रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही.
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते. छोट्या छोट्या टपरीमध्ये हॉटेल्स चालू होती, घरगुती जेवणापासून एक धाबा पण गडावर पाहिला नवल वाटले. चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे ह्यांच्या मुळे गड असा गजबजून गेला होता. सुंदर मुली आपल्या आपल्या बुजगावण्यांना संभाळत आईसक्रिम खात इकडे तिकडे बागडत होत्या.
मला क्षणभर शंका वाटली व मनात आले चुकुन आपण सिंहगड सोडून कुठल्या तरी पिकनिक स्पॉटवर तर नाही ना आलो. पण थोड्याच वेळात जेव्हा मी थोडा पुढे गेलो तेव्हा शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा दिसला व त्याच्या जवळच गडाची माहीती.
मी सर्वांना निरखत पाहात गडाच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य हे पाहून थोडे मन विचलित होत होते. गडावर असलेली छोटेखानी हॉटेल्स पाहून खरोखर नवल वाटले, एतिहासिक वास्तू च्याजवळ प्रदुषण निर्माण करणारे कोणतेच कार्य होता कामा नये असा आदेश ह्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे शक्यतो महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याला माहीत नसावे की काय असा हाल.
गडावर पाहण्यासारखं काही राहिलेच नाही आहे, दारुचे कोठार, घोड्यांचा पागा, टिळक भवन व थोडीफार वाचलेली तटबंदी. निसर्गाच्या अवकृपे पेक्षाही जास्त अवकृपा मानवाने केली आहे ह्या गडावर. एखादे नितांत सुदर स्थळ कसे बरबाद करता येईल ते आपल्या कडून शिकावे जगाने. आरडाओरडा, दंगा ह्यांची रेलचेल दिसत होती. जेथे जेथे कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल व त्यांचे प्रणयचाळे.
गडाच्या तटबंदीबरोबर पुर्ण दोन चक्कर मारली गडावर फोटो घ्यावे असे काही दिसलेच नाही, व जेथे काही फोटॉ घेऊ असा विचार येत होता तेथे माणसांची गर्दी कमी होत नव्हती त्यामुळे आसपासच्याच निसर्गाचे फोटो काढले त्यातील काही निवडक फोटो येथे देत आहे.
1 टिप्पणी:
सुंदर प्रकाशचित्रे :)
आणि माहितीबद्दल धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा