बुधवार, २५ मार्च, २००९

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ३

आता शाळेचा व हॉस्टेलचा चांगलाच सराव झालेला होता, रोज सकाळी न चुकता मार खाऊन मी उठत असे, कसरत तथा आंघोळ इत्यादी करुन व्यवस्थीत पुजा करुन , पोट पुजा करुन व्यवस्थीत शाळेत जात असे, शाळेचे पाच तास मला खुप आवडायचे.. मार तेथे पण पडायचा पण वळ येण्याएवढा नाही त्यामुळे शाळेचा व माझा एक ऋणांनूबंध तयार झाला होता

असाच एके रवीवारी मी आपल्या हॉल मध्ये बसून गप्पा मारत होतो व बरोबर बुध्दीबळाचा खेळ देखील चालू होता माझ्या समोर निल बसला होता व तो थोडाफार चिटिंग करुन जिंकत होता असे मला वाटत होतं व मी जरा चिढल्यावर आवाज चढवून ओरडलो व थोड्या वेळात तेथे लढाई सुरु झाली .. व आमचा दंगा अण्णाच्या कानापर्यंत पोहचला व अण्णा तेथे पोहचले.. मी म्हणालो झालं.. पुन्हा मार ! जसे त्यांना माझ्या मनातील भावना कळालीच असावी त्यांनी सरळ मला पकडला व धुतला व निलला तोंडी चेतावणी दिली व निघून गेले..

मी निलवर चिढलोच होतो पण त्यांनी फक्त मलाच मारले ह्याचा खुप राग आला होता व मी रागाने सरळ डोंगरावरील मंदिराकडे जाण्यासाठी पाय-या चढू लागलो.. थोडा फार पुढे गेलोच असेन डोक्यात एक आयडीया आली व विचार केला पाय-या सोडून आडवाटेने वर जाऊ.. (आजकाल त्याला ट्रकिंग म्हणतात) व एकटाच व कधीकाळी तेथे चांगलेच जंगल वाटावे अशी परिस्थीती पण मी बिनधास्त होऊन वर चढत होतो व जरा वाईट रस्ता भेटला की रस्ता बदलत असे.. असा मी चांगला अर्धा एक तास चालत होतो पण माथा काही येत नव्हता त्यामुळे मी जरा थांबून मागे वळून पाहीले की आपण बरोबर रस्त्यावर आहोत की नाही.. पण खाली ना मंदिर दिसे ना मी समजलो, चढण चुकवण्यासाठी मी जो आडराणाचा रस्ता पकडला होता डोगराचे चक्कर घालण्यासाठी तयार झालेला होता व मी त्या रस्त्याबरोबर डोंगराच्या एकदम विरुध्द बाजुला आलो होतो.. व समोर पाहीले तर दुरवर हायवे दिसत होता... मी विचार केला की किती दुर असेल हायवे ? एक तासाचा रस्ता अथवा दोन ? येथून सरळ चालत गेलो तर ? कोणाला सापडणार पण नाही व सरळ मेन रोड.. कोणाकडून मदत घेऊन शिरोली नाका व तेथून कोल्हापुरात.. रेल्वे स्टेशन पासून सरळ चालत गेलं की दसरा चोक व सरळ पुढे गेले की बुधवार पेठ.. बस आलं घर !

डोक्यात कल्पना आली म्हणजे त्यावर लगेच अमंल केला पाहीजे ह्या मताचा मी.. सरळ उलट्या बाजूने चालत मी डोंगर उतरलो व त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो... शेतातुन.. आड रस्त्याने.. चालत चालत... सुखलेले ओढे पार करत मी हातकलंगडे रस्त्यावर आलो ना मध्ये गाव आलं ना कोणी पकडणारं ! मी एकदम खुशीत जवळ जवळ पळतच बस स्टन्ड वर आलो पण खिश्यात पैसे नव्हते.. बस ने कसे जावे ह्या विचार होतो व तेथेच बाकावर बसलो...

चार एक वाजत आले होते म्हणजे मी जवळ जवळ पाच तास हॉस्टेलच्या बाहेर होतो व कोणालाच पत्ता नव्हता .. पण माझ्या डोक्यात एक शंका आली.. साडेचार च्या प्रार्थेनेला मी दिसलो नाही की मग ते शोधायला सुरवात करतील व येथे देखील पोहचतील.. आई-बाबा आपल्याला पण रेल्वेनेच घेऊन आले होते येथे आपण पण रेल्वेनेच जाऊ या.. टिकीट घेण्याची पण गरज नाही... व लगेच पोहचू.. मी स्ट्न्डच्या मागेच असलेल्या रेल्वे स्थानकावर गेलो व कोल्हापुरला जाणारी रेल्वे विचारली !

तेथे कळाली की ५.४५ ला आहे ट्रेन.. मी तेथेच एका बाकावर बसलो... ५.३० लाच ट्रेन आली व मी ट्रेन वर कोल्हापुर नाव वाचले व बसलो ! पाच एक मिनिटानी गाडी सुटली .. पाऊण तासात थांबली देखील व आजु बाजूची लोक आपले सामान उचलून बाहेर जाऊ लागली त्यातील एक म्हणाला, मिरजेचे स्टेशन लई मोठं हाय नाही ! मी चमकलो... व खिडकीतून बाहेर बघीतलं तर कोल्हापुरचं स्टेशन वाटतच नव्हतं बाहेर... मी बाहेर आलो व बोर्ड बघीतला मिरज जंग्शन !

मनात एकदम गोंधळ चालू झाला ... कोल्हापुरची गाडी मिरजेला कशी आली ? की आपण चुकीच्या गाडीमध्ये बसलो ? परत कोल्हापुरच्या गाडीची वाट बघावी व कोणाला तरी विचारुन मग ट्रेन मध्ये बसावे ह्या विचाराने मी आजू बाजूला बघीतले तर तेथे एक आजोबा बसले होते आहात पुस्तके व बॅग घेऊन.. मी त्यांना विचारलं " आजोबा, कोल्हापुरला जाणारी गाडी कधी आहे ? " त्यांनी मला बघीतलं व म्हणाले... " येत आहे .. पाच मिनिटामध्ये.. आज लेट झाली नाही तर मिळाली नस्ती ही गाडी ... तु कोणा बरोबर आहेस बाळा ? " मी म्हणालो " एकटाच आहे.. चुकुन मिरजेला आलो.." ते गालातल्या गालात हसले ! दहा एक मिनिटानी गाडी आली व ते माझ्या बरोबरच गाडीत चढले... ! इकडचे तिकडे विचारल्यावर त्यांनी विचारलं " कुठल्या शाळेत शिकतोस " मी म्हणालो " बाहुबली हॉस्टेल मध्ये" ते म्हणाले " ठिक आहे"

थोड्या वेळाने अंधार पडला होता बाहेर... गाडी थांबली व आजोबा आपले सामान घेऊन उभे राहीले व म्हणाले " बाळा, जरा मदत कर ही पिशवी घेऊन बाहेर ये माझ्या बरोबर " मी सरळ त्यांची पिशवी उचलली व त्यांच्या बरोबर बाहेर आलो... जसा मी बाहेर आलो तसाच त्यांनी मला पकडला... व दोन कानाखाली वाजवल्या व जवळच असलेल्या हातकलंगडे स्टेशन मास्टरच्या केबीन मध्ये ओढत नेलं व त्यांना म्हणाले " हॉस्टेल वरुन कोणी मुलगा पळाल्याची खबर आहे काय ? " तो म्हणाला " हो आहे, एक सकाळ पासून गायब आहे.." त्यांनी मला त्याच्या हावाली करत म्हणाले " हाच तो, कळवा हॉस्टेला, बरं झालं मला मिरजेत सापडला.. स्टेशन वरच " माझं तोंड एकदम चिमणी एवढं बारीक झालं व पुन्हा मार पडणार ह्या विचाराने मी थरथर कापु लागलो.

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: