सोमवार, ४ जानेवारी, २०१०

अशीच एक काळरात्र...

२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०



मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०

आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!

मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.

मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "


मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०

पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.

सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.

०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०


आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !