रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ५

दोन एक दिवसानंतर बाबांनी सुट्टी घेतली व म्हणाले " तयार हो, तुला सोडून येतो, परत पळून घरला येऊ नकोस समजले का ?" आईने कपडे भरलेच होते पिशवीत, खायला म्हणून लाडू व चिवडा करुन दिला होता, मी ते घेऊन गुमान बाबांच्या पाठी मागे चालू लागलो पण घरातून बाहेर पडताना आईला नजरेनेच सांगितले मी नाही राहणार तेथे.. पुन्हा पळून येणार.

दुपारच्या दरम्यान बाबा मला घेऊन अण्णाच्या खोलीत पोहचले व म्हणाले " अण्णा, हा लई वात्रट आहे, जरा ठीक ठाक वळण लावा ह्याला" अण्णा " मी काय बळण लावू ह्याला, ह्याला बघून अजून दोनचार पोरं पळून गेली मागच्या आठवड्यात, तुम्ही ह्याला घरीच घेऊन जा. तेथेच राहू दे." मी एकदम खुष झालो पण झालेली खुषी चेह-यावर दिसली व बाबांनी एकदम कान खेचले व म्हणाले " राजा, लेका तंगडचं तोडतो बघ तुझं... पुन्हा हसलास तर" अण्णाची समजुत घालून बाबा परत गेले व मी परत आपल्या हॉस्टेल मध्ये !

बाकीच्या पोरांच्यात माझं जरा नाव झालंच होतं.. चार-पाच वेळा पळुन गेलो होतो ह्याचंच त्याना नवल वाटत असे.. त्यामुळं बाकीची पोरं माझ्या बरोबरच फिरु लागली, अण्णाच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नव्हती, मग अण्णाने एक एक पोराला धमकीच्या सुरात समजवले की माझ्या नादी लागू नका.

सगळ व्यवस्थीत चालू होतं, पण मध्येच पुर्व परिक्षा झाली व नेहमी प्रमाणे मी पास झालो पण जरा मार्क कमी पडले व ३५% नेच पास झालो ! मग शाळेत वळ पडू पर्यंत मारला.... व संध्याकाळी अण्णाने धुतला व शेवटी घरी पत्र लिहिले व बरोबर माझे मार्कशीट पण पाठवले ! मी विचार केला बाबा येथे आले म्हणजे झालं.... सगळ्याच्या समोरच मार खाण्याची पाळी.. एक चुकीसाठी तीन तीन वेळा मार ? पळायची तयारी कर पुन्हा... तावडीत सापडलो तर मेलो.. हाच विचार करत रात्रभर जागून काढली व पहाटे पहाटेच बाहेर पडलो.. !

रात्री ३.३० / ४.०० च्या आसपास चा वेळ होता अण्णा अजून झोपलाच होता व मंदिर देखील शांत शांत दिसत होतं... ! मी हळुच खाली उतरलो व मेन रोडनेच चालत चालत.. गेटचा बाहेर आलो.. एक आजोबा बाहेर उभे होते... मला पाहून हसले व म्हणाले " सकाळ सकाळी फिरणे चांगली सवय आहे बाळा " मी " हो" म्हणालो व सरळ हातकलंगडेचा रस्त्ता पकडला
जरा वेगानेच मी जवळ जवळ अर्धा रस्ता पार केला... तो पर्यंत सुर्य उगवला होता म्हणजे अण्णाला माहीत झाले असनार की मी गायब आहे ! तेव्हा मी जरा आड रस्त्यानेच चालु लागलो व मेन सांगली हायवे वर दोन्-तीन तासात पोहचलो. चालता चालता विचार केलाच होता कुठ जायचे ह्याचा, जवळच जयसिंगपुर होतं व इचलकरंजी विरुध्द दिशेला पण दोन्ही पैकी एका बाजूला !
जयसिंगपुरला आत्या राहत होती.. व इचलकरंजीला माऊशी.. मी जयसिंगपुरला जाणे नक्की केले... कारण बाबाच्या स्वप्नात पण हा विचार येणार नाही की मी जयसिंगपुरला जाऊ शकतो !

कधी बैलगाडितून कधी... सायकलसवारी करुन.. कधी मध्ये.. ट्रक मधून प्रवास करत मी दहाच्या दरम्यान जयसिंगपुरला पोहचलो ! पण एक लोचा होता.. मी आत्याच्या गावी कधीच आलो नव्हतो.. त्यांनी मला बघितलं होतं पण मला त्यांच नावच आठवत नव्हतं.. फक्त दोन गोष्टी आठवल्या.. मगदुम मळा.. व कागवाडे अत्त्या !

मी फिरत फिरत मगदुम मळ्यात पोहचलो तर इन मीन तीन घरं ! मी विचार केला ह्यातलंच कुठली तरी एक घर .. नक्की ! मी सर्वात प्रथम येणा-या घरात घुसलो.. व विचारले " कागवाडे अत्या ?" आतुन एक बाई आली म्हणाली.. " कागवाडे ? इथं कोणीच नाही राहत, आम्ही पण नवीन आहोत.. मागे पाटिल बाईंना ईचार" मी पाटिल बाई कडे पोहचलो " काकु, कागवाडे अत्याचे घर ? " त्यांनि मला नखशिकांत पाहीले व म्हणाली " तु जेवढ्या वयाचा आहेस तेवढी वरिस झाली त्यांना मळा सोडून" मी टरकलोच .. तो च त्या म्हणाल्या " ते तर धरणगुत्तीला गेले आहेत राहायला कवाच" धरणगुत्ती नाव कानावर येताच सगळा उलगडा झाला.. मी म्हणालो " ठीक ठीक..." धरणगुत्तीची आत्या.. व जयसिंगपुरची अत्या जवळ जवळच राहत होत्या.. वे धरणगुत्तीची अत्या आमच्या अघरी नेहमी येत असे... ! व मी देखील सुट्टीला गेलो होतो त्याच्या मळात !

मळा ते सांगली हायवे कमीत कमी ३ किलोमिटर ! म्हणजे सहा किलोमिटरचा चक्कर... ! व जयसिंगपुर ते धरणगुत्ती ८ किलोमीटर ! तीन च्या आसपास मी धरणगुत्ती मळ्यात पोहचलो व शेतातल्या झोपडीत पोहचलो ! जवळ पास कोणी दिसतच नव्हतं.. धरणगुत्ती अजून दोन एक किलोमीटर .. पण हे आत्याचे शेत हे नक्की माहीत होतं... ! त्यामुळे मी बिन्धास्त होतो.. आत गेलो.. जेवण बांधून ठेवलेले होते.. मस्त पैकी जेवलो.. व ताणून दिली.. !

"राजा, तु कवा आलास रे" मी डोळे चोळत बघीतलं तर आजोबा समोर.. मी त्यांना मीठी मारली व म्हणालो.. " दुपारी" आजोबा " कुणा बरोबर आलास व कसा आलास ?" मी " पळून आलो, हॉस्टेल मधून... चालत आलो जयसिंगपुर पासून येथे पर्यंत" आजोबांनी कप्पाळाला हात लावला व मला सायकल वर बसवून गावाकडे निघाले व म्हणाले " लेका राजा... येवढ कसं काय रे चालास तु ? पाय दुखत हायत का नाय ? " मी म्हणालो " बाहुबली मध्ये.. कसरत करुन .. आता नाय दुखत पाय"
आजोबा म्हणाले " पण तु पळालासच का ?"

संध्याकाळ पर्यंत आम्ही घरी पोहचलो व दोन्ही अत्यांना माझा प्रताप व्यवस्थीत समजला... पण सकाळ ३.०० वाजल्यापासून.. दुपार पर्यत केलेल्या पायपीटीमुळे अथवा थकव्यामुळे मला रात्री जबरदस्त ताप चढला... ! रात्रभर अत्याने माझ्या डोक्यावर पाणाचा पट्ट्या लावून जागून काढली तेव्हा कुठे सकाळी जरा मला आराम आला... व मी निवांत झोपलो..

आजोबांनी गावातल्या एकाला आमच्या घरी पाठवले व घरी निरोप द्यायला सागितले..! दुस-या दिवशी सकाळ सकाळच्या बसने आई-बाबा व अक्का धरणगुत्तीला पोहचले तेव्हा मी बाजूच्या पोरा बरोबर कवडीचा खेळ खेळत बसलो होतो पाठीमागून रट्टा बसणार येवढ्यात अत्याने बाबांना थांबवले व मला बाजूला केले.. व म्हणाली " अण्णा, लहान आहे अजून.. परवा रात्री लई ताप पण हुता त्याला.. राहू दे मारु नकोस.. मी लई मारलय आधीच. पण पोरंग लई शहाणं हाय बघ.. आपल्या आत्येचा पत्तापण त्याला थाव हाय "
बाबा म्हणाले " पळाला म्हणून मारत नव्हतो.... पण पळून जाण्यासाठी जेवढं डोकं वापरतो तेवढं आभ्यासात का नाही वापरत."
आजोबा म्हणाले " एवढंच कार्ट... हाय पण जीव लई हाय ह्याच्या मंदी... खेळ हाय व्ह.. ह्या वयात... दहा -पंधरा मैल चालणं .. तरी बरं.. अप्पासो हा लेकाचा इकडंच आला... जरा कुठ अजून गेला असता तर ह्याला शोधायचा कुठ ?... "

आई बरोबर मी बसलो होतो, आई म्हणाली " तुला इकडे कसं यावसं वाटलं...इचलकरंजीला का नाही गेलास मग ?"
मी म्हणालो " मी इचलकरंजी आहे ते तात्यांनी तुम्हाला लगेच कळवले असते म्हणून ईकडे आलो"

क्रमश :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: