सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...

परत चारींजीच्या जवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, व नवीन मार्ग शोधावा ह्या साठी मी प्रयत्न करु लागलो..राहण्याची सोय प्रथम केली व लगेच नेहरु प्लेस गाठले व नेहरु प्लेस मध्ये कमीत कमी ३००च्या वर संगणक दुकाने होती (आहेत व आज जास्त संख्या असेल)
दोन चार जणांशी बोलणी केली व एक छानशी नोकरी पकडली... महीना ३५०० वर पण हे पैसे पुरेसे नव्हते त्यासाठी लगेच थोडी धावपळ केली व संध्याकाळ साठी काम शोधले व तेथे ३०००.०० वर काम पक्के केले.. सकाळी ८.३० ते ५.० पर्यंत एका दुकानात व ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत एका दुकानात असे दोन शिफ्ट मध्ये काम पकडले... सगळं कसे मना प्रमाणे चालू होते, चार महीने एकदम व्यवस्थीत गेले व तेथे खुप काही शिकण्यासाठी देखील भेटले व मी आनंदात असतो तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती कोल्हापूरची. मला कोल्हापूर सोडून खुप काळ झाला होता... एकदा मनाचा ठीय्या करुन जवळच्या नातेवाईकांना फोन करावा व आई व वडीलांची खबर घ्यावी व माझी माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी हा विचार सारखा सारखा मनामध्ये डोकावू लागलाच होता तेव्हा फोन बुथ वर गेलो व नंबर फिरवला... पण नशीब अजून कच्चेच होते ... फोन बंद झाला होता. प्रचंड निराशा मनामध्ये घेऊन रुम वर आलो, तो पर्यंत नवीन नावाचा एक त्या गल्ली मधील मुलगा माझी वाट पाहतच उभा होता.. माझ्या जवळ येऊन त्याने मला आपल्या संगणकामध्ये आलेली अडचण सांगितली व मला घरी घेऊन गेला चांगलाच श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता तो.

काही वेळ संगणकाशी घालवल्यावर मी त्या संगणकातील अडचण दुर करुन त्याला दिली व त्याच्या कडून मोबदला घेतला, पण नवीन ने मला संगणक दुरुस्त झालेल्या आनंदामुळे बाहेर जेवणासाठी घेऊन गेला जेव्हा आम्ही परत आलो तो पर्यंत त्याचे वडील घरी परत आले होते त्यांनी माझी थोडीफार माहीती विचारली व आत निघून गेले, दोन एक दिवसांनी तोच नवीन मला बोलवण्यासाठी रवीवारी माझ्या रुम वर आला व आपल्या वडीलांकडे घेऊन गेला, त्यांनी आपल्या कंपनी मध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली व पगार तथा सुविधा दोन्ही बद्दल मला माहीती दिली, मी एक तारखे नंतर कंपनीसंगे काम करेन असे त्यांना सागून परत आपल्या रुम वर आलो, नेहरु प्लेस मध्ये जेथे काम करत होतो तेथे सुचना दिली व पगार तथा बाकी हिशोब पुर्ण केला.

दिल्ली पासून ३० एक कि.मी. वर गुडगांव मध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मला घेऊन गेले व काम तथा राहण्याची सुविधा दाखवली, तेथे १० एक संगणक व काही प्रिंन्टर होते व महाजालाची जोडणी व कार्यालयाच्या वरच मला राहण्याची सुविधा केली होती तेथे एक कपाट एक गादी व एक चादर ह्या वस्तू. लाईट ही असून नसल्यासारखी व भिंतीचा रंग येथे तेथे उडालेला व जागो जागी खड्डे तश्यात भरीस भर खिडकीला दरवाजाच नव्हता... पण जे मुफ्त मध्ये मिळाले ते काय वाईट असे ठरवून आपले सामान ठेवले. जेवणाची सोय विचारली तेव्हा मात्र माझी विकेट उडाली.. ते म्हणाले समोरच स्वयंपाक घर आहे तेथे सर्व सामान आहे व जे नसेल ते तु पाहा जेवण तुझे तुलाच करावे लागेल कारण कंपनीच्या आसपास कोठेही जेवणावळ / ढाबा नाही आहे..पुढे ४-५ किंमींवर धाबा आहे पण जाण्यायेण्याचा वेळ व खर्च पाहता तु येथेच जेवण तयार कर.

दिवसभर मला सुट्टीच दिली होती व सकाळ पासून मी उपाशीच फिरत होतो तेव्हा स्वयंपाक घरात जाऊन मी काय काय आहे ते पाहून घेतले सर्व सामान होते पण खुप मोठा प्रश्न होता जेवण तयार कसे करावे ? कारण मला जेवण तयार करताच येत नव्हते व कधी प्रयोग देखील केला नव्हता. तरी देखील प्रयोग करावा ह्या विचाराने मी तांदुळ निवड्ले व चुल पेटवली पाण्याचा अंदाज घ्यावा असे कुठे कुठे तरी मी जो स्वयंपाक करतो त्याच्या तोंडून कानावर पडले होतेच पण पाण्याचा अंदाज घेणे म्हणजे काय हेच माहीत नव्हते तरी देखील प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पाणी घातले व तादूळ घातले व त्यावर झाकण ठेवले व मी भात तयार होण्याची वाट पाहू लागलो, थोड्या वेळाने थोडा फार करपल्याचा वास आल्या आल्या मी पळत जाऊन आपला भात पाहीला सर्व बाजूने काळा पडलेला पण थोडाफार मध्ये चांगल्या (अर्ध कच्च्या अवस्थेत) अवस्थेत भात दिसला. तोच भात ताटामध्ये वाढून घेतला व थोडे लाल चटणी व तेथे मिक्स करुन माझ्या हाताचे पहील्याच जेवणाचा चव मी चाखला... आळणी मीठच घातले नव्हते तरी देखील तसेच वरुन मीठ टाकून मी आपले जेवण सुरु ठेवले कधी कच्चे / कधी जळलेले असे लाल चटणी / मीठ /तेल व भात असे विचित्रच नवीन डीश मी तयार केली... व जवळ जवळ एक महिना मी रोज एक विचित्र भात तयार करत असे व व रोज नवीन डीश जेवताना अनुभवत असे ह्या मध्ये ही मला खुप आनंद मिळायचा... पण प्रयोग करता करता महिन्यानंतर एकदा माझा भात नेहमीच्या भाताप्रमाणे तयार झालाच. भात शिकलोच होतो आता बारी होती आमटी अथवा भाजीची... आमटी व भाजी अर जे जे अत्याचार मी केले तेथे लिहणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते तेव्हा तो विषय सोडुनच देऊ. प्रचंड महनतीने भाजी शिकलो व चपाती करण्याचा अचाट प्रयोग चालू केला कधी रशिया तर कधी अमेरिका तर कधी कधी माझे आवडते कोल्हापुर अश्या आकाराच्या मी चपात्या ? तयार करु लागलो व जेवतानाच त्यांचा आकार पाहून स्वत:वरच हसत असे.

ह्या कंपनी मध्ये राहून मी जेवण करणे तर शिकलोच पण कसे जगावे हे देखील शिकलो ... आनंदाने जिवनातील प्रत्येक क्षण अनुभवत मी आपले जिवन गाडी ओढतच होतो व वेळ मिळेल तसे तसे घरी फोन करण्याचा प्रयत्न चालुच केला होता पण नंबर बदलल्यामुळे कुठेच कसलाही संपर्क होऊ शकला नव्हता.... प्रत्येक दिवस आनंदाने संपत असे पण रात्री वेळ काढणे जिवावर येत असे कारण ह्याच्या आधी मी लोकांच्या मध्येच राहत असे पण हा कारखाना संध्याकाळ नंतर जवळ जवळ मृत समान असे व अश्या वेळी मनामध्ये घराचे विचार, मित्र मंडळी, कोल्हापुर, पन्हाळा चे विचार भरकटत असत व प्रचंड मानसीक त्रास होऊ लागला व ह्या वर मला उपाय ही सापडला.. बियरचा रोज एक बियर व रात्रीची आरामाची झोप ना घराचा विचार ना स्वत:चा विचार फक्त जगत जाणे हा विचार डोक्यात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: