सोमवार, २८ डिसेंबर, २००९

राजापुर गुंफा (पाचगणी)

पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे? तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.

उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.

गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).

वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.

गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.

फोटो अल्बमचा दुवा

************
************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: