शनिवार, २७ मार्च, २०१०

१ तास..

आज अर्थ अव्हर म्हणून आपण मी मराठी संकेतस्थळ एक तास ८.३० ते ९.३० बंद ठेवले व एका नव्या प्रयोगास सुरवात केली. हवे तर एखादे चित्र टाकून, मुखपृष्ठ सजवून आपण हा दिवस साजरा करु शकलो असतो पण काल मस्त कलंदर हिचा धागा व निखिल देशपांडे ह्यांनी अर्थ अव्हर मोड्युअल बद्दल सांगितले व मनात आले आपण हा प्रयोग करायचा. ह्यांने काय होईल, काय फरक पडेल सदस्य काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला व एका प्रयोगास हातभार लावल्याचा आनंद मिळाला.

काही ठिकाणी ह्या प्रयोगाची खिल्ली उडवली गेली व काही जणांनी सरळ विचारले काय मिळाले हे करुन ? तर वर म्हणालो तसे एका प्रयोगात सहभागी झालो ह्यांचा आनंद मिळालाच पण आपल्या संकेतस्थळावरील वाचक व सदस्य ह्यांना आपण वेळेवर आठवण करुन देण्यात देखील यशस्वी झालो. इनमीन ताशी २००-३०० पानं पाहीली जाणारी आपली साईट व ताशी १०० एक वाचक व सदस्य असलेली साईट ह्यांनी आपले संकेतस्थळ एक तास बंद ठेवला म्हणून काय फरक पडला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ?

'प्रत्येक गोष्टीची सुरवात ही लहानच असते, शुन्यातून विश्व निर्माण होते' ह्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे व हाच विचार डोक्यात घेऊन आपण हा प्रयोग केला. जर आपल्या सदस्यांपैकी / वाचकांपैकी एकाने जरी हा २०१० चा अर्थ अव्हर पाळला असेल तर तर आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत ह्या प्रयोगात व हीच आपली सुरवात आहे. भारतासारख्या जेथे वीजेचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच गंभीर आहे तेथे असले अर्थ अव्हर पाळून काय होणार असा देखील एक सुर समाजात जाणवतो पण अश्या प्रयोगामुळे समाजामध्ये जागृती येते, ठीक आहे आपल्याकडे वीजेची टंचाई आहे पण जी आहे ती तर आपण जपून वापरायला शिकू अश्या प्रयोगामुळे त्यासाठी हा सगळा अट्टाहास. आजच्या ह्या एका तासामुळे आपण किती वीज वाचवली हे महत्वाचे नाही आहे पण आपण कमीत कमी वीज वाचवण्यासाठी सुरवात तरी केली हे महत्वाचे. आजचा दिवस संपला म्हणजे प्रयोग संपला असे नाही आपण वेळोवेळी अश्या प्रकारच्या सामाजिक बदल घडवणार्‍या प्रयोगांना समर्थन देऊ व शक्य तेवढा त्याचा प्रचार देखील करु.

इतर फालतु डे आपण आनंदाने व उत्साहाने पाळतो त्याच उत्साहाने व त्यापेक्षा द्विगुणीत आनंदाने हे असे सामाजिक उत्सव आपण पाळले पाहीजेत जेणे करुन आपली येणारी पिढी सुखाने ह्या धरतीवर श्वास घेऊ शकेल.

http://www.earthhour.org/ ही संस्था ह्यावर कार्य करत आहे व ह्यांनी जे मोड्युअल तयार करुन दिले होते ते वापरुन हा मराठी संकेतस्थळावर नवीन प्रयोग यशस्वीपणे राबवला त्यांचे व ड्रुपल चे अनेकानेक धन्यवाद.


***

आपण कसा व कश्या पध्दतीने अर्थ अव्हर पाळला व इतरांना तो पाळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले ह्या बद्दल आपण जरुर लिहा.


धन्यवाद.

मी मराठी,
व्यवस्थापक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: