शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

माझे महान प्रयोग - २

माझे महान प्रयोग - १ मागील भाग.

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.

सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !

माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले... हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.

सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.

तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं... सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच ;)

७.२५ मिनिटे नंतर

मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत....

९.२५ मिनिटे नंतर

मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही ;) सरळ पाककृती विभागात क्लिकलो व मटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.

सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.

आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार - हाजीर.
पालक - हाजीर.
आलं - गैर हाजीर.
लसुण - हाजीर
मीरच्या - हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ - गैर हाजीर
तेल - हाजीर
प्लास्टीक पिशवी :? - सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )

म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी " आलं है ? "
तो " आलं ?"
मी " स्वारी, अदरक है ? "
तो " है"
मी " १०० गॅम "
तो " आगे "
मी " चावल का आटा है ?"
तो " क्या.. नही है."
मी " तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में"
तो " क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू"

त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.

१०.०५ मिनिटे नंतर

आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण.... ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला... घर घर घर... चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले ;)

एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.

आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !

पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले... ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.

आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले... (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले... तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले... मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला... आता मला तेल का हवे ते कळाले.

मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले... मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली... की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !

मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला... अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.

१०.४५ मिनिटे नंतर

दोन-तीन पराठे करपल्यामुळे... जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो ;)

चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !

संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर

"हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " - एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने.... बागे कडे सटकलो !

रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर

पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !

***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: