शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

जगणं !

इकडे तिकडे बघताना जाणवतं की वाहत राहणे हा पाण्याचा गुणधर्म, जेथे पाणी थांबले तेथे डबके तयार होतं व चांगले साफ पाणी देखील खराब होतं. असाच काहीसा गुणधर्म जिवनाचा पण आहे, जिंदादिलीने जगणे म्हणजे जिवन, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस. जे आहे त्यात संतुष्ट राहणे चांगले आहे पण त्याच बरोबर काही तरी नवीन करण्याची जिद्द / ललक मनामध्ये असणे म्हणजे जिंदादीली, स्वप्न असावीत प्रत्येकाची, मनामध्ये एक धेय असावे, एक मुक्काम आपल्यासाठी ठरवलेला असावा तरच जगण्यात काही तरी मजा आहे, उगाच जगायचे म्हणून काय जगायचे ? गाढवासारखे ओझे वाहत जगायचे की काम करत आपली स्वप्ने पाहत, त्या स्वप्नांना पुर्ण करण्याचा ध्यास घेत उल्हासाने जगायचे हे आपल्याच हाती, जगता ना अनेक अडचणी येतात, दुखः येतात तर कधी कधी मानसिक त्रास होतो पण ह्यासर्वांना जो टाळून, त्यावर मार्ग काढून चालत राहतो तोच खरं जगणे जगत असतो.

दुखः कोणाला नाही आहे, सर्वांना काही ना काही दुखः आहेच ना, त्यांना उगाळत बसण्यापेक्षा जिवनाच्या उद्देशाकडे अर्थपुर्ण नजरेने पाहणं व त्याच दृष्टी ने वाटचाल करणे व आपल्या बरोबर आपल्या परिवाराला, मित्रांना व समाजाला घेऊन चालणे म्हणजेच जिवन. राग लोभ व मत्सर ह्या तर मानव जिवनाचा अविभाज्य अंग पण तरी ही असले गुण थोडा वेळ बाजूला काढले तर आपले जिवन किती सुखी आहे ह्या वर तुम्हाला आपोआप विश्वास बसेल. सिध्दांत व तत्वे ह्यांची योग्य सांगड घातली व थोडा नियमांचा हातभार आपल्या दैनंदिन जिवनाला दिला तर तुम्ही खरोखर एक उच्च पातळी गाठू शकता. प्रत्येकाचा एक प्रेरणा स्त्रोत असतो तो तुमचा दिपस्तंभ तुम्हाला जिवनात नेहमी मार्गदर्शन करत राहतो मग तो तुमचे आई-वडील, पत्नी, लेखक, एखादे पुस्तक, एखादा व्यवसायीक, फिल्मस्टार, एखादा चित्रपट, एकादे गीत, संगीत काही ही असू शकेल, जिवनाच्या यात्रे मध्ये अश्या ठरावीक अंतरानंतर भेटणारे दिपस्तंभच आपल्याला आपल्या मार्गावर व्यवस्थीत विचरण करता यावे ह्यासाठी आपल्या बरोबर असतात, जरुरी नाही आहे की ती प्रेरणा सरळ सरळ मार्गदर्शनातून मिळेल असे नाही पण त्याच्या कार्यातून, कलाकृतीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते, आपण आपले मार्ग स्वतःच ठरवतो पण त्या उद्दिष्ठाजवळ जाण्यासाठी आपण काही आधार घेतो ते आधार म्हणजेच आपले प्रेरणा स्त्रोत, त्यांचा हात हातात पकडला तर जिवन कसे सोपे सोपे वाटू लागेल.

आपलं लक्ष्य ठरवणं व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करणे ह्या दोन्ही गोष्टी साठी प्रेरणा तर असावीच लागते त्या बरोबर एक असाधारण असा गुरु देखील असावा लागतो ती गुरु म्हणजे कोणी शिक्षक अथवा मास्तर नाही, जिवनामध्ये कधी ना कधी एखाद्या वळणावर भेटलेला व्यक्ती, तुमचे आई-वडील अथवा पत्नी, कधी कधी लहान मुळे देखील गुरुचे काम करतात, जर तुम्ही सध्या टिव्ही वर एक जाहिरात येते ती पाहिली आहे का ? एक लहान मुलगा व त्यांचे वडील गाडी मध्ये बसलेले असतात, गाडी सिग्लनवर उभी आहे, व मुलगा आपण पुढे जिवनामध्ये काय करणार हे सांगत असतो व तो अचानक म्हणतो की बाबा एक आयडिया आहे मी मोठा झाल्यावर सायकल रिपेयरीचे दुकानच घालणार.. त्याचे वडील त्याच्या कडे एकदम चमकुन बघतात तर तो निरागस पणे म्हणतो की तुम्ही मोठी लोकं असेच जर विनाकारण पेट्रोल नष्ट करत राहिलात तर आम्ही मोठे झाल्यावर आमच्या साठि पेट्रोल कुठून येणार मग सगळे सायकलीच नाही का चालवणार.. ! किती उत्तम मार्गदर्शन ! पेट्रोल बचाव ची जाहिरात होती पण ती जाहिरात मला काही तरी शिकवून गेली माझ्या साठी तो लहान मुलगा गुरुच भले ही त्याचे डॉयलॉग कोणी दुस-याने लिहले असतील पण माझ्या पर्यंत ती भावना पोहचण्याचे कारण म्हणजे तो मुलगा त्यामुळे तोच माझा गुरु.

येवढ्या मोठ्या जगात काही ना काही उलाढाली चालूच असतात कधी चांगल्या तर कधी वाईट, त्याचा आपल्या जिवनावर प्रभाव पडतच असतो, परिस्थीती रोज बदलत असते, आजकाल मंदिचा बोलबाला आहे व तुम्ही आम्ही सर्वजण ह्यात जळत आहोत पण ह्यामुळे आपले मानसिक, घरगुती व सामाजिक स्वास्थ का आपण बिघडवायचे ? कोणी आत्महत्या करतो आहे कोणी आपल्या बरोबर आपल्या परिवाराचा देखील बळी घेत आहे, ह्याला कारण काय ? आपण बदल त्या परिस्थीतीला सामोरे जाण्यास कमी पडत आहोत का ? ह्या तून देखील मार्ग निघेल हा आशावाद का दिसत नाही आहे, सर्वत्र आशावाद ठेऊन चालत नाही हे मला ही माहीत आहे, कधी कधी समोरचा रस्ता बंद असतो तेव्हा आपण पर्यांयी मार्ग शोधतोच ना ? मग अश्या वेळी जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की आता काहीच मार्ग नाही म्हणजे तुम्ही हरला आहात असे नाही , तुम्ही खुल्ल्या मनाने नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्नच नाही केला असे आहे. जहा चाह वहां राह.. ही एक हिंदी मध्ये खुप चांगली कहावत आहे , ह्यावर विश्वास ठेवा, देवाची निर्मितीच ह्यासाठी झाली आहे की जेथे जेथे आपला विश्वास डगमगतो तेथे तेथे त्याचा सहारा घेता यावा व आपल्याला थोडा वेळ मिळावा की ह्या अडचणीतून कसा मार्ग काढावा पण जेथे संस्कार व जिद्द कमी पडते तेथे मग आत्मघात सारखे भयानक मार्ग अवलंबले जातात, ह्यातून ही मी बाहेर पडेन हा विश्वासच जेथे संपतो तेथे आत्महत्या होते भले ही तो माणूस मरु दे अथवा नाही ज्याचा स्वतः वरील विश्वास संपला तो संपला.


तुम्हाला काय वाटतं ?

तुम्ही आपल्या जिवनाचे उद्दिष्ठ व गुरु कसे ठरवता व तुम्हाला वेळोवेळी असे मार्गदर्शक भेटलेच असतील त्यांच्या बद्दल थोडं लिहा ही अपेक्षा, जेणे करुन जो खचला आहे त्याला थोडाफार मदतीचा हात मिळेल.

हे लिहण्यासाठी मला प्रेरणा ह्या बातमीतून मिळाली होती.

धन्यवाद.

पाप येवढे आहेत डोक्यावर...

कर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये ? जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे ! माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस... पण तुझे अश्रु देखील मी कधी फुसले नाही, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा देखील मी तुझ्या जवळ नव्हतो, कष्टांना तु आपलसे केलेस, माझ्यासाठी कधी तरी रक्त देखील सांडलेस.

जेव्हा तुला मी उमजलो तेव्हा देखील मी असाच होतो आज ही असाच आहे, सध्या वयाच्या बाबतीत मी अश्वथामा आहे, मरण नाही पण सुखाचा मणी कोणी तरी, कोणी तरी काय ज्याने दिला त्यानेच काढून घेतला आहे, भळभळती जख्म अशीच उघड सोडून दिली आहे त्याने माझ्यासाठी, एकच शब्द जगणे सोडला आहे माझ्यासाठी, पण का व कुणासाठी ह्याचा काही आधार ? मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची ? कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे ? हे शब्दजाल आहेत मला ही माहीत आहे कधी तुझ्या समोर मी हे लिहलेले बोलेन ह्यांची खात्री मला ही नाही तरी ही..

पण जाण्याआधी काही वचने आहेत काही संस्कार आहेत त्यांना पुर्ण करणे आहे, नांदत आहे ती दुस-यांच्या घरी तीचे देखील पहावयाचे आहे मला माहीत आहे त्यामुळे मी सध्या जिवंत आहे, एकुलती एक असली तरी काय झाले तीच्यासाठी देखील मी एकुलता एकच आहे, दुखःची काय कमी ह्या जगामध्ये, पण सध्या मी तुमच्या बरोबर सुखात ही नाही, किती घाव होत असतील तुझ्या मनावर ह्याची थोडीफार कल्पना आहे पण माझा ना-इलाज आहे, तु जी आहेस ते मी शत जन्मी देखील होऊ शकत नाही, तु जे भोगले ते सहन करण्याची शक्ती माझ्यात कधीच येणार नाही, पण मी तुझ्या पोटी आलो हे भाग्य माझे पण मी तुझ्या पोटी आले हे दुर्भाग तुझे आहे ..


तु जगलीस माझ्यासाठी, मी पण मी ? माझा अहंम, माझा मी व दुस-यांचे अधिकार, हक्क ह्यांना संभाळात मी तुझा हक्क कधी हिरावून घेतला हे कळालंच नाही, आज उमजलं आहे पण... ती वेळ निघून गेली आहे, तो काळ, ती वर्षे ते तप मागे पडले आहेत... तु माझ्यासाठी वेचलेल्या कष्टांना, तु माझ्या आठवणीमध्ये सांडलेल्या प्रत्येक अश्रुंचा मी देणेदार आहे, कर्ज आधीच तुझे माझ्या अंगावर होते... सध्या मी कर्जामध्ये दबलेला आहे...

किती स्वप्ने असतील व किती कल्पना तुझ्या माझ्यासाठी... भांडी घासलीस दुस-या घरची तर कधी कपडे धुतले.. नशेचा कहर तु झेलला जन्मभर.. मी देखील असाच अडाणी राहिलो, किती प्रयत्न केलेस तु मला शिकवण्यासाठी पण मी मुर्ख असाच शिकण्यापासून पळत राहिलो... माझ्यासाठी कधी पाटल्या विकल्या तर कधी मंगळसुत्रातील सोने.. तुला काय वाटले मला आठवत नाही ते दिवस, मी लहान होतो पण असाच निगरट होतो.. , माझ्यापुढे मी कुणालाच पाहत नाही, माझा गर्व माझा अहंम म्हणजेच माझे सर्वस्व आहे असेच समजत होतो पण एक एक करुन सगळे सोडून गेले कधी देवाची करणी तर कधी नशीबाची खेळी... कधी जिंकलो तर कधी हरलो पण ह्या खेळामध्ये मी तुला काही क्षण विसरलो.. त्याच कर्मांची फळे मी भोगली आहेत... ज्यांच्यासाठी जगलो तेच गेले.. आपल असं कोणीच राहिले नाही जवळपास, अमर नात्यांच्या ग्वाही देणारे आज पलिकडे बसले आहेत, मला ह्या जगात एकटेच सोडून... कोणी येतं काही क्षण मध्येच पण नाते न जपता फायदा जपून..पुढे निघून जातात असेच नेहमी प्रमाणे मला एकटे टाकुन !

आज तुझ्यापासून दुर आहे, हजारो किलोमिटर पण मनाने तुझ्या चरणावरच लोटांगण घातले आहे.. तु मला एकदा माफ कर, ह्या जन्माची कसर नक्कीच भरुन काढेन, पुढील जन्मात तुझ्या पोटी येईन !
पण ह्याची खात्री नाही, पाप येवढे आहेत डोक्यावर...

शेयर मार्केट (बेसिक) भाग -२

********

मागील भागात आपण शेयर्स म्हणजे काय हे पाहीले आता आपण ह्या भागात डिमेट अकाउंट कसे उघडावे व त्यासाठी काय काय करावे व काय पहावे ह्याची माहीती घेऊ.

तुम्हाला जर शेयर विकत घेणे असेल अथवा आयपीओ मध्ये शेयर साठी निवेदन करणे असेल तर तुम्हाला एक डिमेट अकाउंटची गरज असते, ते तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे आपले ड्रेडिंग अकाउंट तथा डिमेट अकाउंट ओपन करु शकता. जसे शेअरखान, रिलायन्स मनी, ५ पैसा, अलिट स्टॉक्स, अरिहंत कॅपिटल, एंजल ब्रोकर अश्या असख्यं संस्था उपलब्ध आहेत.

सर्वात प्रथम तुम्ही ज्या संस्थेत आपले डिमेट / ट्रेडिंग अकाऊंट उघडणार आहात त्या कंपनीची पुर्ण माहीती मिळवण्याचा प्रयत्न करा, जसे ह्यांची सेवा कशी आहे, सेवा कशी देते, ऑफलाईन ट्रेडिंग बरोबर ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा देते की नाही, ब्रोकरेज (दलाली) किती आहे, केव्हा पासून मार्केट मध्ये कार्यरत आहे, ह्यांचे मुख्य कार्यालय कुठे आहे व ग्राहकसेवा क्रेंद्र उपलब्ध आहे कि नाही व जर उपलब्ध असेल तर त्यांची कार्यक्षमता किती आहे इत्यादी.

संस्था जेव्हा तुम्हाला एक फॉर्म देण्यासाठी तेव्हा तो फॉर्म व्यवस्थीत वाचा व सर्व फॉर्म आपल्या समोर भरुन घ्या व जे जी कागदपत्रांची प्रत तुम्ही त्यांना देत आता त्याची एक नोंद आपल्या कडे ठेवा व सर्व कागदपत्रांच्या प्रतीवर स्वतःचे हस्ताक्षर करणे गरजेचे आहे व जेवढ्या प्रती असतील त्या सर्वांच्यावर हस्ताक्षर करणे गरजेचे. प्रत्येकाचा फॉर्मचा फॉर्मट वेगळा असतो पण काही छोट्या कंपनीचे डिमेटचे फॉर्म व ट्रेडिंग अकाउंटचे फॉर्म वेगळे असतात व त्यांना तुमच्या कागदपत्रांच्या प्रती देखील दोन दोन जातात.

तुमच्या जवळ पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे, जर पॅन कार्ड असेल तरच तुमचे डिमेट अकांउंट उघडू शकते हा नियम आहे, पॅनकार्ड वर पुर्ण नाव असणे बंधनकारक आहे ( काही जणांच्या पॅन कार्ड वर फक्त राज असे लिहलेले असते तसे पॅन कार्ड चालत नाही तर पॅनकार्ड वर तुमचे पुर्ण नाव हवे जसे राज जैन / राज कुमार.)
तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्यावर देखील पुर्ण नाव हवे.

काय काय कागदपत्रे हवीत.

१. पॅनकार्ड
२. बँक अकाउंट व त्याची स्टेटमेंट अथवा चेक वर तुमचे नाव प्रिंट असावे अन्यथा पासबुकची प्रत.
३. दोन / तीन पासपोर्ट साइज रंगीत फोटो ( जास्त जुना नको दोन-तीन महिण्यातच खेचलेला असावा)
४. पासपोर्ट / रेशन कार्ड / वाहनचालन परवाना / मतदान आयकार्ड / सरकारी सेवा संस्था मध्ये असाल तर तेथील आयकार्ड / रेंट अग्रीमेंट / टेलीफोन बील / लाइट बील.
५. इंनशोरंन्स पॉलिसी / कंपनी लेटरहेड वरील तुमची ओळख

तुमची ओळख दर्शवण्यासाठी (४) ची कागद पत्रांपैकी कमीत कमी एकची प्रत हवी.
तुमच्या पत्याची खात्री करण्यासाथी (२) , (४), (५) पैकी एकची गरज पडेल.
(१) व (३) गरजेचेच आहे ह्यासाठी दुसरा ऑप्शन नाही ;)

कागद पत्रांची तयारी झाल्यावर कंपनीने दिलेला फॉर्म एकदा वाचून घ्या व जो व्यक्ती तुमच्याकडून फॉर्म भरुन घेत आहे तो जेथे जेथे हस्ताक्षर करावयास सांगेल तेथे करण्याआधी येथे हस्ताक्षर का हे विचारुन घ्या समजवून घ्या व मगच हस्ताक्षर करा. जवळ पास कमीत कमी २८ व जास्तीत जास्त ३५ एक हस्ताक्षर करावी लागतात तेव्हा आपल्या पेन सुस्थितीत आहे ह्याची खात्री करुन घ्या :D
तुमच्या पॅन कार्डवर जे हस्ताक्षर आहेत तेच हस्ताक्षर जवळ जवळ सर्व जागी करावेत.

जेव्हा हस्ताक्षर करत असाल तेव्हा एक कॉलम येईल ब्रोकरेज स्लॅब चा.

हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याची पुर्ण माहीती घ्यावी.
ब्रोकरेज !
सर्व कंपन्या आपल्या आपल्या नियमाप्रमाणे ब्रोकरेज घेतात, पण जर शेअर मार्केट मध्ये सर्वात ठिसूळ कुठला नियम असेल तर हा ब्रोकरेजचा नियम.
कंपनी तुम्हाला १० पै / ५० पै असा भाव सांगत असेल तर त्याचा अर्थ आहे, डे-ट्रेडिंगसाठी १० पै / १०० रु. व डिलेव्हरीसाठी ५० पै / १०० रु.

हे समजण्यासाठी तुम्हाला डे ट्रेडिंग व नॉर्मल ट्रेडिग (डिलेव्हरी) म्हणजे काय हे समजावून घ्यावे लागेल.

१. डे-ट्रेडिंग - समजा तुम्ही आयसीआयसीआय चे १० शेयर ८०० रु. दराने तुम्ही ड्रेडिंग डे मध्ये (९.५५ सकाळी ) विकत घेतले व ८१० रु. दराने तुम्ही ते विकले ( ३.३० दुपारच्या आधी) ह्याचा अर्थ तुम्ही डे ट्रेडिंग केली व साठी तुमची ब्रोकरेज १० पैसे दराने लागेल.

२. डिलेव्हरी (नॉर्मल ट्रेडिंग) - समजा तुम्ही आयसीआयसीआय चे १० शेयर ८०० रु. दराने तुम्ही ड्रेडिंग डे मध्ये (९.५५ सकाळी ) विकत घेतले व ते तुम्ही ३.३० च्या आधी विकले नाही व त्याला आपल्या डिमेट अकांउट मध्ये जाऊ दिले ह्याचा अर्थ तुम्ही त्या शेयर्सची डिलेव्हरी घेतली व साठी तुमची ब्रोकरेज ५० पैसे दराने लागेल.

एक सुचना :- जेव्हा तुम्ही शेयर विकत घेता व जो पर्यंत विकत नाही तो पर्यंत तुमचे शेयर्स कंपनीच्या पुल अकाउंट मध्ये राहतात, पण तुम्ही एकदा शेयर्सची डिलेव्हरी घेतली तर ते शेयर्स तुमच्या डिमेट अकाउंट मध्ये येण्यासाठी तीन दिवस लागतात उदा. तुम्ही १ तारखेला शेयर्स डिलेव्हरी घेतली तर त्याचा पे आउट ३ तारखेला, ह्याचा अर्थ तुमच्या डिमेट मध्ये शेयर्स ३ तारखेला दाखवेल तो पर्यंत ते शेयर्स तुमच्या ब्रोकरच्या पुल अकाउंट मध्येच दाखवत राहील. डिलेव्हरी शेयर्स विकल्या नंतर ही पे आउट तुम्हाला तीन दिवसानंतरच भेटेल.


मार्केटमध्ये तुम्हाला १ पै / १० पै पासून ३० पै / ८० पै ब्रोकरेज घेणारे भेटतील... तुम्ही जेवढी घासाघासी भाजी खरेदी साठी करता तेवढीच येथे पण करु शकता.. नॉर्मली मार्केट मध्ये तुम्हाला ३ पै / ३० पै रेट नक्कीच भेटेल.

पुढील भागात आपण ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत एक ऑफलाईन ट्रेडिंग व एक ऑनलाईन ट्रेडिंग ते समजावून घेऊ.


क्रमशः

शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

प्रस्तावना : - मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल. मी काही सर्व काही माहीती आहे व माझीच माहीती आहे ह्या आवेशामध्ये लिहीत नाही आहे जर कुठे चुकत असेल तर जाणकारांनी योग्य तो प्रकाश टाकावा ही विनंती. ह्या लेख माले साठी मी दैनिक भास्कर / टिव्ही -१८ व माझा काही वर्षाचा अनुभव ह्यांची मदत घेत आहे.

धन्यवाद.


*********************

आपण रोजच्या जिवनामध्ये शेयर मार्केट, सेबी, सेन्सेक्स, बॉण्ड्स व डिबेंचर्स बद्दल वाचत, पाहत असतो त्याची माहीती येथे देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

सर्वात प्रथम स्टॉक म्हणजे काय ?
स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनी मध्ये तुमची हिस्सेदारी, समजा तुमच्या कडे रिलायन्सचे १०० शेयर्स आहेत तर तेवढ्या टक्क्याचे तुम्ही कंपनी मध्ये हिस्सेदार आहात, जर कंपनीला फायदा झाला तर कंपनीला तो फायदा तुम्हाला द्यावा लागेल जो तुमच्या हिस्सेदारी टक्के नुसार बनतो ( समजा रिलायन्स चे १०० शेयर तुमची कंपनीमध्ये १% हिस्सेदारी तय करतो तर तुम्हाला कंपनीच्या फ्रॉफिट मधील १% मिळेल) ह्याच स्टॉक ला शेयर्स अथवा इक्किटी नावाने देखील ओळखले जाते.

आता शेअर कसे खरेदी केले जाऊ शकतात ह्या विषयी
कैपिटल मार्केट दोन भागामध्ये विभागलेला आहे एक प्राईमरी मार्केट म्हणजेच इनीशियल पब्लिक ऑफ़र (आईपीओ) कंपनी त्यांना हवा असलेला फंड उभा करण्यासाठी सरळ सरळ पब्लिक मध्ये जाते व आपले शेयर्स विकतात आईपीओ द्वारा. सेकंडरी मार्केट म्हणजे ती जागा जेथे आयपीओ मध्ये मिळालेले शेयर एकजण विकतो व दुसरा विकत घेतो... सरळ साध्या शब्दामध्ये आपली एनईसी व बीएसई मार्केट आपली ट्रेडींग मार्केट.


ऑर्डिनरी शेयर्स
हे कुठल्या पण कंपनीमध्ये तुमची आंशिक हिस्सेदारी नक्की करतात व दरवर्षी तुम्हाला कंपनीच्या फायद्यातून डिविडेंड मिळत राहतो, समजा एखाद्या कंपनीचे शेयर्स तुमच्याकडे आहेत व काही कारणाने ती कंपनी बंद पडली तर जे जे हिस्सेदार आहेत त्यांना कंपनी ची असेट विकून समान रेशो मध्ये पैसे परत दिले जातात (प्रिफरेंशियल शेयर धारकांना आधी मिळतो)
प्रिफरेंशियल शेयर धारक चा अर्थच त्याच्या नावामध्ये लपला आहे मोठे गुम्तवणूकदार (कंपनीद्वारे / युनिटद्वारे खरेदी करणारे)


शेयर्स इश्यूड एट पार और शेयर्ड इश्यूड एट प्रीमियम मध्ये फरक काय ?
फेस / पार वैल्यु कुठल्याही शेयरची अनुमान करुन काढलेली वैल्यु असते, म्हणजे एखाद्या कंपनी ने आपले शेयर्स काढले तर ती आपल्या बैलेंस शीट मध्ये जी वैल्यु लिहते ती वैल्यु (सामान्यता कंपन्या १० रुं पासून १०० रु. पर्यंत पार वैल्यु दाखवतात) पण हा आकडा १० च्या गुणांक मध्ये पाहीजे (उदा. २५.५) कंपनी एकदा शेयर इनीशियल इश्यु च्या नंतर फेस / पार वैल्यु मध्ये बदल करु शकते.

एखादी कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा दराने शेयर मार्केट मध्ये काढते तेव्हा त्याला प्रीमियम म्हटले जाते, जर ती कंपनी सेबी च्य प्रॉफिटेबिलिटी क्राइटेरिया च्या रुल मध्ये बसते तेव्हा ती कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा जास्त दराने शेयर मार्केट मध्ये काढू शकते. (उदा. एक्सवाय कंपनीच्या पार वैल्यु १० रु. आहे पण कंपनी सेबीच्या प्रॉफिटैबिलिटी क्राइटेरिया रुल्स मध्ये बसते म्हणून ते आपले शेयर २५ रु. दराने काढू शकतात.. म्हणजे १५ रु. प्रिमियम. एक लक्ष्यात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कंपनी आपला डिविडेंड फेस / पार वैल्यु वर देते शेअरच्या प्रीमियमला जमा धरुन नाही.


आता नवीन शेयरची (आईपी) किमंत कशी ठरवली आते ?

इनीशियल पब्लिक ऑफर मध्ये कंपनी फिक्स्ड प्राइस मध्ये शेयर मार्केट मध्ये काढू शकते हे काम इश्यु ओपन होण्याआधीच केले जाते, कंपनीच्या शेअरची मागणी बाझार मध्ये कीती आहे हे कंपनीला इनीशियल पब्लिक ऑफर बंद झाल्यावरच कळते. ( अश्या पध्दती मध्ये शेयर मिळाले तर ते शेअर्स प्रीमियम शेयर्स मध्ये लिस्ट होतात व त्याचा फायदा तुम्हाला जेव्हा कंपनी बंद पडते तेव्हा होतो.)

दुसरी पध्दत आहे बुक बिल्डिंग - ह्यामध्ये आपल्याला माहीत नसते की ऑफर असलेल्या शेयरची मुळ किंमत काय असेल, कंपनी एक सांकेतिक प्राइज रेंज फिक्स करते, मग गुंतवणूकदार आपल्या आपल्या ऐपती प्रमाणे शेयर्स ना बोली लावतो ही बोली कंपनीने ठरवलेल्या प्राईज रेंज च्या आत काही ही असू शकते, फुल्ल सब्स्क्रिप्शन नंतर शेअरची किमत फिक्स केली जाते व ज्यांनी ज्यांनी गुंणतवणूक केली आहे त्यांना त्याच फिक्स किमतीनूसार शेयर आवंटीत केले जातात ( अनुभव सागतो की जेव्हा जेव्हा बुक बिल्डिंग मध्ये शेयर मिळतात त्यांना चांगली किंमत भेटते.) जर ओव्हर सब्स्क्रिप्शन झाले तर कंपनी ग्रीनहाउस ऑप्शनचा देखील उपयोग करु शकते.

ग्रीनहाउस ऑप्शन म्हणजे काय ?

जेव्हा जेव्हा चांगल्या कंपनीचे आइपीओ फिक्स केलेल्या आकड्यापेक्षा जास्त विकले जातात त्यांना ओवरसब्सक्राइब होणे म्हणतात, अश्यावेळी कंपनी ग्रीनहाउस ऑप्शन वापरते ह्या ऑप्शनद्वारे कंपनी अतिरिक्त शेयर मार्केट मध्ये काढते व गुंतवणूकदारांची मागणी पुर्ण करते. (पण ओवरसब्सक्रिप्शन च्या रेशोची माहीती कंपनीला आपल्या ऑफर डॉक्यूमेंट मध्ये आधीच द्यावी लागते.)

वरील कुठल्या हि पध्दतीने जर तुम्ही शेयर्स विकत घेता ते शेयर तुमच्या डिमैट अकाउंट मध्ये जमा होतात.



क्रमशः

बुधवार, २५ मार्च, २००९

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ३

आता शाळेचा व हॉस्टेलचा चांगलाच सराव झालेला होता, रोज सकाळी न चुकता मार खाऊन मी उठत असे, कसरत तथा आंघोळ इत्यादी करुन व्यवस्थीत पुजा करुन , पोट पुजा करुन व्यवस्थीत शाळेत जात असे, शाळेचे पाच तास मला खुप आवडायचे.. मार तेथे पण पडायचा पण वळ येण्याएवढा नाही त्यामुळे शाळेचा व माझा एक ऋणांनूबंध तयार झाला होता

असाच एके रवीवारी मी आपल्या हॉल मध्ये बसून गप्पा मारत होतो व बरोबर बुध्दीबळाचा खेळ देखील चालू होता माझ्या समोर निल बसला होता व तो थोडाफार चिटिंग करुन जिंकत होता असे मला वाटत होतं व मी जरा चिढल्यावर आवाज चढवून ओरडलो व थोड्या वेळात तेथे लढाई सुरु झाली .. व आमचा दंगा अण्णाच्या कानापर्यंत पोहचला व अण्णा तेथे पोहचले.. मी म्हणालो झालं.. पुन्हा मार ! जसे त्यांना माझ्या मनातील भावना कळालीच असावी त्यांनी सरळ मला पकडला व धुतला व निलला तोंडी चेतावणी दिली व निघून गेले..

मी निलवर चिढलोच होतो पण त्यांनी फक्त मलाच मारले ह्याचा खुप राग आला होता व मी रागाने सरळ डोंगरावरील मंदिराकडे जाण्यासाठी पाय-या चढू लागलो.. थोडा फार पुढे गेलोच असेन डोक्यात एक आयडीया आली व विचार केला पाय-या सोडून आडवाटेने वर जाऊ.. (आजकाल त्याला ट्रकिंग म्हणतात) व एकटाच व कधीकाळी तेथे चांगलेच जंगल वाटावे अशी परिस्थीती पण मी बिनधास्त होऊन वर चढत होतो व जरा वाईट रस्ता भेटला की रस्ता बदलत असे.. असा मी चांगला अर्धा एक तास चालत होतो पण माथा काही येत नव्हता त्यामुळे मी जरा थांबून मागे वळून पाहीले की आपण बरोबर रस्त्यावर आहोत की नाही.. पण खाली ना मंदिर दिसे ना मी समजलो, चढण चुकवण्यासाठी मी जो आडराणाचा रस्ता पकडला होता डोगराचे चक्कर घालण्यासाठी तयार झालेला होता व मी त्या रस्त्याबरोबर डोंगराच्या एकदम विरुध्द बाजुला आलो होतो.. व समोर पाहीले तर दुरवर हायवे दिसत होता... मी विचार केला की किती दुर असेल हायवे ? एक तासाचा रस्ता अथवा दोन ? येथून सरळ चालत गेलो तर ? कोणाला सापडणार पण नाही व सरळ मेन रोड.. कोणाकडून मदत घेऊन शिरोली नाका व तेथून कोल्हापुरात.. रेल्वे स्टेशन पासून सरळ चालत गेलं की दसरा चोक व सरळ पुढे गेले की बुधवार पेठ.. बस आलं घर !

डोक्यात कल्पना आली म्हणजे त्यावर लगेच अमंल केला पाहीजे ह्या मताचा मी.. सरळ उलट्या बाजूने चालत मी डोंगर उतरलो व त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो... शेतातुन.. आड रस्त्याने.. चालत चालत... सुखलेले ओढे पार करत मी हातकलंगडे रस्त्यावर आलो ना मध्ये गाव आलं ना कोणी पकडणारं ! मी एकदम खुशीत जवळ जवळ पळतच बस स्टन्ड वर आलो पण खिश्यात पैसे नव्हते.. बस ने कसे जावे ह्या विचार होतो व तेथेच बाकावर बसलो...

चार एक वाजत आले होते म्हणजे मी जवळ जवळ पाच तास हॉस्टेलच्या बाहेर होतो व कोणालाच पत्ता नव्हता .. पण माझ्या डोक्यात एक शंका आली.. साडेचार च्या प्रार्थेनेला मी दिसलो नाही की मग ते शोधायला सुरवात करतील व येथे देखील पोहचतील.. आई-बाबा आपल्याला पण रेल्वेनेच घेऊन आले होते येथे आपण पण रेल्वेनेच जाऊ या.. टिकीट घेण्याची पण गरज नाही... व लगेच पोहचू.. मी स्ट्न्डच्या मागेच असलेल्या रेल्वे स्थानकावर गेलो व कोल्हापुरला जाणारी रेल्वे विचारली !

तेथे कळाली की ५.४५ ला आहे ट्रेन.. मी तेथेच एका बाकावर बसलो... ५.३० लाच ट्रेन आली व मी ट्रेन वर कोल्हापुर नाव वाचले व बसलो ! पाच एक मिनिटानी गाडी सुटली .. पाऊण तासात थांबली देखील व आजु बाजूची लोक आपले सामान उचलून बाहेर जाऊ लागली त्यातील एक म्हणाला, मिरजेचे स्टेशन लई मोठं हाय नाही ! मी चमकलो... व खिडकीतून बाहेर बघीतलं तर कोल्हापुरचं स्टेशन वाटतच नव्हतं बाहेर... मी बाहेर आलो व बोर्ड बघीतला मिरज जंग्शन !

मनात एकदम गोंधळ चालू झाला ... कोल्हापुरची गाडी मिरजेला कशी आली ? की आपण चुकीच्या गाडीमध्ये बसलो ? परत कोल्हापुरच्या गाडीची वाट बघावी व कोणाला तरी विचारुन मग ट्रेन मध्ये बसावे ह्या विचाराने मी आजू बाजूला बघीतले तर तेथे एक आजोबा बसले होते आहात पुस्तके व बॅग घेऊन.. मी त्यांना विचारलं " आजोबा, कोल्हापुरला जाणारी गाडी कधी आहे ? " त्यांनी मला बघीतलं व म्हणाले... " येत आहे .. पाच मिनिटामध्ये.. आज लेट झाली नाही तर मिळाली नस्ती ही गाडी ... तु कोणा बरोबर आहेस बाळा ? " मी म्हणालो " एकटाच आहे.. चुकुन मिरजेला आलो.." ते गालातल्या गालात हसले ! दहा एक मिनिटानी गाडी आली व ते माझ्या बरोबरच गाडीत चढले... ! इकडचे तिकडे विचारल्यावर त्यांनी विचारलं " कुठल्या शाळेत शिकतोस " मी म्हणालो " बाहुबली हॉस्टेल मध्ये" ते म्हणाले " ठिक आहे"

थोड्या वेळाने अंधार पडला होता बाहेर... गाडी थांबली व आजोबा आपले सामान घेऊन उभे राहीले व म्हणाले " बाळा, जरा मदत कर ही पिशवी घेऊन बाहेर ये माझ्या बरोबर " मी सरळ त्यांची पिशवी उचलली व त्यांच्या बरोबर बाहेर आलो... जसा मी बाहेर आलो तसाच त्यांनी मला पकडला... व दोन कानाखाली वाजवल्या व जवळच असलेल्या हातकलंगडे स्टेशन मास्टरच्या केबीन मध्ये ओढत नेलं व त्यांना म्हणाले " हॉस्टेल वरुन कोणी मुलगा पळाल्याची खबर आहे काय ? " तो म्हणाला " हो आहे, एक सकाळ पासून गायब आहे.." त्यांनी मला त्याच्या हावाली करत म्हणाले " हाच तो, कळवा हॉस्टेला, बरं झालं मला मिरजेत सापडला.. स्टेशन वरच " माझं तोंड एकदम चिमणी एवढं बारीक झालं व पुन्हा मार पडणार ह्या विचाराने मी थरथर कापु लागलो.

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

क्रमशः

मंगळवार, २४ मार्च, २००९

( मदिराभक्ती )


मज ध्यास पिण्याचा रे, ना कसलीही सक्ती
अंतरात माझ्या वसते, व्हिस्की रमची मस्ती


मी तुझ्या मस्ती मध्ये गुणगुणतो
बाकी म्हणे जणू गाढव रेकतो
स्वप्नात ही माझ्या मी करतो व्हिकी रम ची मस्ती


मी गेलो वरती, तन ना-राही जरी संसारी
पिंडा बरोबर ठेवा एक बोतल छपरावरी
सिगरेट पण जर ठेवली मी अनुभवेन विरक्ती आणि मुक्ती


दिवस मनाला ग्रासे
तर ड्राय डे शापच भासे
तुजवाचून कसे जगावे उरली ना इच्छाशक्ती
सर्वस्व तुझ्यासाठी खर्चावे
पैसा ठेक्यावरी संपवावे
तुझसाठी पुन्हा कमवाया, उद्या मिळे पुन्हा शक्ती !


दारु मुक्त राहण्याचा निर्णय (नाखुशीने) घेतल्यामुळे आज हे दारुवरील शेवटचे विडंबन, क्रांति ह्यांच्या ह्या कवितेवर केलेली. क्रांति मॅडम आम्हाला माफ करतीलच ही आशा मनी धरून मी माझ्या आवडत्या सिग्नेचर ब्रन्डला वाहतो हे विडंबन.


रविवार, १५ मार्च, २००९

ए-दिले-नादान

कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं
वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है
यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है
यही होता है तो आखिंर यही होता क्युं है !


असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ? नाही गं तु वेडी व मी वेडा त्यामुळे आपण त्याची काळजी केली कारण तोच एक होता जो आपल्या सुख: दुख: चा साथी होता तो माझ्यापेक्षा जास्त तुझ्याजवळ होता, हजारो किलोमिटर दुरवर त्याच्या पासून मी तर तु काहीच पावलावर होतीस, पण जेवढे दुख: तुला झालं तेवढंच मला ही झालं, ते झाड नष्ट झालं, पण त्या बरोबरच आपल्या ही काही आठवणी ..तु त्याच्या पाठीमागेच विसावली होतीस कधी झाडाच्या माझ्या छातीवर डोकं ठेऊन... विसावली होतीस कधी आपल्या जगापासून अलिप्त राहून.. आपल्या प्रेमाचा अंकुर देखील तेथेच उमलला होता कधी, आज ते झाड आठवायचं तसं काहीच कारण नाही पण माझा नाईलाज. जुन्या आठवणी आल्या की ते झाड आपसूकच डोळ्यासमोर येतं व कळत न कळत अश्रु कधी गालावरुन ओघाळतात कळत ही नाही.

ए-दिले-नादान आरजु क्या है जुस्तजु क्या है ।
क्या कयामत है क्या मुसिबत है,
कह नही सकते किस का अरमां है
जिंदगी जैसे खोई खोई है, हैरा हैरा है ।


किती तर गोष्टी आपल्या जिवनाचे अविभाज्य अंग होत्या पण अचानक एक एक करुन सर्व गायब झाल्या जश्या वळवाचा पाऊस कधी आला व कधी गेला कळालंच नाही, नाही तुझ्या बद्दल मनात जराही किंतू परंतू नाही आहे पण तरी ही आज असचं सर्व आठवलं, वळवाच्या पावसावरुन आठवलं, तुला आठवतं का एकदा असाच मार्च मध्ये वळवाचा जोरदार पाऊस पडत होता व तु बाहेर मनसोक्तपणे भिजत आपल्या मैत्रिणी बरोबर पावसाचा आनंद घेत होतीस त्या चिंचेच्याच झाडाखाली मी उभा राहून तुला निहाळत होतो, तुझ्या डोळ्यातून तो मिश्कलीपणा मला अजून ही आठवतो, प्रत्येक सरी बरोबर तुझं ते गिरक्या घेणं व तुझ्या केसांच्या बटातून ते ठेंब ठेंब पाणी तुझ्या गालावरुन ओघाळणं, काहीच पावलांवर तर उभा होतो मी तुझ्या पासून, आज ही दिसतं आहे मला माझ्या डोळ्यासमोर तो क्षण, अरे हो तुझ्यासाठी ती काही मिनिटे होती माझ्या साठी तर ते क्षणच नाही का जे मी जपून ठेवले आहेत, माझ्यासाठी असे अनंत क्षण आहेत माझ्याकडे पण आजकाल ते क्षण देखील अपूरे पडता आहेत, असं नाही की काही कमी आहे पण मी पुर्ण नाही आहे हे मला जाणवतं आहे फक्त तुझ्यामुळे, असं का व्हावे, मी तुला का नेहमी आठवावे, कधी कधी वाटतं तु आपल्या जिवनामध्ये किती आनंदी आहेस का मी नजर लावावी, त्यामुळेच तर मी त्या दिशेला पाहणं सोडलं आहे कधीच.

कभी किसी को मुकमील जहां नही मिलता
कही जमीं यो कहीं आसमां नहीं मिलता ।


माझ्या समोर पर्याय नाही आहे मला कधी कधी जावसं वाटतं त्या शहरामध्ये, त्या गल्ली मध्ये त्या घरासमोर जेथे तु कधी राहत होतीस, आजकाल तुझी आई-वडील राहतात, तुझी आई मला ओळखत नाही कशी ओळखेल ती मला खुप वर्ष झाली मला भेटून पण तिला, पण मी वेडा जातो कधी कधी व त्या चिंचेच्या झाडाच्या जागेवर आजकाल छोटेखानी मंदिर आहे अगदी तुझ्या घरासमोरच, पण कधी काळी येथे बाग होती व समोर मोकळी जागा पण आज काल येथे उंच इमारती उभ्या आहेत एका कोप-यातून हलकचं तुझं घर दिसतं, ते गेत, तुझं अगंण दिसतं, तेथेच बाहेर बसतो वाटतं की तु अशीच धावत येणार व मला म्हणणार कुठे होतास तु ! पण त्याच वेळी मी भानावर येतो व मला आठवतं की आता तु येथे नाही आहेस. तुच काय तुझी ओळख दाखवणारं काहीच येथे नाही आहे, ना आजकाल कोणी तुझ्या घरासमोर पाणी शिंपडतं ना त्यावर रांगोळी काढतं.. ना कोणी त्या सुखलेल्या झाडांना पाणी घालतं, बिचारी ती झाडं... तुझ्या विना एकदम वाळली आहेत... माझ्यासारखी.

तुझं से नाराज नही जिंदगी हैराण हू मैं ।
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मै ।


आयपॊड वर गाणं वाजतं आहे, कधी कधी वाटतं का मी एवढा परेशान आहे का मी कुणाच्या प्रश्नाचं उत्तर देणं लागतो पण मला माहीत आहे प्रश्न माझेच आहेत पण उत्तरे माझ्याकडे नाही आहेत, उत्तरे मलाच शोधायची आहेत पण प्रयत्न अपूरे पडत आहे, तुझ्या शिवाय राहणं एक वेगळी गोष्ट पण तू आपली होणारचं नाही हे माहीत असून पण जगणं ही एक वेगळी वेदना, कधी तुला माझी आठवण येते का नाही माहीत नाही पण मी मात्र नेहमी अश्वथाम्याप्रमाणे आपली भळभळती जख्म घेऊन फिरत आहे, उरावर काही प्रश्न व त्या प्रश्नांची न सापडलेली काही सापडलेली उत्तरे घेऊन. तुझ्या नंतर ही कोणीतरी आलं होतं माझ्या जिवनामध्ये, अशीच तुझ्या सारखी हसतं खेळतं, कधी माझ्या जवळ आली मला कळालंच नाही, मला ती तुझ्यासंगे आपलं म्हणत होती पण दैव माझं नेहमी प्रमाणेच निष्ठूर, मला जे हवं ते मिळायलाचं नको हे ते नेहमी पाहत आलं आहे, दुख: खुप झालं, तु माझ्यापासून दुर जाणं मला जेवढ्या जख्मा देऊन नाही गेलं त्या पेक्षा अगणीत जखमा मला तीचं अवेळी जाणं देऊन गेलं, कधी कधी वाटतं तीच्या जागी आपण का नाही गेलो, तेथेच होतो ना मी पण. दैवाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं, मी एकटाचं होतो त्यामुळे त्यानं सोबतीला तुझ्या आठवणी बरोबर तीच्या आठवणी देखील कपाळी लिहल्या माझ्या जन्मभराच्या सोबतीला.

जिने के लिए सोचा ही नही, दर्द सभालने होंगे... ।
मुस्काराये तो मुस्कारानें के कर्ज उतारने होंगे ।


बरोबर, तेच करतो आहे, पण का ? ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे तुझ्याकडे आहे काय ? तु मला एकदा विचारलं होतसं की तु माझी जर झाली नाहीस तर, मी काय करेन. त्यावेळी ही माझ्याकडे उत्तर नव्हते व आज ही नाही आहे, तुझं स्वप्न आपलं म्हणून जगत आलो, सर्व विसरलो, शहरच्या शहरं बदलली, काय कमवले काय गमवले त्यांची तर किंमतच नाही पण ते स्वप्न पुर्ण झालं, पण त्या पुर्ण झालेल्या स्वप्नामध्ये कोण राहणार आहे, मी एकटाच. तुझ्याशीवाय जगणं शिकलो आहे पण तुझ्याशीवाय माझं अस्तित्वच नाही हे मी कसे विसरु. दिवस जातो गं कसातरी कामामध्ये, तक्रारी मध्ये, अडचणीमध्ये, हसतं, खेळत, लढत पण रात्र, जिवावर येतं कधी कधी जगणं देखील, मला माहीत आहे तु सप्तपदी घातली आहेस त्याच्या बरोबर्, प्रत्येक पावलावर एक जिवनाचं वचन, सात जन्माचं वचन तु दिलं आहेस, तुझ्या त्या वचनासाठी का होई ना पण मला तुझी सात जन्म वाट पाहावी लागेल त्याचं काय ? तु कधी विचार केला नसशील नाही, आस्तिक तर मी पण नाही एवढा पण फक्त तुझे शब्द पाळावेत म्हनुन जगतो आहे, नाही तर ह्या श्वासांची काय हिंमत तुझ्या विना एकक्षण देखील माझ्या बरोबर राहू शकतील. जीव देण्याचा भ्याडपणा मी कधीच करणार नाही हे तुला देखील माहीत आहे मला लढणं आवडतं पण समोर आलेल्या मृत्यला पण मी तेवढ्याच प्रेमाणे आलिंगन देईन हे नक्की.

हम भुल गये रे सारी बात पर तेरा प्यार नही भुले
क्या क्या हुवा दिल के साथ मगर तेरा प्यार नही भुले ।


मोठी माणसं म्हणतात मला, मी अडाणी आहे, मला भाषा कळत नाही, लिहता येत नाही, मी गांवढळ आहे, ना धड मराठी येत नाही ना धड कन्नड, हिंन्दी अथवा इग्रजी, काही शब्द माझे पण चुकतात, कोणी म्हणतं मी खुप वेगानं बोलतो, तर काही ना मी बोललेलेच कळत नाही , काही ना माझे शब्द कळत नाही तर काही ना माझी भावना, काही ना मी उथळ वाटतो तर कुणाला वाहतं पाणी, काही मला मित्र समजतात काही शत्रु तर काही मला ग्रहितच धरत नाहीत.. पण मला आता ह्या बद्दल काहीच वाटत नाही, कोण काय म्हणतो आहे, मी आहे तो असाच आहे, मी म्हणतो ती लोक वेड्याला शहाणं का समजता, माझ्यातला मी तर तेव्हाच गेला, जेव्हा ती गेली आता तर बस हा देह, ओझे वाहतो आहे वाहतो आहे कधी तरी मी पण मुक्त होईन, जेव्हा मी मुक्त होईन ना तेव्हा नक्कीच तुझ्या घरासमोरुन एक चक्कर मारेन, चुकून तु पुन्हा दिसशील, सकाळ सकाळी पाण्याचा सडा अंगणात घालताना, रांगोळी घालताना व चुकून तु बाहेर गेटकडे पाहशील तर तेथेच मी कुठे तरी कोप-यात उभा असेन तुला निहाळत , तेव्हा ना बंध असतील ना दैव. अशीच एक झुळुक तुझ्या गालाला स्पर्श करुन जाईल विश्वास ठेव तो स्पर्श माझाच असेल तुझ्या गालावर शेवटचा.

***

मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.