सोमवार, २८ डिसेंबर, २००९

राजापुर गुंफा (पाचगणी)

पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे? तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.

उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.

गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).

वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.

गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.

फोटो अल्बमचा दुवा

************
************

मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

सज्जनगडतुम्ही फोटोवर क्लिक करुन मोठा फोटो पाहू शकता. त्याआधी तुमचा पॉप-अप ब्लॉकर बंद करा. धन्यवाद.

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

शनीवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो, पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो, पुणे तर घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खुप वेळ हातात आहे असे वाटत होते फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला व एक कॉल केला व त्यांना विचारले येथे आहे का आसपास काही जागा बघण्यासारखी तर त्यांनी मला म्हसवे हे गाव सांगितले व म्हणाले जाऊन बघ बघण्यासारखं आहे तेथे. पाचवड मधून उजव्या हाताला वळालो चांगले दहा एक किलोमिटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या शेवटी एकाला थांबला व विचारले ते मोठे वडाचे झाड कुठे आहे तर तो म्हणाला उलट आला आहात सरळ परत पाचवडला जा व तेथून डाव्याबाजूने सरळ जाऊन पहीला उजवा कट तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कप्पाळ व हाताची गाठभेट घातली वर बाईक सरळ परत वळवली.

विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहीती लिहलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थीत (?) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहले आहे ह्यांची माहीती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डचाच फोटो काढून घेतला. एका गावकराकडून कळालेली माहीती अशी,

म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यातून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहीले आहे, जो मुळ वृक्ष होता तो काही वर्षापुर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यातून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा संभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषीत केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छूक दिसत नव्हता त्याचे कारण त्यांने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरुन चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरुन पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी ? म्हणजे सुर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहीती घेतल्यावर असे कळाले की हा अशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये - गुगल सेवा) . तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटवडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारीक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.

म्हसवे

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

विरोधाभास..

खुप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दुर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदुर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आजचे पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामाजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मड्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..

उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवे मध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे, कोण जगावे व कोण मरावे ह्याचा निर्णय देखील आजकाल माणसं घेतात हे पाहून देखील नवल वाटते. कधी काळी ३५ रु. ला मिळणारा मॆकडीचा बर्गर आता २० रु. ला मिळतो, पिझा स्वत: झाला म्हणून कंपनीवाले टिव्हीवर, रेडिओवर, टॊयलेटच्या भिंतीवर बोंबलत आहेत. खरोखर सर्वकाही स्वस्त झाले आहे ? चार रु. किलो कांदा मिळायचा ह्यावर मुलांना विश्वासच नाही, तेल कधी तीस रु. किलो होते ह्या वाक्यावर तर मुले हसतात, खुप पुर्वीची गोष्ट नाही आताचीच काही वर्षापुर्वीचीच गोष्ट. भाव आकाशी भिडले हे वाक्य प्रचार आम्ही पुस्तकात वाचायचो.. आजकाल मुले ह्याची देही.. ह्याची डोळी पाहतात.. आकाश खुपच ठेगणे झाले आहे. हजारो टन भाजीपाला आपल्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे भाव मिळत नाही म्हणून व दुसरीकडे जेवायला एकवेळचे अन्न नाही म्हणून भुकबळी पडत आहेत ह्या किती मोठा विरोधाभास आहे.

एखादी बातमी, एखादा चित्रपट, एखादी डाक्युमेंट्री येते हलकेच आपल्याला हळवी करुन जाते व आपण परत निर्लजासारखे आपल्या सरावलेल्या जगात परत जातो, एखादा आत्महत्या करतो, एखादा स्व परिवार आपली यात्रा संपवतो, आपण हळहळतो व परत आपल्या जगात सराईतासारखे वावरतो. काही जणांना लाखो रु नाही पुरत काही महिना काढण्यासाठी, काहीजणांच्या घरामध्ये दिवसोदिवस चुल पेटत नाही त्यांचा विसर पडतो. कुठेतरी निसर्ग बचाव आंदोलन चालू असते कुठे तरी वन्यजीव बचाव.. पण कुठेच सामान्य माणूस बचाव हे आदोलन चालू आहे असे नाही पाहीले कधी. पाळीव कुत्र्याविषयी, बैलाविषयी माणसाला आपुलकी आहे पण आपल्यात जात बाधवावर जरा ही दया नाही... अशी विचित्र जात मानवाची.

कुठेतरी देव असेल व तो पहात असेल हे सर्वकाही. आपण चुकत आहोत, कुठे ना कुठे हे नक्की. सगळेच काही नेते मंडळी नाकर्ते आहेत असे नाही, नाही तर आपल्या देशाचा देखील पाकिस्तान होण्यासाठी खुप वेळ लागला नसताच. पण कुठे तरी आपण एक समाज म्हणून नक्की चुकतो आहोत. आज ना उद्या कधी ना कधी आपल्याकडे असलेले इंधन हे संपणार आहे, पर्यायी इंधनाचा अजून काहीच शोध लागला नाही आहे, सुर्य उर्जा हा एक विकल्प दिसत आहे समोर पण कोणीच त्यावर योग्य पध्दतीने कार्य करत नाही आहे, प्रगत देशामध्ये काय होत आहे माहीत नाही पण भारतासारख्या असामान्य देशात जो प्रगतशील आहे त्यामध्ये खुप मोठे अडथळे दिसत आहेत. शेती व्यवसायामध्ये खुप मोठी तफावत आहे, निसर्ग नेहमी प्रमाणे साथ देत नाही आहे जेव्हा पाऊस पडावयास हवा तेव्हा दुष्काळ व जेव्हा पाऊस नको तेव्हा महापुर अशी अवस्था होत आहे देशात सर्वत्र. अनिश्चित पाऊस हे दृष्य भारतासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या देशाला नक्कीच हानीकारक आहे. वीजेचे काय गुण गावावेत.. जेथे दिल्ली सारख्या राजधानी मध्ये पुर्ण २४ तास आपण विज देऊ शकत नाही तेथे सुदुर पसरलेल्या खेड्यांमध्ये आपण कशी वीज २४ तास देणार आहोत हेच मला अजून कळले नाही आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपला देश खरोखर सज्ज आहे ? हे मागेच आलेल्या वादळावरुनच समजते. माहीतीची देवाण-घेवाण मध्ये एवढी तफावत आहे की अनेकांचे जीव गेले तरी त्या संबधीत खात्याला त्याची आकडेवारीच नाही माहीत.

एकवीसावें शतक चालू होऊन पण आता नऊ वर्ष पुर्ण होत आलीत पण अजून पण आपण जाती व्यवस्था, आरक्षण व सबशिडीवर अवलंबून आहोत, रस्त्यावर चालणारे शेकडॊ हजारो व्यक्ती आपल्याला कुठल्या जातीचा माणूस टच करुन गेला हे पाहण्य़ासाठी वेळ नसताना फक्त फक्त आपल्यामध्ये राजकीय कारणामुळेच जातीव्यवस्था टिकून आहे, राहुल गांधी दलिताच्या घरात एका रात्री जेवला ही आपल्याकडे ब्रेकिंग न्युज असते तर भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष फक्त जातीय राजकारणामुळेच पोसले जातात. सबसिडी व्यवस्था / आरक्षण व्यवस्था ही देश आझाद झाल्यानंतर काही वर्षात मागे घेण्याची मागणी बाबासाहेबांनी केली असे कुठे तरी वाचले होते, पण देश आझाद होऊन ६० वर्ष झाली आपल्या खांद्यावर अजून ही आरक्षण / सबसिडी व्यवस्था आहेच उभी. आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत हे आपल्याला कळत आहे पण अभेद अशी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता व योग्य असा नेता नसल्यामुळे कुठेच काही फरक पडत नाही आहे.

काय होणार आहे काही कळत नाही आहे. निराशवादी मी नाही आहे पण समोर जे दिसत आहे, घडत आहे ते पाहून खरोखर मनामध्ये चलबिचल होत आहे. बघू काय घडतं ते.. महासत्ता होण्याच्या नादात आपण कुठेतरी आपली जाणीव हरवून बसलो नाही म्हणजे झाले.

गुरुवार, १७ डिसेंबर, २००९

कराड - बौध्दकालीन लेणी

कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा मारु म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला, छोटासाच बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम. बाईक तेथेच उभी केली व सरळ समोर दिसणारा डोंगरावर नजर टाकली तर येथे कुठे लेणी असावीत अशी अंधूकशी पण शक्यता दिसत नव्हती पण तरी आलोच आहोत तर चढू वरती व पाहू असा विचार केला व डोंगर चढायला सुरवात केली. अर्धा-एक तासामध्येच वर माथ्यावर आलो व नजर फिरवली तर समोरच्या डोंगरामध्ये लपलेल्या लेणी दिसू लागल्या. कप्पाळाला हात मारुन परड डोंगर उतरलो व समोरचा डोंगर चढावयास सुरवात केली. जसे जसे लेणी जवळ येत गेल्या तस तसे त्यांचे सौंदर्य खुलून दिसू लागले आता ते शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे त्यांचे फोटो देत आहे तुम्हीच पहा. एकून २६ लेणी आहेत. काहीपुर्ण आहे तर काही अपुर्ण. थोडे फार अतिक्रमण येथे पण झाले आहे पण ते विठल-रुक्माई ने केले आहे म्हणून आपण माफ करु त्यांना. हे बौध्दांचे पुजास्थळ + विश्रामगृह असावे असा माझा कयास आहे. ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही नेट वर ही थोडी शोधाशोध केली तरी हातात काहीच गवसले नाही त्यामुळे फोटो सोडून जास्त काही माहीती देउ शकत नाही.


हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.
ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.


ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.
देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)शान की सवारी ;)परतीचा प्रवास चलो पुणे.

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

सिंहगड माझ्या नजरेने....

रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही.

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते. छोट्या छोट्या टपरीमध्ये हॉटेल्स चालू होती, घरगुती जेवणापासून एक धाबा पण गडावर पाहिला नवल वाटले. चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे ह्यांच्या मुळे गड असा गजबजून गेला होता. सुंदर मुली आपल्या आपल्या बुजगावण्यांना संभाळत आईसक्रिम खात इकडे तिकडे बागडत होत्या.

मला क्षणभर शंका वाटली व मनात आले चुकुन आपण सिंहगड सोडून कुठल्या तरी पिकनिक स्पॉटवर तर नाही ना आलो. पण थोड्याच वेळात जेव्हा मी थोडा पुढे गेलो तेव्हा शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा दिसला व त्याच्या जवळच गडाची माहीती.

मी सर्वांना निरखत पाहात गडाच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य हे पाहून थोडे मन विचलित होत होते. गडावर असलेली छोटेखानी हॉटेल्स पाहून खरोखर नवल वाटले, एतिहासिक वास्तू च्याजवळ प्रदुषण निर्माण करणारे कोणतेच कार्य होता कामा नये असा आदेश ह्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे शक्यतो महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याला माहीत नसावे की काय असा हाल.

गडावर पाहण्यासारखं काही राहिलेच नाही आहे, दारुचे कोठार, घोड्यांचा पागा, टिळक भवन व थोडीफार वाचलेली तटबंदी. निसर्गाच्या अवकृपे पेक्षाही जास्त अवकृपा मानवाने केली आहे ह्या गडावर. एखादे नितांत सुदर स्थळ कसे बरबाद करता येईल ते आपल्या कडून शिकावे जगाने. आरडाओरडा, दंगा ह्यांची रेलचेल दिसत होती. जेथे जेथे कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल व त्यांचे प्रणयचाळे.

गडाच्या तटबंदीबरोबर पुर्ण दोन चक्कर मारली गडावर फोटो घ्यावे असे काही दिसलेच नाही, व जेथे काही फोटॉ घेऊ असा विचार येत होता तेथे माणसांची गर्दी कमी होत नव्हती त्यामुळे आसपासच्याच निसर्गाचे फोटो काढले त्यातील काही निवडक फोटो येथे देत आहे.शनिवार, १२ डिसेंबर, २००९

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

पाऊलखुणा..

नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत. मावळतीच्या सूर्याला आपल्यात सामावून घेणा-या त्या अथांग समुद्रासारखेच गहिरे आहेत. पण त्याच्या असण्यानसण्याचं कसलंच भान तिला नव्हतं. ती तशीच त्या पाण्यात विरघळत जाणा-या सूर्याकडे पाहत बसून होती. पाहताक्षणीच त्याला तिचे ते निष्पाप, स्वप्नील डोळे आणि त्या डोळ्यांतून व्यक्त होणारी ती खूप आवडली.

वाळूवरची त्याची नीरव पावलं तो अगदी जवळ आला तशी तिला जाणवली बहुतेक. तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली व हलकेच हसली. तसा तोही उत्तरादाखल तसाच हसला. तिने त्याला बाजूच्या खडकावर बसण्याची खूण केली तसा तो यंत्रवत त्या खडकावर जाऊन बसला व समोर सूर्याकडे पाहू लागला. त्याचे तेज आता त्याला जाणवू लागले होते. त्याने हलकेच आपली नजर पुन्हा तिच्याकडे वळवली आणि असाच नि:शब्दपणे खिळल्यासारखा तिच्याकडे पहातच राहिला. तिलादेखील ते कळलं असावं म्हणून ती त्याच्याकडे वळली. त्या तिच्या नजरेतच स्पर्शाचा भास होता. त्याच्या शरीरावर एकदम रोमांच उभे राहीले. कुणीतरी हळूवारपणे मोरपीस फिरवावं तसं वाटलं. थोडयावेळापूर्वी मनात चालू असलेला कल्लोळ एकदम शांत झाला. त्याला हवं असलेलं ते काहीतरी आता त्याला आपसूक मिळालेलं होतं.

आपली भावना तिला कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं. इकडे तिकडे नजर फिरवल्यावर त्याला त्याच्या बाजूलाच उगवलेले एक छोटेसे निळे तीन पाकळ्यांचं फूल दिसलं. त्याने अलगदपणे ते खुडलं आणि तिच्यासमोर धरलं. ती हसली. तिने त्याच नाजुकपणाने ते फूल हातात घेतलं आणि आपल्या केसांमध्ये त्या फुलाला जागा दिली. तिचं सौंदर्य अजून खुललं. सूर्यप्रकाश तिच्या चेह-याला आपले तेज देत होताच. त्याने तिची गोरी कांती अजून खुलत होती. आता मावळतीच्या वेळचा आकाशाचा रक्तिमा तिच्या गालांवर उतरून आला होता. ती त्या खडकावरुन खाली उतरली.

तो तिच्याबरोबर चालू लागला. उद्या परत भेटू ह्या बोलीवर ते विलग झाले. ती परतली. पण तो मात्र वाळूत उमटलेली तिची पाऊले पाहत तसाच तिथे उभा राहीला... कितीतरी वेळ त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं.

दिवसामागून दिवस जात होते. एका कळीचे फुलामध्ये रुपांतर व्हावे तशी ह्यांची कहाणी पुढे चालू होती. ॠतु मागून ऋतु जात होते. ज्या खडकावर ते प्रथम भेटले होते तिथेच आता ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली होती. तिच्या टपो-या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिचा तो नेहमीचा प्राजक्तासारखा फुललेला चेहरा कोमजला होता. सगळे बांध तोडून तिचे डोळे झरत होते. त्याने हलक्याच हाताने तिच्या गालावरील ते थेंब दूर करत, तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या नजरेला नजर भिडवली. काही न बोलताच डोळ्यांनी ती खूप काही बोलत होती. त्याला सर्व कळत होतं, पण काय सांगावं हेच उमजत नव्हतं. राजकुमारीच्या प्रेमामध्ये असलेल्या दासासारखी त्याची अवस्था. काय बोलू व काय करु असेच प्रतिप्रश्न त्याचे डोळे तिला विचारत होते. तिला त्याचं मन वाचता येत होतं. कारण तिच्या श्वासाश्वासातून नियतीमुळे होणारी ताटातूट नकळत व्यक्त करत होती. त्याने निश्चयाने हात तिच्यापुढे केला. तिने काहीच हालचाल केली नाही. एका जागीच एखाद्या मूर्तीसारखी खिळून राहिली होती. त्याने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहीले. तिच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पाहिले. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. बोलायची गरजच नव्हती. आपला थरथरता हात त्याने मागे घेतला व उठून चालू लागला. आपल्या परतीच्या मार्गावर, मान खाली घालून, येताना उमटलेली पाऊले पाहत. त्याचे शब्द आजकाल असेच अबोल होऊन जातात आणि डोळ्याच्या कडा किंचित ओलावतात.

दूरवर कुठेतरी शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग असतं. हे समजेउमजेपर्यंतच विषमतेच्या वादळात सर्वकाही नष्ट होऊन जातं. अमूर्त स्वप्नंदेखील त्या वादळात भरकटत जातात. उभं राहू पाहणारं त्या दोघांचं एक छोटेखानी घरही असंच अधुरं राहतं. त्याच्या उरल्यासुरल्या भिंती खिंडारासारख्या नकळत दोघांच्या मनातच कुठेतरी उभ्या राहातात. स्वप्नांची सतत बोचरी जाणीव करुन देतात. कधीतरी त्याच्या हातात गुंफलेले तिचे हात होते. आज मात्र तो मोकळ्या हातांनी नियतीचे दरवाजे ठोठावत फिरतो आहे. रस्ते कधी कसे का बदलून गेले हेच त्याला माहित नाही. समुद्राला साक्षी ठेवून जन्मभर साथ देण्याची वचनं, समुद्राकाठच्या मऊ वाळूतली त्यांची पाऊलं हे सारंच एका अनामिक लाटेमुळे वाहून गेलंय. मावळत्या सूर्याला शेवटाचा सलाम करुन तो त्या एकाकी अंधाराला चिरत दूरवर निघून गेला आहे.