रविवार, ७ मार्च, २०१०

कार्तिक कॉलिंग कार्तिक

एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली - असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो... घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो... व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे...... तो तोच आहे जो हा आहे... ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस... पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते... व चित्रपट एकदम बदलतो... सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते... हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: