शुक्रवार, १४ मे, २०१०

बुडीत खाते

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.


**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.


त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता ;) त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते :D


मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी... ;) लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला " बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर......." मी म्हणालो " कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा."

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म ;) ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला " उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. " मामा म्हणाला "ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. " रात्रभर त्याला फुल्लपार्टी ;)


दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब ;) ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला "जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले" व म्हणाला "मी बघतो काय करता येईल ते." मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला "बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही." त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला " मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते "

मामाचे डोके फारच फिरले होते... त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला " बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार" असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला " काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल" तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला " चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही" मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला " आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते "


तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो " कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? " मामा ताडकन म्हणाला " धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे " मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला " दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत." मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला " राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. " मी म्हणालो " मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे" त्यावर माझा लगेच म्हणाला " ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस." आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.


मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले "मोजलेस का ? " मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले " मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या... " व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले....

" झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. " मामा ओरडला. मला काहीच कळेना... मी म्हणालो " म्हणजे ? " मामा म्हणाला " अरे टॉवरचे काम झाले" मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष... सगळेच खुष. ;)

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो...
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते....
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला " तु ते पॅकेट का नाही बघितलेस "
मी गोंधळलो मी म्हणालो " कुठले पॅकेट ??? "
मामा म्हणाला " अरे ते त्या बिहारीने दिले होते ते... "
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो " मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले... मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. "
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला " *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. "


मग कळली खरी हकीकत.... ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते...
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती...
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही...
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता...

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा... बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच... !

मामाने कप्पाळावरचा हात काढत... आमच्याकडे पहात म्हणाला " सात लाखाचे अजून एक बुडीत खाते.... "


आम्ही ओरडलो " काय ? अजून एक ? म्हणजे ? "

तो म्हणाला.... " सांगतो.... काय झाले माहीत आहे का.... "

३ टिप्पण्या:

THE PROPHET म्हणाले...

जबरदस्त राजभाऊ!
मस्त लिहिला आहेस प्रसंग..हल्ली पेवच फुटलंय फसवाफसवीचं..एव्हढी मेहनत चांगल्या कामात केली, तर ह्याहून जास्त कमावले असते त्यांनी!

Unknown म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
राज जैन म्हणाले...

सहमत आहे साहेब