शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

काही क्षण...

काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण...
तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील..

*

हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत.

*

कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच.. मला माहीत आहे तुला मी आठवणे अशक्य आहे... ! पण कधी वाटते... अशीच तु देखील बसलेली असशील संध्याकाळी.. काहीतरी निवडत.. तांदुळ साफ करत.. डोळ्यावर येणा-या केसांना दुर सारत... बागड्यांचा किणकिटाट.. होत असेल.. तेव्हा कधी तरी.. तुला मी आठवत असेनच.. काही क्षणतरी नक्कीच... शक्यतो नाही देखील...माहीत आहे..

*

सर्व काही विसरणे तुला शक्य आहे हे मला माहीत आहे.. तशी तु मनाने खुप खंभीर.. पण तरी ही परवा तुला माझी आठवण आलीच असेल नाही.. तुझ्या लग्नाचा वाढदिवस... कितवा.. आठवत नाही आता.. पण तुला मी नक्कीच आठवलो असेल.. जेव्हा तुझ्यासाठी तो आनंदाचा दिवस तेवढाच माझ्यासाठी देखील.. तुझं लग्न व माझा वाढदिवस.. ! एकाच दिवशी. म्हणून तर मी म्हणत असे तुला की तु मला असे काही देणार आहेस जे मला जन्मभर लक्ष्यात राहील.. भेटलं मला ते... एक भळभळती जख्म... अशीच जर रक्त वाहत नसेल तरी ही मी स्वतःच्या नखाने.... !

*

मला वाटले होते तुला विसरणे सहज शक्य आहे.. असेच काही क्षण निघून जातील एवढाच वेळ मला हवा.. पण आता वर्षानु वर्ष गेली.. पण तुला विसरणे सोड... प्रत्येक नवीन जख्म पण तुझीच आठवण करुन देते... ! प्रेमाला बंध नाही हे मला ही माहीत आहे.. तु माझ्यापासून दुर आहेस हे माहीत आहे मला... फक्त सात पाऊले.. तरी ही ... ती सात पाऊले माझ्यासाठी सात जन्माची आहेत.. हेच मी विसरु शकत नाही आहे... !

*

खुप जणांनी प्रयत्न केला बरोबर चार पाऊले चालण्याचा.. कधी नशीबाने तर थट्टा केली... तर कधी मध्येच निसटुन जाणा-या हातांनी.. चालायचेच.. ! सगळ्यांना तुझी सर येणे शक्य आहे काय... काही प्रश्नांची उत्तरे मला माहीत आहेत.. तरी ही मी त्या प्रश्नाना मी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.. प्रत्येक वेळी.. नवीन उत्तर... ! हरकत नाही.. चालेल मला.. पण कधी तरी सात पाऊले तुझी संपल्यावर आठवण ठेव... मी उभा असेन असाच कोठे तरी.. तळपत्या उन्हामध्ये.. तुझी वाट पाहत.. नेहमी प्रमाणेच !

कल्पित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: