बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ४

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

मार मार मारला... एकदम बैलाला मारावा तसा... चागंले अर्धातास धुलाई झाली वर घरी पत्र पाठवा व आई-वडीलांना बोलवून घ्या असा आदेश ही भेटला !
दुस-या दिवशी एक पत्र लिहले व अण्णाला दाखवले व अण्णाने ते पोस्टहॉफिस मध्ये स्वतः जमा केले (विश्वास नव्हता की जमा करेनच की काय माहीत नाही) संध्याकाळी मला बोलवले व एकदम आपुलकीने विचारले की "बाळा, येथे तुला काय त्रास आहे, का सारखा सारखा पळून जाण्याच्या मागे लागलेला आहेस ? " मी त्यांच्या चेह-याकडे पाहतच राहीला ... डुकरा सारखं रोज मारता वरुन सकाळी चार वाजता लात मारुन उठवता.. जबरदस्ती संध्याकाळी आठलाच झोपवता वरुन विचारत आहात की त्रास काय आहे मी मनातील हे सर्व प्रश्न मनातच ठेवले व गप्प बसलो.. त्यांनी एक कानाखाली वाजवावी ह्यासाठी हात उचलला असे मला वाटले पण त्यांनी तोच हात मागे घेत आपली मान खाजवली व जा म्हणाले व तेथून लगेच पसार झालो.. !

१० एक दिवसानंतर आई-बाबा आले रविवारी !
मी आईला बघून तीच्या कडे एकदम पळतच गेलो मिठी मारायला.. तोच एक जोरदार थप्पड गालावर पडला व त्या बरोबर मी देखील तेथेच मातील लोळलो... पुन्हा बाबानीं उठवला व पुन्हा एक वाजवली.. व म्हणाले " खबरदार पुन्हा येथून पळालास तर" माझा पुन्हा पोपट झाला होता... मी विचार केला होता की आई-बाबा आल्यावर सर्व अडचण सांगेन व ते मला घेऊन घरी जातील.. पण कैच्या कैक.. येथेतर उलटा मलाच मार बसला विनाकारण ! बाबा म्हणाले " तुझ्यावर पाचशे रुपये खर्च केले आहेत वर्षासाठी आगाऊ, वर्ष संपायच्या आत घरी आलास तर तंगडी तोडून लटकवेन घराबाहेरील खुट्याला" मी आई कडे बघतीलं व म्हणालो "मला बोलु तरी द्या" तोच आई म्हणाली " दादया, बाळा येथून सारखं सारखं पळून नको जाऊस... कोठे तरी रस्त्यात हरवलास तर काय करायचं... शाळापण बुडेल... तु नापास होशील... एक महीना झालाच आहे तुला येथे येऊन... तीन-चार महीन्यात दिवाळीची सुट्टी पडेल तेव्हा घरी ये ठीक आहे बाळा" बाळाला तोंडात बोळा घालून मारल्या सारखं मला वाटू लागलं होतं, कुणाला माझ्या दुखःचे काहीच वाटत नव्हतं.

मी पुन्हा रडारड चालू केली तोच निल आला व म्हणाला... " जरा हळू रड.. तो अण्णा बाहेर व्हराड्यातच आहे.. लगेच वर येईल... काकी तुम्ही काळजी करु नका... ह्याचावर हा काळी पळणार नाही... व ह्याच्यामुळे जी दुसरी मुलं पळायच्या तयारीत होती ती पण पळणार नाहीत... शाळेने व हॉस्टेलने गेटच्या बाहेर जाण्यासच मज्जाव केला आहे " मी त्याच्याकडे बघीतलं व म्हणालो " मी जाणारचं" बाबा समोर बसले होते... परत एक वाजवली... व म्हणाले " घरात आल्या आल्या तुला पंचगंगेत नाय फेकलं तर माझं नाव बदल" व आपल्या दाढीवर हात फिरवत तेथे आरामात बसले, आई म्हणाली " का उगाच पोराला मारताय, समजवून चार गोष्टी सागाच्या सोडून... तुम्ही मारु लागला.." जरा मला समाधान वाटलं.. व आईला माझी सर्व अडचण सांगितली तशी ती म्हणाली " ह्यामुळे तुला चांगलं वळण लागेल.. सकाळी लवकर उठणे.. रात्री लवकर झोपणे ह्या चांगल्या गोष्टी आहेत.. हेच येथे शिवतात बाळा.. तुझा सुभाषमामा पण येथे शिकला होता ... व तुझे अप्पाकाका पण "

अण्णा समोर मला घेऊन बाबा गेले व म्हणाले " गुरुजी, हा पुन्हा पळाला ना... पाय तोडून ठेवा.. पण हो येथेच शिक्षण होणार ह्याचं दहावी पर्यंतचं" व माझी शेंडी पकडून म्हणाले " पुन्हा येथून बाहेर पडलास ह्याच्या परवानगी शिवाय तर बघ " मी चिमणी एवढे तोंड करुन बसलो होतो... आईने घरुन.. बेसनचे लाडू , शंकरपाळ्या व चिवडा आणला होता माझ्या साठी त्या सगळ्या पिशव्या माझ्या ताब्यात देत म्हणाली " बाळा, वाटून खा, व आठवण आली की फोन कर शेजारच्या काकूच्या घरी हा घे नंबर त्यांचा नवीन फोन लागला आहे त्यांच्या घरी, हे घे दहा रुपये.. खर्चा साठी.. त्यांना सांगू नकोस.. जपुन खर्च कर" मी अजून पण रडतच होतो व एकदम बारीक आवाजात आईला म्हणत होतो.. मी नाही राहणार येथे.. पण बाबा जवळ आले की, मी फक्त मुसमुसत नाक फुसत असे.. दिवस भर मी हेच रडगाणे लागले... शेवटी आई पण वैतागली व एक रप्पाटा घातला व म्हणाली " कार्ट हाय काय... अवदसा.. सकाळ पासून माग लागलं आहे... येथेच रहा.. आता दिवाळीला पण येऊन नको घरी..." व आई-बाबा संध्याकाळी पाच च्या बसने निघून गेले !

मी एक पंधरा दिवस व्यवस्थीत एक ही चुक न करता हॉस्टेल मध्ये जगत होतो... एक दिवस देखील मार खल्ला नाही ! एके दिवशी रविवारी सहावीच्या वर्गातील सर्व मुलांना अण्णांनी बोलवलं व म्हणाले की दहा वाजल्या पासून सर्व जण डोंगरामागच्या शेतातून हिरव्या मिर्ची तोडण्यासाठी जाणे आहे तेव्हा आपले ड्रेस काढून ठेवा व नियमीत वापराचे कपडे घालून तयार रहा ! नऊलाच जेवण करुन मुलं तयार झाली व आम्ही रांगेने डोंगराच्या मागे जाण्यासाठी आड रस्त्याने जाऊ लागलो सर्वात पुढे अण्णा होते व मागे मागे मुलं... जरा चढण चढल्यानंतर दुस-याबाजूची उतरण चालू झाली व थोडा पाय घसरला म्हणून पुढील मुलाला पकडण्यासाठी पुढे झालो पण त्याला धक्का लागला व तो पडला... पुढील मुलावर असे करत पुढील पाची मुलं पडली व त्यांच्या सोबत अण्णा देखील! त्यांनी मागे वळून पाहीले तर मी हसत उभा होतो एका फांदीला पकडून ... त्यांनी तीच छोटी फांदी तोडली व त्याच हिरव्यागार फांदीने मला सोलून काढले व सर्वांना शेतामध्ये दोन दोने ओळी दिल्या मिर्च्या तोडण्यासाठी व मला एकट्याला दहा ओळी दिल्या !

अण्णाचा राग काही गेला नाही, कधी मध्ये समोर आलो तरी काही ना काही कारण काढून धम्माकलाडू मिळत असे पाठी वर ... असाच एक दिवस मार खाऊन रुम मध्ये आलोच होतो तोच निल म्हणाला " मला पण पळून जायचे आहे... आईची आठवण येत आहे खुप" मी हसलो व म्हणालो... " मला देखील येथून जायचं आहे पण .. कोल्हापुरला गेल्यावर बाबा मारतील... एक काम करु.. मी तुझ्या घरी येईन ठीक आहे.. दोघे मिळून पळू "
आई ने दिलेले पैसे होतेच जवळ.. बस आता योग्य वेळ व मोका हाती आल्या आल्या येथून पार होणे ठरलंच !

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: