शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दिवाळी...

काल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कप्डे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले... मी डोळे पुसत बाहेरची वाट धरली व मार्केटच्या बाहेर आलो...समोर बसण्यासारखी जागा पाहून तेथे बसलो... काही वर्षापुर्वीची दृष्य एक चलचित्रपटाप्रमाणे माझ्या नजरे समोर फिरु लागली...

राजा, लेका उठ, सकाळ झाली रे, तुला बाबा बरोबर दुकानावर जायचे आहे ना.. उठ लवकर.
दिवाळीच्या १५ दिवस आधी पासून आमच्या घरातली सकाळ जवळजवळ रोज ह्याच वाक्याने होत असायची.
आई घरात आलेले कपड्यांचे गठ्ठे उसवायला बाबांची मदत करत असे व अक्का ते साईज वाईज लावत असे व बाबा ते आपल्याजवळ असलेल्या बिलावरुन माल बरोबर आहे की नाही हे नोंद करत असत, मी डोळे चोळत उभा राहूपर्यंत त्यांचे अर्धे काम झाले असायचे, व मला बाबा म्हणायचे राजा तयार हो लवकर साडे-सातच्या आत साफसफाई करुन दुकान उघडू आपण.. बोहनी चांगली होईल आवर पटापटा. मी जरा अनिच्छेनेच अंघोळ इत्यादी करुन तयार होतं असे व तो पर्यंत बाबा आपले नाष्टाकरुन पुढे गेलेपण असायचे मागे माझ्यासाठी दोन पिशव्या माल ठेऊन जायचे. मी नाष्टा करुन तयार होऊपर्यंत अक्का दुसरा गठ्ठा सोडवून त्यातला माल मोजायला बसायची.. तीला पाहून कधी हसू येत असे तर कधी राग. हसू ह्यासाठी की ती मोजता मोजता चुकायची.. माझ्या पेक्ष्यालहान वयाने व राग ह्यासाठी की हिच्यामुळे मला शिव्या बसायच्या कारण ही लहान असूनपण काम करायची.

मी पिशव्या घेऊन दुकानात पोहचूपर्यंत बाबा रोडवर पाणी मारुन झाडून मारुन साफसफाई आवरलेली असायची व कपडे लटकवण्याचे लोखंडी स्टॆन्ड लावून मोकळे झालेले असायचे व नवीन आलेला माल साईजप्रमाणे एका जागी जमा करत बसलेले दिसायचे, दुकान... दुकान कसले ज्याला ना शटर ना कुलुप.. महाद्वाररोडवर ड्रेसलॆन्ड दुकानासमोर ची ५ बाय ५ फुटाची जागा, कधी बाबा ह्याच ड्रेसलॆन्ड दुकानामध्ये २५० महिना पगारीवर नोकरी करत पण स्वत:च काम चालू करु म्हणून नोकरी सोडून मालकाच्या परवानगीने ड्रेसलॆन्डच्या बाहेरच दुकान थाटले.. १०-१० चे प्लॆस्टिकची चटाई व कधीमधी पाऊस पडला तर एक्स्ट्रा हिस्सा झाकायला कामी यावा म्हणून.. आधी गांधीनगर मधून माल आणत पण जरा स्वस्त मिळते म्हणून स्वत: मुंबईला जाऊन आता माल घेऊन येत असत.. बाबा एक वर्षाच्या लहान मुलीपासून १४-१५ वर्षाच्या मुलीचे ड्रेस विकत असतं व मला ह्याचा खुप राग.... कारण वर्गात मुले चिडवायची.. कधीमधी... आला लेडिज ड्रेसवाला म्हणून..

सकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान एकदम नटून थटून तयार होत असे.. व आता वाट बघायची ती फक्त बोहनीची... बोहनी होत नाही तो पर्यंत बाबाजवळच्या मित्राजवळ बसून नवाकाळ वाचायचे व चहा चालू असायचा कधीमधी ग्राहक आले की लगेच उठून येत असत व ग्राहकाने खरेदी केली तर ठीक नाही तर परत मित्राच्या दुकानात.. त्यांना वाटायचे ग्राहकाची वाट बघितली तर ते येणारच नाही. मग कधीकधी दहा साडे दहाच्या आसपास बोहणी होत असे व मग बाबा खुष, एकदा बोहणी झाली की मग काही हरकत नाही कधीकधी बोहणीसाठी बाबा आपल्याला पडलेल्या किमतीला पण कपडे विकत व स्वत: मागून एक रुपया त्या ग्राहकाकडून घेत व म्हणत " ताई, हीच गं आजची दिवसाची कमाईची सुरवात." व ती बै हसून तो एक रुपया आनंदाने देऊन जात असे व बाबा तो एक रुपये आपल्या जवळ्या ड्ब्बात आई आंबाबाईच्या फोटोवर ठेवत व म्हणत... आई तुच बघ गं... तुझ्यासाठीच ही सुरवात. तो पर्यंत आई व अक्का घरातले काम संपवून आमचे डब्बे घेऊन हजर होत असतं...

जसाजसा दिवस चढत जाई तसे तसे खरेदीदार वाढत जात... मी साईजनूसार कपडे काढून देणे व ग्राहकांनी विसकटलेल्या कपड्यांची घडी घालणे हे काम करत असे व जेव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा गल्यातील पैसे क्रमवार लावत असे तेव्हा बाबा म्हणायचे राज्या लेका तु दहादा मोजलेस तरी पैसे तेवढेच राहणार ... मी त्यांना म्हणत असे बाबा असेच कपडे विकत राहिले तर आपण दिवाळीच्या दिवशी काय विकणार माल कमी पडेल ना.... मग ते म्हणायचे राजा लेका तुझ्या तोंडात साखर पडो... माझ्यामुळे पण आमच्या दुकानात जरा खरेदी जास्त होत असे असे मला वाटायचे तसे बाबांना पण वाटायचे कारण माझ्या शाळेतील सर्व मुली आमच्याकडेच ड्रेस घ्यायला येत असतं दिवाळीच्या... डिस्काउंटसाठी. अक्का व मी एकाच शाळेत असल्यामुळे माझ्या वर्गमैत्रीणी चांगल्या अक्काला माहीत होत्या.. एखादी आली खरेदीला की मी लगेच पुढे होत असे व ती म्हणायची मागून.. आली सटवाई.. हे येडं गेले बघ...तिच्यामागे.. मी डोळे वटारुन बघायच्या आधीच बाबा तीच्याकडे बघायचे व खुद करुन हसायचे...व स्वत: मागे जाऊन बसायचे व मला पुढे करायचे.... मी तिला आवडेल असे ड्रेस काढून दाखवत असे व तिच्याकडे बघत.. काही तरी भलाताच भाव सांगायचो.. जर जास्त सांगितला तर तिच्या बरोबर असलेली आई-मावशी-आजी बोलायच्या आत बाबा बोलायचे राजा लेका भाव तो नाही आहे... तो आहे. व कधी कमी सांगितला तर काहीच बोलायचे नाहीत व जेव्हा तीची खरेदारी संपत असे व ती निघून गेली असे तेव्हा ते मला म्हणायचे... राजा तुझ्या खात्यात ते २० रु. तीला तु खरेदी दरापेक्षा दहा रु कमी दर लावलास व दहा रु फायद्याचे... ते पण तुझ्याखात्यात.... आई व अक्का फिस्स करुन हसायच्या व मी बाबांच्या मागे बाबा मी घेईन त्यांच्याकडून ते पैसे... कारण दिवाळीच्या फटाकामध्ये व कपड्यामधून ते वजा होणार हे मला पण माहीत असत असे...

दिवसामागून दिवस जात होते.. दिवाळी सहा दिवसावर होती मला आठवतं... माल जवळजवळ संपत आला होता... बाबा खुष होते... पण अजून विक्री झाली असती व फायदा अजून झाला असता असे त्यांना राहून राहून वाटत होते...त्यांच्या मनात काय आले काय माहीत व चार वाजताच मला म्हणाले... राजा तु मुंबईला जा रातच्या गाडीने. झाले आई एकदम म्हणाली..... असे काय करत आहात हा एवढासा.. वर त्याला मुंबईला पाठवत आहात... कुठे हरवला तर... ? तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या.. बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे ? पण मी हो म्हणालो व बाबा जाम खुष... माझ्याकडे पैसे दिले... २४००० रु. सगळे पाचशेच्या नोटा.. कुठल्यातरी सेठ कडून लहान नोटा बदलून मोठ्या नोटा घेऊन आले होते बाबा.. त्या बरोबर माझ्या खर्चासाठी व गाडी भाड्यासाठी पाचशे रु सुट्टे.. जिवनात पहिल्यांदा मुंबई... !

बाबांनी मला रात्रीच्या कोल्हापुर मुंबई बस मध्ये चढवलं व कंडेक्टरला सांगितले की न विसरता ह्याला दादरला उतरवा. जवळ असलेल्या पैसे व त्याच्या काळजीमुळे मी एक मिनिट झोपलो नाही... ना काही खाण्यासाठी उतरलो... बरोबर दादरला मी उतरलो व बाबानी सांगितलेले काम पुर्ण करुन मी सरळ कोल्हापुरच्या गाडीत बसलो.... सकाळी साडे पाचलाच बस कोल्हापुर मध्ये आली जवळ जवळ दिड तास आधी.. कपड्यांची भले मोठी चार-चार गठ्ठडे व मी चिमुरडा पोरं... एक दोन प्रवासी व कंडेक्टर ने मदत करुन सगळे गठडे गाडीवरुन खाली उतरवून दिली, मी आता काय करावे ह्याचा विचार करत उभा होतो तोच समोर एक रिक्षा दिसली. मी त्याला बोलवले व म्हणालो मला बुधवार पेठेत जायचे आहे, हे सामान आहे बरोबर.. त्याने मला वरुन खाली पर्यंत बघीतले व म्हणाला चल.. कसेबसे मागील सिटवर सर्व गठडे त्यांने दाबून दाबून भरले वर मला आपल्या सिटजवळ बसून सरळ टाऊन हॉल मार्गे बुधवारपेठेत रिक्षा उभी केली व म्हणाला घर सांग रे बाळा.. तेथेच पोहचवतो. नाही तर तू हे सामान कसे घेऊन जाणार.. मी त्याला बोळा बोळातून घेऊन घरासमोर रिक्षा उभी केली.... व पळतच वर गेले.. तेव्हा आम्ही दुस-या माळ्यावर राहत असू.. आतातून आवाज येत होता..... बाबांचा आवाज होता... अगं पावणेसात झाले पोरं आलं असे स्टेन्डवर.. एवढं वझं त्याच्याजवळ असेल व त्यातून थकलं पण असेल ते... नाष्टा राहू दे मी जातो...... दरवाजा उघडला व मी बाबाच्या𐑪समोर... मी गच्च्च मिठी मारली बाबांना व म्हणालो.... मला नाही जायचे आहे परत कधी मुंबईला.. !

रिक्षावाल्याचे पैसे देऊन बाबांनी सर्व गठ्ठडी उतरवली व त्या रिक्ष्यावाल्या बरोबर वर आले व आईला म्हणाले अगं चहा टाक दोन कप. मी आपला आईच्या पदराबरोबर खेळत म्हणालो... आई भुक लागली आहे.. आई ने माझ्याकडे बघितले व म्हणाली.... बस. तोपर्यंत हे बेसनचे लाडू खा व मी करते तुझ्यासाठी काही.... जास्त वेळ नाही फक्त २८-३० एक तास घरातून बाहेर होतो मी.... गेलो व आलो... कुठेच सामान सोडून उतरलो नाही... अन्नाचा एक कण माझ्या पोटात नव्हता... रिक्ष्यावाला गेला तेव्हा मी बाबाच्याकडे गेलो व मी त्यांना त्या सेठ ने दिलेले बिल व मालाची रिसीट दिली व वाचलेले सर्व पैसे बाबांना परत दिले व म्हणालो... मी झोपू... ! बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे... आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे ? तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... !

कधीच विसरु शकणार नाही अशी ही माझी दिवाळी.... शेवटची दिवाळी....त्यानंतर कधीच वेळच नाही आली दिवाळी साजरी करण्याची.... बाबांचे काम कधी व कसे बिघडले व कधी मी दुरदुर होत एवढा दुर झालो की... शेवटं दर्शनपण दुर्लभ झाले... का हा प्रश्न मला तर नेहमी पडतो... अल्लडपणा.. नादानपणा ह्या नादात मी खुप काही गमवले... आज ही आठवतं.... घराबाहेर कंदिल उभा करणे... आई व अक्काची रांगोळीसाठी चाललेली तयारी.. व मी गोळा केलेले फटाके.... बाबांची दिवाळी तर तेव्हापण रोडवरच... आपल्या दुकानाबरोबर...! उन्हातान्हात...! संध्याकाळी... घरी.. थकलेले .... सावकाराचे घेतलेले पैसे कसे परत करावे ह्या चिंतेत... त्यांचा बॅगपायपर व चार मिनारचे पॅकेट... मी व अक्का बाहेर फटाके सोडत असू व बाबा... असेच एकटे... ग्लास हातात घेऊन...... ह्याला नशीब म्हणावे की नियती मला माहीत नाही पण ती दिवाळी व आजची दिवाळी मी घरात आपल्या माणसांच्याबरोबर कधीच साजरी करु शकलो नाही बुक केलेली टिकीटे मी स्वत: रद्द करावी अशी अवस्था येते.... कधी कधी.... ह्यावेळी पण... कुठेतरी जगातल्या कोप-यात बसून एकटे.. बाहेर चालू असलेली आतिशबाजी बघत.... व समोर चालत असलेली गर्दी बघत..... माझी दिवाळी नेहमी प्रमाणेच संपेल... !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: