मी म्हणालो " इतक्या लवकर ? " तो हसत म्हणाला " येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे... पाच दिवस झाले मला येथे येऊन... माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु"
एका मोठ्या हॉल मध्ये खाली लाकडाचे सहा सहा फुटी पाट व ओळीने बसलेली सर्व मुले.. व एका बाजूला स्वयंपाक घर व वाढपीची धावपळ ! प्रत्येकाच्या ताटात दोन गरम गरम भाक-या, भाजी व एका वाटीत ताक ( फोडणी घालेल्या ताकाला काय म्हणतात , विसरलो) व डाळीची आमटी ! घरात असलो असतो तर.. हे असलं जेवण कधीच घेतलं नसं.. ना वांग्याची भाजी.. ना शेपुची.. ना कांदा ना लसूण घातलेली आमटी... मी नाक मुरडतच पहीलं हॉटेलचे जेवण घेतलं व विचार केला की आता वर्ष भर हेच खावे लागणार आहे तेव्हा... गुमान खा ! जेवण संपवून ताट व वाट्या स्वतःच धुवायच्या ? छे ! हा एक नवीन त्रास जिवाला...
ताट व वाट्या हॉल मध्ये ठेऊन मी व निल मंदिरामध्ये फिरण्यासाठी निघालो... निल नांदेडचा व हुशार देखील होता शिक्षणामध्ये मागिल वर्षी पाचवी मध्ये तो आपल्या शाळेत प्रथम आला होता.. व देखील प्रथम आलो होतो... ( पण मागुन आमच्या जाधव बाई म्हणाल्या होत्या ) मी म्हणालो " निल जी मुलं आभ्यास करत नाहीत त्यांना हॉस्टेल मध्ये ठेवतात तु तर हुशार आहे.. मग तुला का हॉस्टेल मध्ये ठेवलं आहे तुझ्या आईवडीलांनी ? " तो म्हणाला " चांगले वळण लागावे ह्यासाठी, व सारखे सारखे हॉस्टेल काय म्हणतो आहेस हे गुरुकुल आहे.. आण्णाच्या समोर हॉस्टेल म्हणालास ना... धुलाई होईल" मी म्हणालो "अण्णा ? हो कोण ?" तो म्हणाला " वेताचा मार येवढ्यात विसरलास.. जे तुला मारत होते तेच अण्णा, गुरुकुलचे सर्व काही तेच पाहतात... रोज दोनचार मुलांची धुलाई करतात.. तेव्हा नियम पाळ... नियम तोडला की ... मार नक्की तो देखील सर्वांसमोर.. चल आता... संध्याकाळ झाली.. आठच्या आत हॉलमध्ये असायलाच हवे... लाईट बंद करतात नाही तर" मी म्हणालो " अरे, आठ वाजता झोपायचं ? अरे सवय नाही मला" तो म्हणाला" होईल सवय चल."
सकाळी चार वाजता... कोणी तरी पेकाटात लात घातली व मला जाग आली... समोर पाहीले तर आण्णा उभे ! " तुम्हाला पावणे चारची घंटा वाजलेली कळाली नाही ? " मी काही न बोलता.. मान खाली घालून उभा राहीलो होतो... तोच निल पुढ होत म्हणाला " चल, अंघोळीला जाउ.. टॉवेल घे आपला.." मी आपले कपडे व टॉवेल घेऊन अंघोळी साठी निघालो, कंबर जोरात दुखत होती... रागाने थर थर कापत होतो... पण करणार काय ? ... मी निल ला म्हणालो " कुठ जायचं आहे अंघोळीला ?" तो म्हणाला " तो म्हणाला " विहरी वर ! " थोड्या वेळातच विहरी वर पोहचलो, समोरचे दृष्य पाहून दंग राहीलो.... एक मोठी विहीर... त्या विहीरीला पाणी खेचण्यासाठी चार चार बालटी लटकवलेली... सगळे विद्यार्थी स्वतःच पाणी काढत होते बाल्टी डोक्यावर ओतून घेत होते.. झाली आंघोळ ! मी निल ला म्हणालो.. " थंड पाण्यानेच आंघोळ करयाची का ? मी नाही करणार... जरा उजाडल्यावर करेन पाणी गरम होईल तो पर्यंत " तो जोरात हसला व म्हणाला " आताच आंघोळ करायची, नंतर दिवस भर वेळ देखील मिळणार नाही व पाच नंतर विहरी वर सापडला कोणी की त्याची आण्णाशी गाठ नक्की " मी कशी बशी आंघोळ उरकली व नवीन आणलेले कपडे... शाळेचा गणवेश घातला... पांढरा शर्ट व काळी हाफ चड्डी !
साडे चार ला बरोबर... सगळे मैदानामध्ये जमले मी पण निल च्या पाठोपाठ तेथे पोहचलो , सगळे रांगेत उभे होते... लहान मुलांची एक रांग... त्यांच्या पेक्षा मोठ्या मुलांची एक रांग .. अश्या किती तरी रागा लागल्या होत्या... व समोर चबुत-यावर आण्णा हातात वेताची काठी घेऊन उभे होते व त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ वयाने मोठी मुले पाठी मागे हात घालून उभे होते... सर्वात प्रथम प्रर्थना व जिन वंदन केले गेले व थोड्या वेळाने व्यायामाला सुरवात झाली.... कधी हात वर तर कधी खाली... डावी कडे वाका... उजवी कडे वाका.. उड्या मारा.. व एक उडी चुकली व मी धडाम करुन खाली पडलो... सगळी मुलं हसली.. व आण्णा.. काही क्षणात तेथे पोहचले... दोन छड्या मारल्या पायावर व म्हणालो " पुन्हा पडलास, पाच फटके " व पुन्हा कसरत चालू !
मांडीवर वेताच्या छडीचे वळ पडले होते.. निल ने आचा-याकडे जाऊन थोडे हळद आणले व माझ्या वळांवर लावत म्हणाला " नियम पाळ.. गोट्या... नियम पाळ.. नाही तर रोज मार खाशील " मी म्हणालो " मी मुद्दाम थोडीच पडलो होतो.. चुकुन पडलो होतो.. " तो म्हणाला " चुकुन पण पुन्हा काही करु नकोस.. तो बघ... श्रेणीक येत आहे माझा नवीन मित्र आहे.. तो येथे दोन वर्षापासून आहे व आठवी मध्ये आहे तो..." तो श्रेणिक आला व माझ्या कडे पाहत म्हणाला " अरे छोट्या, तुच पडला होतास ना सकाळी " व हसू लागला. एक तर त्यांने मला छोट्या म्हणाला वर माझ्या वरच हसत होता... मी रागाने निल कडे पाहीले.. त्यांने लगेच श्रेणिकला म्हणाला " दादा, तो नवीन आहे.. घाबरला आहे... चार-पाच दिवसामध्येच ठीक होईल असे सगळेच हसले तर पळुन जाईल तो "
माझ्या डोक्यात एकदम विज चमकली "पळून जाईल तो " येथून पळ काढायचा आजच !
सहा ते सात मंदीरामध्ये भजन व सकाळी आठ वाजता जेवण हा रोजचा नियम ठरलेला व मी ह्याच वेळात पळून जाण्याचे ठरवले.. पेटी वजनाने जास्त मोठी होती व ती हात घेऊन बाहेर जरी पडलो तर सगळे समजतील मी पळून चाललो आहे... मी आहे त्याच गणवेश मध्ये पळून जाण्याचे ठरवले ! पुजे नंतर निल म्हणाला चल जेवण घेऊ.. मी भुक नाही असे सांगितले व एकटाच हॉल मध्ये बसून राहीलो. व पाच एक मिनिटाने गुपचुप पणे मी हॉलच्या बाहेर आलो व ग्राऊंड च्या बाजूने... विहीर जवळून शाळेच्या गेट पाशी आलो व बाहुबली मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या पाय वाटेने सरळ हातकलंगडे रस्त्यावर आलो.. मी वेगाने पळत पळत जास्त होतो अर्धा तास तरी पळालो... पण हातकलंगडे काही आलं नाही... पण एक गाव जरुर आलं .. तेथे एकाला विचारलं हातकलंगडे किती दुर आहे.. तो माझ्या कडे नखशिकांत पाहत म्हणाला " १२ कि.मी. आहे, हॉस्टेल मधुन पळून आलास ? " मी नाही म्हणालो व तेथून जाण्यासाठी मागे वळलो... त्यांने मानगुटीला पकडून सरळ सरळ वर उचलला मला व म्हणाला " पोरा मी तुझ्या सारखं लई नमुने बघीतली हाईत.. चल हॉस्टेल मध्ये" व आपल्या राजदुत वर बसवून... सरळ गुरुकुल मध्ये घेऊन आले.. व आण्णाच्या समोर उभे केले व म्हणाले " हे कबुतरं, पळून चाललं होतं.. नशीबानं मला सापडलं... लेकाचा.. त्या पोरं पळवणा-याच्या हाती लागलं असंत तर कळालं असंत... " आण्णा म्हणाले "पोलिस पाटिल, धन्यावाद तुमचे.. हा नवीनच आला आहे बघतो त्याला मी" चाललेला संवाद मला महत्वाचा नव्हता... बसणारा मार कसा चुकवावा ह्याचा विचार करत होतो.. तोच पाठीवर जोरात छडी पडली... पुढील पाच-दहा मिनिटामध्ये... दहा पंधरा थप्पड व सात-आठ छड्या पाठीवर... मांडीवर पडल्या व मी रडत खाली जमीनीवर लोळत होतो... आण्णा नी दोनचार मोठ्या मुलांना बोलावलं व मला उचलुन हॉल मध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितले !
थोड्यावेळाने निल मला खोत डॉक्टरांच्या कडे घेऊन गेला जे गुरुकुलचे डॉक्टर होते.. थोडा मलम माझ्या वळांवर लावत म्हणाले " कश्याला पळून जात आहेस.. बघ मी येथेच शिकुन गेलो होतो.. आता डॉक्टर होऊन येथेच सेवा करत आहे... आण्णा.. पण खुप शिकलेला आहे पण अविवाहीत राहून येथे सेवा करत आहे... येथे तुला खुप काही शिकायला मिळेल" थोडा मलम कागदावर देत निलला म्हणाले " रात्री झोपताना लाव एकदा !दिवस भर पडलेल्या मारामुळे मी हॉल मध्येच काढला, संध्याकाळी निल हात पकडून जेवण्यासाठी घेउन गेला... चालणे देखील मुश्कील होत होतं !
क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा