सोमवार, १७ मे, २०१०

फसवणूक

आपण वेगवेगळे फसवणूकीचे प्रकार नेहमी इकडे तिकडे पहात असतोच. असाच हा एक मस्त किस्सा ! कितपत खरा आहे माहीत नाही पण ज्यांने सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकतो कारण तो गुडगावं पोलिस मध्ये होता ;)
स्थळ : गुडगाव, बादशहापुर.
काळ : जेव्हा प्रॉपर्टी मार्केट बुस्टवर होते तेव्हाचा ;)

*****




गावामध्ये एक घर.
कर्ता पुरुष काही वर्षापुर्वीच वारलेला.
बाईच सगळे बघायची, त्या जवळ जवळ न शिकलेलीच.
कमाईचे साधन शेत व दुसरे घर भाड्याने देणे.
लग्नाच्या वयाच्या दोन मुली.
बाई तशी चालाख इत्यादी नव्हती एकदम साधीभोळी.
मुली पण तश्याच.
त्या घरचे सगळे व्यवहार त्या तीघी मिळूनच चालवायच्या.

*

घराचा भाडेकरु तडकाफडकीचे घर सोडून गेला.
तीन-चार दिवसामध्येच एक ३०-३५ च्या आसपासचा व्यक्ती आला व घर भाड्याने मागितले.
दोन रुम व किचन असलेले ते घर, तीने मागितलेले भाडे व डिपॉझीट न कुरकुर करता दिले.
तो, तीची बायको व आई असे तीघे.
दोन एक महिन्यातच चांगलेच रुळले घरामध्ये.
त्या बाईशी देखील त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते.

*

एके दिवशी त्या व्यक्तीच्या आईची तब्येत एकदम खालावली.
हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले व सरळ दोन दिवसांनी बातमी दिली आई गेली म्हणून.
१५-२० दिवसाने ती व्यक्ती एकटीच परत आली.
तीच्या जवळ बसून तिला सगळी राम कहानी सांगितली.
हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर तीला हार्ट अटॅक आला व ती गेली,मग गावी घेऊन गेलो, तिकडेच सगळे उरकले. इत्यादी.

*

दुसर्‍या तिसर्‍या दिवशी तो परत घरी आला व एक मदत मागीतली.
तीला तो म्हणाला की आई वारल्यामुळे सगळे कर्जदार मागे पडले आहेत व त्यांना पैसे द्याचे आहेत.
मी माझे शेत विकावे म्हणतो आहे पण शेत आईच्या नावे होते व अजून ट्रान्सफर झाले नाही आहे माझ्या नावावर. तुम्ही मदत करा.
ती गोंधळली तिला वाटले पैसे मागतो की काय !
पण नाही त्यांने पैसे मागितले नाहीत एवढंच म्हणाला की तुमचे नाव व माझ्या आईचे नाव सारखेच आहे, तुम्ही माझ्या बरोबर त्या कंपनीत चला जी ते शेत घेण्यास तयार आहे तिकडे व त्यानंतर बॅकेत मी तुम्हाला एक टक्का देईन सर्व व्हवहाराबद्दल रोख मध्ये, जवळ जवळ दोन लाख रु..
आधी ती नाही म्हणाली पण दोन लाख मोठी रक्कम म्हणून तयार झाली.


*


हा तिला घेऊन कंपनी मध्ये गेला.
सगळे कागदपत्रे समोर उभे राहून सही करुन घेतले.
ह्या सगळ्यामध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ गेला.
दुसर्‍या आठवड्यात त्यांने वायदाप्रमाणे दोन लाख तिच्या हातात ठेवले.
त्यांनतर मोठ्या बँकेत जाऊन पैसे काढून आणले व तो पैसे घेऊन गावी जाउन येतो म्हणून निघून गेला.


*

फक्त सही करण्याचे दोन लाख मिळाले हे पाहून त्या बाईने दिवाळी साजरी केली.
मुलीं साठी दागीने घेतले, कपडे घेतले.
अर्धा गावाला नवर्‍याच्या नावाने जेवण घातले.

*

३-४ दिवशी ग्रामिण बॅकेचा शिपाई धावत पळत तिच्या घरी.
तिला घेऊन बँकेत गेला.
बँक मॅनेजर जवळ जवळ पळत येऊनच तीला आत घेऊन गेला.
व तीला बातमी सांगितली की तीच्या अकाउंट मध्ये ३ करोड रु. आले आहेत म्हणून.
हिला काहीच कळेना. गावच्या सरपंचापर्यंत बातमी गेली होतीच तो पण आला.
सगळेच गोंधळून गेले होते हीच्या खात्यात एवढे पैसे आलेच कसे.

*

तिला खोदून खोदून विचारल्यावर तीने दोन लाखाची कमाई कशी केली ते सांगितले.
सरपंचाला काहीतरी घोळ वाटला व तो तिला घेऊन साताबारा उतारा पाहण्यासाठी गेला.
तिथे पोहचल्यावर सगळे कळाले.
व सरपंचाने डोक्याला हात लावला व बाई ने तेथेच भोकांड पसरले....

*


तीची १० एकर जमीन त्यावेळी असलेल्या १ करोड प्रत्येक एकर भावाने तीनेच विकून टाकली होती त्या ठगाच्या फसवणूकीमुळे. तो ठग १० करोड घेऊन पळून पण गेला ! पण जाता ना त्याच्या मनात काय आले काय माहीत शक्यतो दया म्हणून तो ३ करोड तीच्या खात्यात भरुन निघून गेला.

*

पोलिसांची तपास चक्रे फिरली, सगळीकडे माहीती काढण्यात आली पण तो जो कर्ता होता तो कधीच ती बाई सोडून कोणाच्या समोर ही गेला नाही.
कंपनी मध्ये पण जेव्हा तो गेला होता तेव्हा गॉगल / दाढी व मोठी टोपी घालून गेला होता.
बँकेत देखील तसाच गेला त्यामुळे कोणीच त्यांची निट कल्पना देऊ शकत नव्हता.
त्या आधीच्या घरभाडेकरुला त्यांनेच धमकावले होते व पैसे दिले होते घर सोडण्यासाठी.
त्यांची बायको, आईच पत्ता नाही, शक्यतो त्या पण नकलीच.. असा पोलिसांचा कयास.
ह्यावरुन पोलिस फक्त एवढ्याच निर्णयावर आले की त्यांने खुप मोठा प्लॉन करुन ही फसवणूक केली.
फक्त त्या बाईचे नशीब की त्यांने जाताना ३ करोड तरी सोडले.. नाहीतर...

1 टिप्पणी:

THEPROPHET म्हणाले...

जबरदस्त डोकं लावलं भाऊने!