बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

प्रतापगड - एक सुरेख सफर

महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड... चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना ;) महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो ;) तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली :( व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.


जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !

गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!


मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.

* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.

३ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

एकदम मस्त आलेत फोटोज. मागे बऱ्याच वर्षांपूर्वी प्रतापगड केला होता मी. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या :)

भानस म्हणाले...

राज, फोटो खूपच छान आहेत.प्रतापगडावर जाऊन फार वर्षे झालीत. तुमचे सगळे वर्णन आणि फोटो पाहून पुन्हा एकदा गेल्याचा अनुभव मिळाला.:)

राज जैन म्हणाले...

thank you all.