेच्या गेट समोरच असलेले पोस्ट ऑफिस :(


हे बाहुबलि स्वामी ह्यांच्याच आशिर्वादाने मी पंधरा वेळा यशस्वी पणे हॉस्टेल मधून पळून गेलो (नंतर परत पकडून आणला व धुतला ही गोष्ट वेगळी )
सर्व फोटो ह्या संकेतस्थळाद्वारे भेटले - www.bahubali-vidyapeeth.org
अजून काही चित्रे शोधत आहे भेटतील तस तशी मी येथे प्रकाशीत करत राहीन.

******************************************************************

कोल्हापुरातील शालेय प्रगती पाहून आई-वडीलांनी मला बाहुबली हॉस्टेल मध्ये ठेवणे नक्की केले, नुतन मराठी विद्यालय मधून माझा दाखला काढला गेला व सरळ मे मध्येच मला घेऊन आई-वडील बाहुबलीला आले व दोन तासाच्या आतच सर्व कार्य संपुर्ण करुन मला हॉस्टेल मधील हॉल मध्ये (एका हॉल मध्ये ५० एक मुले राहत होती) सोडण्यासाठी आले, मला माझी लोखंडाची पेटी व त्यावर माझे नाव व पत्ता, बेसनचे लाडू व थोडा चिवडा हे सर्व हाती देऊन बाबा बाहेर गेले व हॉस्टेल मधील पुर्ण इतिहासामध्ये कोणी रडून दंगा केला नसेल इतका दंगा मी केला.. आईला जाऊच दिले नाही अर्धा तास, थोड्या वेळाने गुरुजी आले .. पाढंरा कुर्ता.. पांढरे धोतर... व डोक्यावर विरळ केस.. सडसडीत शरीर .. वण गोरा... व डाव्या हातात वेताची काठी !

पुढील पाच मिनिटामध्येच आई-बाबा हॉस्टेल मधून बाहेर जाऊ शकले एकदम आरामात व मी मुसमुसत अंगावर पडलेले वळावरुन हात फिरवत तेथेच बसून राहीलो .. डोळ्यात पाणी जमा करुन ! संध्याकाळची वेळ झाली थोड्या वेळाने माझ्या आजू बाजूची मुलं आपापली ताट-वाट्या - तांब्या घेऊन निघाली ... मला काही कळाले नाही मी एकाला विचारले""कुठ निघालात ?" तो खेसकला, "जेवणार नाहीस की काय ? चल जेवायला" " मी म्हणालो " इतक्या लवकर ? " तो हसत म्हणाला " येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे... पाच दिवस झाले मला येथे येऊन... माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु"


क्रमशः

चिंतन


अहिंसो परमो धर्म - महावीर स्वामी ने जगाला दिलेला मंत्र, ते ज्या काळात होते तो काळ एकदम वेगळा होता, पण आज समाज मानस एकदम वेगळे आहे, जेथे पाहावे तेथे खुन, मारामा-या, विस्फोट व आतंकवादी हल्ले ह्या सर्वांवर मी सामान्य माणुस म्हणून कसा विचार करतो आहे ? खुन का बदला खुन असा एक कायदा चंबल च्या घाटी मध्ये चालतो तसे वागावे तर तो धाडशी पणा माझ्याकडे नाही, मुंगी मारावी की न मारावी ह्याचा देखील विचार करणारा मी समोरचा शत्रु आहे हे उमजुन ही त्याला मारु शकेन .. ह्याची मलाच खात्री नाही, पहावे कोणाकडे राजकीय नेते मंडळी ह्यांना तर भ्रष्टाचार व स्वतःची स्तुती करण्यापासून वेळच मिळत नाही ते काय रक्षा करणार ह्या शत्रु पासून.. पोलिस नावाची एक व्यवस्था आहे असे म्हणतात आम्ही पोलिसांना नावे ठेवतो ते राजकीय मंडळींना नावे ठेवतात.. जावे कुठे मग ?मग काय त्या होणा-या कलीच्या अवताराची वाट पाहत बसावे ह्यावर ?

चिंतन जरुरी आहे ..

बुधवार, १० सप्टेंबर, २००८

पुर्वाभास !

काय असतो हा पुर्वाभास ?
महाजालावर शोधा शोध केली खुप काही संकेतस्थळे भेटली पण ती विदेशी भाषेमध्ये होती पण हिंदी व मराठी मध्ये काही ह्या विषयावर सापडले नाही.. तेव्हा सर्वात प्रथम मिपावर !
पुर्वाभास ह्या विषयी लहानपणापासून प्रचंड आवड असलेला मी, का आवडतो मला हा पुर्वाभास विषय... ह्या मध्ये तुम्हाला पुढे घडणा-या घटना आधीच कळतात.. मला ह्या गोष्टीचे खुप अप्रुप वाटायचे की असे झाले तर कीती छान नाही... काय होणार आहे हे आधीच कळाले तर किती मजा येईल, त्यावेळि काही पुस्तके , मासिके वाचली होती त्यामध्ये ह्या प्रकारातील काही गोष्टी असायच्या पण त्याचा शेवट अथवा मध्य बिंदू हा नेहमी भुत, चेटकिण अथवा जादुगर असायचा त्याच्या कडे भविष्य पहाण्याची शक्ती असायची अथवा हिरोला मदत करणा-या एखाद्या व्यक्ती कडे... त्यातच लहानपणी हकीम-ताई नावाचा चित्रपट पाहीला व भविष्य पाहण्याची शक्ती आपल्याकडे असती तर हा ... असे राहून राहून वाटू लागले होते...पण जस जसा मी मोठा होत गेलो तस तसे तो विष्य सोडून मी जिवनाच्या गाड्यामध्ये भरकटत राहू लागलो... पण कधी मधी वर्तमानपत्रामध्ये भविष्य बघ व कोठे कोणाला हात दाखव... कुठे केरोचे भाषांतरीत पुस्तक वाच हा नाद चालूच होता, कधी मधी कोणीतरी भेटायचा व म्हणायचा अमुक-तमुक ने भविष्य सांगितले व ते १००% खरं झाले , असा तो छातीठोक दावा करत असे.... व मग मी पुन्हा शोधाच्या / वाचनाच्या मागे लागत असे की खरंच असे होत असेल का ? ह्या वाचनाच्या नादातच कोठेतरी मला नास्त्रोदामस हे नाव कानावर पडले (९/११) च्या आसपास, मी थोडी शोधा शोध केली व जे वाचले ते वाचून पुन्हा पुर्वाभासच्या प्रेमामध्ये पडलो....
कधी कधी आपल्याला आपल्या सामान्य जिवनामध्ये असे वाटते की आपण ही गोष्ट / घटना अनुभवली आहे ... येथे आपण होतो व आपल्या समोर हे होणार आहे हे माहीत होते... इतकाच माझा व आपला पुर्वाभास संगे संबध. पण मी एका गोष्टीचा विचार केला की ती घटना घडून गेल्यावरच असे का वाटते की आपण ही घटना घडताना येथे कोठे तरी होतो ? हा विचार माझे डोके खाऊ लागला. ह्याचे समाधान मी काही चित्रपटामध्ये भेटते का ह्याचा शोध घेऊ लागलो... तेव्हा मला "फायनल डिस्टीनेशन" ह्या चित्रपटाबद्दल माहीती सापडली व मी तो चित्रपट पाहीला....मला उत्तर भेटण्यापेक्षा जास्त मी त्या प्रश्नामध्येच गुरफटून गेलो व डोके चक्रावून गेले....तोच""डेजावू " हा चित्रपट आला परत तेच उत्तर काही सापडले नाही... तेव्हा मनात आले तुम्हाला विचारावे काही माहीत आहे का हो "पुर्वाभास" विषयी ????

१०/०९/२००८

आज शेयर मार्केट मध्ये जास्त उतार चढाव नाही आहे, व मी कश्या काळाला सुवर्ण काल समजतो, सर्व पैसे मोठ्या शेयर मध्ये अडकल्या मुळे.... जरा स्वतः नाराज होतो पण, एक्सिस बँकने नेहमी प्रमाणे हात दिला व ५००० रु. कमावले... आता जरा बंद करुन बॉग लिहावा म्हणत आहे खुप दिवस झाले दरबार भरलाच नाही...
बँकेचे शेयर F&O खरेदी करुन दोन-चार रु. नफामध्ये विकले की तुम्ही सुध्दा २००० एक हजार रोज कमवू शकता, फक्त लालच केले की मग मात्र गडबड होते.
हे बघा एक्सिस चा एक लॉट २२५ शेयरचा ४४००० च्या आसपास येतो .. रोज ह्या शेयर मध्ये १५ ते २० रु चा चढाउतार असतोच.. तुम्हाला फक्त त्याचा चढ अथवा उतार ची दिशा पकडायची आहे... !
बघा जमलं तर ...