सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६

काही नवीन घरे व बदल पाहून आपलीच गल्ली कळेना हीच आहे की नाही ? पण घरमालकांचे नाव आठवत आहेत व त्यामुळे मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहीलो व त्यांना विचारले. पण त्यांच्या कडुन काही जास्त माहीती मिळाली नाही व मी विचार मग्न होउन परत रंकाळ्यावर पोहचलो व वडीलांचे जुने मित्र आठवू लागलो व एकदोन आठवले व मी त्याच्या जवळ मंगळवार पेठेत पोहचलो.
जोशीकाका , मी त्यांना नमस्कार केला व आपली ओळख सांगितली , त्यांनी मला सांगितले की सहा एक वर्षापुर्वीच वडिलांनी कोल्हापुर सोडले व सांगली जवळ कुठल्या तरी गावी राहण्या करता गेले. का गेले ? कसे गेले ? काय कारण होते ते काही कळालेच नाही खरंतर त्यांना देखील माहीत नव्हते.

पुन्हा मी शुन्य जागी पोहचलो होतो, मानसिक त्रास होतच होता व त्यात पाण्याच्या बदलामुळे मी अजारी पडलो. जरा जास्तच तब्ब्येत खराब होत होतवामी पुन्हा परत दिल्लीला जाणे ह्या निर्णयावर येऊन पोहचलो, जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे गेलो, वडीलांचा कडील कुठल्याही नातेवाईक / काका ह्यांना मी ओळखत नव्हतो ना त्यांचे घर माहित होते, आई कडील पाहून्याची फक्त नावेच आठवत होती पण ती लहान लहान गावे आठवत नव्हती.. काय करावे कसे करावे !

मी शिवाजी पेठ पासून बुधवार पेठ पायी फिरलो... काही खुणा दिसतात का... कुठला चेहरा ओळखिचा दिसतो का... हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जात होते.... शेवटी शेवटी मी घरातल्यांच्या भेटीची आस सोडून देऊ लागलो... तोच एक बस समोरुन गेली.... चिक्कोडी ! अरे हे गाव तर माहीत आहे आपल्याला मामाच्या गावी जाताना रस्त्यात पडत होते ...

मी सरळ दोन एक तासाचा प्रवास करुन चिक्कोडीला पोहचलो... व बसस्थानकांवरील उभ्या सर्व गाड्यावरील पाट्या वाचणे हे नक्की करुन मी ईकडे तीकडे पाहू लागलो तर .. तेथे ही एक अडचण उभी राहीली.. सर्व नावे कन्नड मध्ये... लहानपणी कन्नड येत होते पण वाचणे येत नव्हते.. फक्त बोलणे ईतकेच. दोन एक सिगरेट तेथेच उभ्या उभ्या मारल्या व बसस्थानकाच्या बाहेर आलो.

कोणी... निपाणी... निपाणी असे ओरडत होता... कोणी कागवाड.. कागवाड असे... त्याच वेळी रायबाग हे नाव कानावर पडले व मी तडक त्या मिनीबस जवळ गेलो व विचारले रायबागला जाण्यासाठी किती वेळ लागेल ? त्या मिनीबस मधून प्रवास करत मी रायबाग बस स्थानकावर पोहचलो... लहान पणी खरेदी साठी मामा बरोबर आलो होतो असे आठवत होते पण कसे ? कोठून हे काही आठवेना !
रायबाग मध्ये हाती काहीच लागले नाही , मी परत चिक्कोडी साठी बस मध्ये बसलो .. बसचा प्रवास चालू होता.. तोच एका छोट्याश्या स्थानकावर बस थांबली... व एकाने आरोळी दिली...नसलापूर... मी एकदम उभा राहीलो व म्हणालो.. " थांबा.. मी उतरणार आहे "
हेच माझ्या मामाचे गाव ! नसलापूर !
अजोबाचे घर शोधत शोधत मी जैन मंदीराजवळ आलो व एकाला विचारले ..."काका..अप्पासो मगदुम ह्यांचे घर ? " त्याने जैन मंदीरासमोरील गल्ली समोर बोट केले व म्हणाला... सरळ आत जा... आंब्याच्या झाडाजवळील घर" पण आता तेथे कोणी राहत नाही... ते सर्व गाव सोडून मळ्यात राहण्यासाठी गेले आहेत...

मळा.... कोठे शोधावा हा मळा... त्या माणसालाच रस्ता विचारला व मळ्याच्या दिशेने वाटचाल चालू केली !
गावा बाहेर दोन एक किलोमीटर चालत मी आलो.. जवळपास चिटपाखरु देखील दिसेना की कोणाला तरी विचारावे मगदुमांचे घर कोठे आहे !
अर्धा एक तास चालल्यावर एका शेतात एक आजोबा काम करताना दिसले, मी त्यांना जाऊन विचारले " काका, मगदुमांचे घर कुठे आहे ?' त्यांनी विचारले " मगदुम.. कोण ? मास्तर का ?" मी हो म्हणालो. त्यानी सांगितले की मी उलट दिशेला आलो आहे... पुन्हा त्यांनी मला रस्ता दाखवला व मी त्यांना नमस्कार करुन पुन्हा... घर शोधण्यासाठी पायपिट करु लागलो.
संध्याकाळ होऊ लागली होती.. समोरच काही घरे दिसत होती तेथे गेलो व त्यांना विचारले की हे मगदुमांचे घर का ?
एक बाई बाहेर आली व म्हणाली " हो, तुम्ही कोण ?"
मी म्हणलो " अप्पासो मगदुमांचा मी सर्वात लहान नातू.."
त्या म्हणाल्या " अप्पासो मगदुम तर वारले काही वर्षापुर्वीच "
मी थबकलोच... काय बोलावे हे कळे ना.. परत विचारले " मामा.. त्यांचा मुलगा ? "
ती म्हणाली " ते तर बेळगाव मध्ये राहण्यासाठी गेले आहेत.. आम्ही हे घर व शेत विकत घेतले आहे चार वर्षापुर्वी"
मी " त्यांचा काही पत्ता आहे तुमच्याकडे ?"
ती म्हणाली " माझ्या कडे नाही आहे पण माझ्या मुलाकडे आहे पण तो सर्विससाठी बाहेर गावी राहतो.. आल्यावर घेते, दोन महीन्यानंतर तो घरी येईल"
मी " तुमच्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? "
ती म्हणाली " आहे देते" थोड्यावेळाने तीने मला एक नंबर आणून दिला व मी तीला माझा नंबर दिला व म्हणालो " मी फोन करेन त्यांना, पण शक्य नाही झाले तर त्याना माझा फोन नंबर जरुर द्या."

मी परत चिक्कोडी ते कोल्हापूर आलो, रात्र झाल्यामुळे मी फोन सकाळी करण्याचा निर्णय घेतला व झोपी गेलो.
सकाळ सकाळी मी त्यांना फोन लावला व विचारना केली पण त्याच्याकडून काही पत्ता मिळाला नाही.. ते म्हणाले की दोन एक वर्ष झाली आमचा संपर्क नाही आहे...

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: