शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ६

बाबांनी हात मागे बांधले व उचलून खुंटीला टांगला व म्हणाले " राजा, बघ हे शेवटंच. सहा महीने राहीले आहेत व्यवस्थीत रहा. पळुन नको येऊ, त्यानंतर तुला पुन्हा कोल्हापुरातील शाळेत घालेन ठीक. तुझ्या नादी आमची मल खुप पळापळ होत आहे.." मी हो म्हणालो तेव्हा मला खाली ठेवला पुन्हा उचलुन.
पुन्हा घरला न जाता सरळ बाबांनी मला हॊस्टेल वर पोहचवला व अण्णाच्या तावडीत दिला अण्णा म्हणाले " तु मारणार नाही आता बस..."
कसे बसे मी व्यवस्थीत एक महीना काढला व ना कोणी मारलं ना... राग दाखवला... ! पण शिस्ती तर शिस्त होती.. सकाळी अण्णा दुस-या मुलाला उठवायला सागंत असे

दिवाळी सुट्टीला घरी घेऊन आले बाबा ! दिवाळी सुट्टी चांगलीच १५ दिवसाची होती... पुन्हा घरचे वातावरण भेटल्यावर परत हॊस्टेलला जाण्याची काय मनात इच्छा येत नव्हती ... पण बाबांचा मार विचारात घेऊन जाण्याची तयारी झाली पण काय झालं आठवत नाही पण कश्यावरुन तरी बीनसलं व मी घरातून निघून पंचगंगेच्या काठी जाऊन बसलो... ! दोन एक तासाने शोधा शोध चालू झाली... आजू बाजूचे काका.. मामा... घरमालंकाची मुल सगळीच मला शोधत फिरु लागली !

मी आपला मस्त मजेत शिवाजी फुल पार करुन... पार आंबेवाडी पर्यंत पोहचलो.. सायकल होतीच. जवळ.. आंबेवाडीतून सरळ... निगवेला आलो... व निगवेपासून ३ चार किलोमिटर वर एक गाव आहे.. तेथे आमच्या बाबांचे मित्रांचे घर होते... त्याच्या घरी मी खुपदा गेलो होतो.. व ते देखील रोज आमच्या घरी येत.. त्यामुळे मला नवीन नव्हते..घर त्यांचे.. !
जोतिबा डोंगराच्या पायथ्यालाच घर त्यांचे... ! मी घरात गेलो... प्रभात काका... घरी नव्हते... ते कोल्हापुरात. त्याची मुलगी मनिषा व काकी होती... गेलो... मस्त पैकी जेवलो व झोपलो...
त्यांनी विचारलंच नाही कसा आलो व का आलो त्यांना वाटले असावे की मी बाबाच्या बरोबर आलो आहे.. व बाबा.. काकांच्या बरोबर शेतात गेले असावेत !

चारच्या दरम्यान उठलो... व मनिषाला घेऊन सरळ जोतिबाच्या डोंगरावर... फिरायला.. मनिषा माझ्या पेक्षा वयाने जरा मोठी.. ! त्यामुळे ती पुढे व मी मागे हा असा प्रवास आम्ही चालू केला.. व चांगले दोन तास.. जंगलाचा मेवा शोधत फिरलो जे मिळाले करवंदे.... बोरं.. खिश्यात जमा करत खात.. संध्याकाळी सहाच्या दरम्यान खाली आलो !

रात्री आठच्या दरम्यान प्रभातकाकांचा घरी फोन आला व काकीला म्हणाले " राजा अजून घरी आला नाही आहे... पळाला बहूतेक पुन्हा... जरा घरी यायला वेळ होईल.." तेव्हा काकी म्हणाल्या " अगं बाई, हा लेकाचा तर येथेच आहे... मला वाटलं तुमच्या बरोबर आला आहे.." असं म्हणताच काकांनी फोन ठेवला व अर्धा तासात घरी पोहचले बाबांना घेऊन.
"अप्पा, मारुन काय फायदा नाय... ह्या पाठवूच नकोस पुन्हा हॊस्टेलला... येथेच घाल शाळेत कुठेतरी" इती काका.
बाबांच्या डोळ्यातून राग स्पष्टपणे दिसत होता. पण दुस-याच्या घरी आहे ह्याचे त्यांना भान होते म्हणून अजून मारला नव्हता... काकांनी ते ओळखले होते म्हणून रात्री काय घरी जाऊ दिले नाही व बाबांना जेवण करायला लावून मला झोपवले !

हॊस्टेलची सवय म्हणा अथवा काही ही.. मी चारच्या आसपास उठलो.. उगाच कोणाला त्रास नको म्हणून कोणाला न उठवता मी संडासला जाण्यासाठी हळूच बाहेर आलो.... पाण्याचा डबा शोधता शोधता जरा धडपडलो... तोच काकांना जाग आली व ते जवळ जवळ पळतच बाहेर आले व मला बकोटीला पकडले व म्हणाले " अरे मर्दा, पळून चालास व्हय ? " मी म्हणालो " नाही हो... मी तर..." पण मी अजून काही बोलणार तोच बाबांनी एक कानाखाली वाजवली व मला उचलून बैठकीच्या खोलीत घेऊन आले ह्या सगळ्या गडबडीत घरची सगळीच मंडळी जागी झाली व एक चांगलाच गोंधळ चालू झाला

काकीने मला एका बाजूला ओढले व बाबांना म्हणाली " असं, पोराला का गुरावानी मारताय !" बाबा म्हणाले " तुम्ही बाजूला व्हा.. ह्याचा पायच तोडतो पळतो कसा हे बघतो" त्यात मी पुन्हा म्हणालो " मी पळून...." तोच काका म्हणाले " अरे पोरां असं कसे करतोस... तु इकडे तीकडे पळतोस .. तुला शोधायला आम्ही पळतो.. जर का कुठ खरंच दुरवर गेलास तर तुला शोधणार कुठे ? " मला आता राग आला होता.... व संडास देखील जोरात आले होते... मी ओरडलो व म्हणालो " पळून चाललो नव्हतो... हॊस्टेलच्या सवयी मुळे जरा लवकर उठलो व संडासला चाललो होतो.. लई जोरात आलं आहे.. जाऊ द्या मला" हे एकुन मनिषा फिस्स करुन हसली व ती हसलेले बघून... काका व काकी हसू लागल्या... व मी बाबाना पहिल्यांदा दिलखुलास हसताना पाहीले... ! मी पळतच पडसाकडे गेलो व क्रियाकर्म करुन परत आलो..!

पण झालेल्या प्रकारामुळे... आमच्या घरात एक बैठक बसली व त्यात आईने निक्षुन सांगितले की राजाला हॊस्टेलला पाठवायचं नाही... बाजूचे घाटगेकाका पण मध्येच बोलले..एकुलता एक दिवटा हरवला तर काय करनार ?... शेवटी बाबा म्हणाले.. मी शाळेत विचारतो.. जर साध्य झाले तर घरीच अभ्यास करुन परिक्षा देईल हा.. नाही तर दुसरा उपाय आहे माझ्याकडे !

जसा शाळेचा नियम होता त्या प्रमाणे मला शाळेत येऊनच अभ्यास करावयाचा होता व बाहेरुन परिक्षा हा प्रकार तेथे नव्हता
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला.... आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ?

क्रमश:

रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

युवाअड्डा.कॉम !

युवा अड्डा !

आम्ही एक नवीन संकेतस्थळ चालू केले आहे, युवाअड्डा.कॉम !


युवा अड्डा काय आहे ?
युवक / युवतींच्यासाठी , तरुणांसाठी (व मनाने तरुण लोकांसाठी) एक माहीती केंन्द्र म्हणुन ह्या संकेतस्थळाची सुरवात केली आहे !
सध्या संकेतस्थळावर इंग्रजी / हिंदी भाषाचा वापर होत आहे, पण लवकरच अजून आठ भाषामध्ये संकेतस्थळ वापरता येऊ शकेल !
युवाअड्डावर आम्ही छायाचित्र संग्रह, गाणी (एमपी३) चा संग्रह करण्याची सुविधा दिली आहे ! तुम्ही येथे प्लिकर प्रमाणे फोटो अपलोड करु शकता ! येथे पिडीएफ फाईल अपलोड / डाऊनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे, मोबाईल / लॅपटॉप / संगणक ह्याच्या विषयी माहीती व नवीन आलेल्या उत्पादांच्या बद्दल सचित्र व योग्य मुल्यापन केलेली माहीती व कुठे व कसे विकत घ्यावे ह्या बद्द्ल सुचना देखील उपलब्ध आहे !
नवीन प्रसिध्द झालेल्या चित्रपटांबद्दल परिक्षणे व त्यांच्या शोचे टायमीग देखील युवा अड्डावर उपलब्ध केले आहे !
सरसकट बातम्यांचा ओघ न करता महत्वाच्याच बातम्या येथे प्रकाशीत केल्या जातात ! तेव्हा तुम्हाला ताज्या बातम्या लगेच भेटलीत , शेयर मार्केट साठी देखील वेगळा विभाग केला आहे ज्यामध्ये तुम्हाला शेयरचे भाव / तेलाचे भाव व सोन्याचे भाव तत्काल उपलब्ध होतात ! खेळ विभाग देखील आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळा बद्दल बातम्या व क्रिकेटचे थेटप्रेक्षपण ( दुस-या संकेतस्थळाच्या मदतीने) उपलब्ध आहे ! तसेच ऑनलाईन गेमची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे !

लवकरच, अजून काही नवीन विभाग चालू करण्याचा मानस आहे त्यामध्ये पर्यटन / फॅशन /कार / बाईक्स विभाग व सॉफ्टवेयर डाऊनलोड विभाग असतील !

अजून काही सल्ले / माहीती / संकेतस्थळावरील चुका ह्या बद्दल काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही मला येथे सुचवू शकता !

धन्यवाद !
युवाअड्डा.कॉम !

ती व मी !

***
अशीच एक सुस्त संध्याकाळ होती व अचानक माझा फोन वाजला !
अनोळखी नंबर होता, पण आला महाराष्ट्रातुनच होता, दोन एक क्षण विचार करुन मी फोन उचलला !
समोरुन हॆलो झाले व मी लगेच म्हणालो " बोल, कशी आहेस !"
ती. " अरे तुला कसं कळाले की मीच आहे ते ?"
मी " ह्म्म ! अजून स्मरणशक्ती चांगली आहे माझी, व तुझा आवाज तर माझ्या... ते राहू दे कशी आहेस"
ती " माझा आवाज तर तुझ्या ?? पुढे"
मी " राहु दे तुला माहीत आहे काय... हजार वेळा एकले असशील माझ्या कडून तु"
ती "ठीक, मी एकदम मजेत आहे तु कसा आहेस"
मी " मी ! एकदम मजेत तुला माहीतच आहे.. नावातच राज आहे.. तर ! मी नावाप्रमाणेच राजा माणूस काय"
ती " हुं ! खुप बोलायला ही शिकला आहेस"
मी " ह्या जगात राहून हेच तर एक शिकलो आहे"
ती " म्हणजे?"
मी " तुला नाही कळायचं ! ते सोड, तु सांग काय चालू आहे"
ती " काही नाही... सगळं व्यवस्थीत चालू आहे, तुला माहीत आहे मी किती वर्षानंतर तुझ्याशी बोलत आहे ते ?"
मी " तु वर्ष विचारत आहेस ? मी तुला वर्षे, महीने, दिवस व तास देखील सांगू शकतो.. "
ती " म्हणजे तु विसरला नाहीस अजून तर "
मी " छे ! विसरलो कधीचाच आहे.."
ती " हो दिसत चांगलच विसरला आहेस.. माझा आवाज ओळखलास तेव्हाच कळाले होते "
मी " ह्म्म ! मुलंबाळ काय करत आहेत सध्या ?"
ती "एक मुलगा आहे तो.. अजून शाळेत जातो.. आता नववी मध्ये आहे.... तु नाही लग्न केलसं"
मी " हा हा हा ! मस्त जोक आहे ! एक भेटली होती... लग्न ही केलं असतं.. पण दैवाला मंजुर नव्हतं"
ती " राज, तो जोक नव्हता... तुला एकदम मनानं विचारलेला प्रश्न देखील जोक वाटला ? "
मी " काही गोष्टी सुप्त अवस्थेत राहू देने चांगल असतं ! बरोबर ना"
ती " म्हणजे तु उत्तर देणार नाहीस तर"
मी " तसं काही नाही आहे.. पैशाच्या मागे पळता पळता आपलं घर कधी मागं राहीले हे कळालंच नाही, जेव्हा कळालं तेव्हा खुप उशीर झाला होता"
ती " असं कोड्यात नको रे बोलू , तुला माहीत आहे मला काहीच कळत नाही"
मी " चांगलं आहे.. काही गोष्टी नकळालेल्या चांगल्या "
ती " काय करतोस सध्या "
मी " तुला जेव्हा मी पहीले प्रेमपत्र दिले होते तेव्हा त्यात एक ओळ होती... माझ्या वर विश्वास ठेव.. तुला कोठेच काहीही कमी पडू देणार नाही जिवनामध्ये.. जिद्द आहे माझ्या अंगात एकदा गोष्ट मनावर घेतली तर ती मी पुर्ण करतोच... आठवतं तुला ? "
ती " हो.. खुप दिवस माझ्या जवळ होतं ते पत्र ! एके दिवशी तुझ्या वरील रागाने मी ते जाळलं होतं"
मी " तो राग का आला होता आठवतं तुला "
ती " अंधुकसं ! मी सगळे विसरले आहे राज ! माझं लग्न झालं आहे "
मी " ओह ! माफ कर... तुला माहीत आहे तु व तुझा विषय म्हणजे मी कुठे थांबावे हेच विसरतो"
ती "हरकत नाही, तुझा स्वभाव मला माहीत आहे !"
मी " तुला तुझ्या मैत्रीणीने सांगितलेच असेल मी दिल्लीत असतो ते , बाकी एक छोटासा बिझनेस आहे , वर्षाकाठी.. दोन-एकदा फिरायला जातो, कधी कधी गाडी घेऊन मस्त पैकी हायवे वर फिरतो... हे माझं लाईफ !"
ती " लग्न का नाही केलंस"
मी "तुझी गाडी परत माझ्या लग्नावर का ?"
ती " तुझी काळजी वाटते आहे"
मी " जेव्हा गरज होती तेव्हा काळजी घेणारं कोणीच नव्हतं गं, एक एक सण, एक एक उत्सव मी कोणाची तरी वाट बघत घालवले.. कुणाच्या लग्नाला जाऊन देखील वर्षानु वर्ष झाली आहेत... खास मित्राच्या लग्नाला न जाता नंतर काही दिवसानंतर त्यांना गिफ्ट देतो.. हा हाल झाला आहे.. एकलंकोडा झालो होतो ! तेव्हा कोणीच नव्हतं जवळ काळजी घेणारं ! "
ती " राज, I am really Sorry ! जे काही घडलं त्यात माझा काहीच दोष नाही रे !"
मी " ये वेडी, मी तुला कधीच दोष दिला नाही व देणार ही नाही ... कमी पणा तर साला माझ्या नशीबात होता.. चल सोड ना ! "
ती " नाही रे, मला निर्णय घ्यायला घरच्यांनी वेळच नाही रे दिला"
मी " सोड ना यार.. चांगलीच वर्षे निघून गेली त्या गोष्टीला... एक गोष्ट सांग तु घरी आली आहेस का सध्या ? "
ती " हो, बाबांनी नवीन घर घेतलं आहे.. जुनं घर विकलं त्यांनी !"
मी " अरे रे ! माझ्या कडे असलेल्या अनेक आठवणी मधलं ते घर विकलं. चल ठीक आहे तुझ्या बाबांनी काही विचार करुनच विकलं असावे"
ती" राज, तुला आठवतं तु सकाळ सकाळी बाईक वरुन आमच्या घरा समोरुन फेर-या मारायचास ? "
मी " हा.. तो काळ जबरदस्त होता यार... एक विचारु "
ती " बोल"
मी " एकदा भेटु शकतो आपण ?"
ती " काय ? कधी ? "
मी " उद्याच ? "
ती " पण तु तर दिल्ली मध्ये मी येथे "
मी " पाच तासाच्या आत पोहचेन "
ती " पण... घरी येशील ?"
मी " हो, तुझ्या बापाला मी आता पुर्वी सारखा घाबरत नाही गं "
ती " राज, माझे वडील आहेत ते"
मी " ठिक आहे, तुझ्या वडीलांना"
ती " ठिक आहे ये भेटूच आपण"
मी " thanks "
ती " अरे हा नवीन शब्द कधी शिकलास तु.. "
मी " अरे चुकन बोललो.. नियम विसरलो होतो मी पण..."
ती " किती वाजतो पोहचशील तु"
मी " उद्या चार वाजु पर्यंत"
ती " ठीक आहे ये मग. उद्याच बसून बोलु "
मी " ठीक आहे"

फोन कट झाला !
बाय बाय करायची सवय तीला आधी पण नव्हती व आज देखील नाही ! सुधरणार नाही कधीच !
मी दुसरा फोन लावला yatra.com ला ! "मला आताच्या आता मुंबई जाणे आहे कुठली फ्लाईट उपलब्ध आहे ?"
यात्रावाला " सर, रात्री ९.४५ ची आहे , जेटची"
मी " बुक कर ! "
यात्रावाला " सर फेयर चार्जेस "
मी " हरकत नाही जो रेट आहे काहीच हरकत नाही.. जरुरी आहे जानं"
यात्रावाला " कार्ड नंबर सर"

टिकीट तर मीळालेच .. प्रिंन्टं काढून हाती तयार.. कपडे काय घालू ? दोन भर ना बॆंग जो हाती येईल तो भर.. नंतर हॊटेल मध्ये बदलू !
"अंकल कुठ चालला गडबडीत ?"
च्या मायला हा कोण माझ्या घरी येऊन मला अंकल म्हणतो आहे ?
मी मागे वळालो व पाहून दचकलोच !

**********************

एक अनोळखी मुलगा माझ्या घरात... तेरेस वर माझ्या समोर उभा होता....
एक १०-११ वर्षाच्या लहान मुलगा हस माझ्या कडे पाहत उभा होता मी आठवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ओळखीचा वाटलाच नाही.
मी " कोण है बेटा.. कहा से"
तो " काका मी अवधुत "

च्यामायला हा मराठी पण बोलतो !

मी "अवधुत ?"
तो " काका असे काय करताय मी तुमचा छकुला.. फोन व किती बोलता माझ्याशी"
मी " अरे छकुल्या तु ? येथे कसा काय आलास रे , घरातून पळुन तर आला नाहीस ना ? कोणाबरोबर आला आहेस ?"
तो " काका, असे काय करताय तुम्हीच तर बोलवलं होतो मम्मी पप्पा व मला .. दिल्ली दाखवतो म्हणून"
मी " अरे देवा, तुझी मम्मी पण येथेच आली आहे काय ?"
तो " हो खाली अंगणात बसली आहे पप्पा बरोबर.. तुम्हाला शोधून शोधून दमलो मी "
मी " अरे माझ्या बाळा.. मी विसलोच होतो रे तुम्ही येणार आहात ते , चल खाली चल !"
तो " ह्म्म्म, माझे चॉकलेट ? "
मी " अरे हा चल देतो"

त्याला चॉकलेट देऊन मी त्याच्या बरोबर बाहेर आलो तर लॉन मध्ये मनिषा व विवेक बसले होते !
मला पाहताच मनिषा पळतच आली व पाया पडत म्हणाली " दादा कधी पासून फोन वाजवतो आहे कुठ होतास "
मी "अगं पाया काय पडतेस... मी अजून म्हातारा झालो नाही बाई... बरं झालं आजूबाजुला कोणी पाहणारं नाही.. ... मी वर टेरेस वर बसलो होतो "
ती " तुझी सवय अजून गेली नाही.. संध्याकाळी नेहमी टेरेस वर जातोस काय करतोस रे वर टेरेस वर "
मी " एकटा खाली बसून काय करु म्हणून वर बसतो.. आजूबाजुच्या टेरेसवर जवळपासची लहान मुलं खेळतात च्या खेळ बघत बसतो"
ती "असं ! माझ्या लग्ना नंतर तु आज भेटतो आहेस आम्हाला "
तो पर्यंत विवेक ही जवळ येऊन बसला होता.. नमस्कार करुन म्हणाला " राज, तुम्हाला भेटण्याचा योग आज आला गेली पंधरा वर्ष आपण फोनवरच बोलतो आहे..."
मी " अरे हो यार.. हा बघ ना छकुला रोज बोलतो माझ्याशी पण मी हा कधी विचारच केला नाही की हा कधी समोर आला तर ओळखेन कसा .. विश्वासच बसत नाही मनिषाच लग्न होऊन १५ वर्षे झाली... शाळेतील दोस्ती.. आमची कुठल्या कुठं नातं जुळलं !... काय म्हणत आहे.. तुमचं विजयवाडा ?"
तो " छान आहे.. तुम्ही देखील या कधी तरी"
मनिषा पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली " म्हणजे अजून तु मला मैत्रीणच मानतोस..."
मी " अगं तसं नव्हे ! तु तर माझी सख्खी बहीणीच !"
ती " विवेक म्हणाला होता की राज ने दिल्लीला बोलवलं आहे आधी मला विश्वासच नाही बसला.. पण हा टिकीट घेऊन आला तेव्हा खुप आनंद झाला..."

तोच छकुला बोलला " मम्मी, काका कुठे तरी बाहेर चालले आहेत कपडे पॅक करत होते "
मी " अरे, नाही असंच कपडे भरुन ठेवतं होतो.. बँगे मध्ये.. "
ती " कुठ चालला आहेस ? काही काम आहे का जरुरी ? "
मी " अगं काही नाही.. असंच कपडे पॅक करत होतो"
मी "चल आत चला... फ्रेश व्हा !"
ती " तुझा गडी कुठे गेला "
मी " पळुन गेला आहे.. येईल दोन एक दिवसामध्ये.. त्याला पण महीन्या दोन महीन्यातून पळण्याची सवय आहे"
ती " मग जेवण कोण तयार करतोय ? तु ? "
मी " होय... मी तयार केलं असतं तर तुला येथे भेटलो असतो का ? सरळ हॉस्पिटल मध्ये नाही का आली असतीस भेटायला"
ती " म्हणजे हॉटेलचे जेवण चालू आहे तर... चल ह्या आठवड्यात तु माझ्या हातचंच खा ! "
मी " अरे वा ! म्हणजे आमची आठवडाभर दिवाळी तर "

मी " अरे विवेक, काय घेणार तु ? "
तो " मी , मी नाही घेत हो.."
मी " अरे मी आहे ना... हिला नको घाबरुस तु"
तो " मग बियर घेईन"
मी " हा हा हा.... चल वर तेरेस वर.. फ्रेश होऊन ये बसू.. खुप बोलायचं देखील आहे यार"
ती " दादा, कश्याला उगाच त्या पेक्षा मी मस्त पैकी ज्युस तयार करते ते पी.. बीयर पीण्यापेक्षा "
तो " जे काम कर... तु ज्युसच तयार कर "
मी " अरे, लगेच सुधरलास की बायको म्हणाली व तु नंदीबैला सारखा मान डोलवलीस "
तो " तसे नव्हे काका.. आपण कॉकटेल करु "
मी " बढिया "
ती " तुम्ही पुरुष लोक ना कधीच नाही सुधरणार.. "
मी "चल, जा बाळ तयारी कर लवकर .. व मस्त पैकी देशी जेवण तयार कर... जे सामान नाही आहे.. ते मला सांग दुकानदार येथेच देऊन जाईल "
ती " ठीक आहे.. "

तासाभरामध्ये आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो व मी एक चपातीचा तुकडा मोडलाच होता... तोच फोन वाजला.. मी उठ्णार तोच मनिषा म्हणाली "एक मिनिट , मी बघते कोण आहे.. जेवताना उठू नकोस "

ती " कोण "
समोरुन " मॅम, सर का फ्लाईट टाईम ९:४५ है.. ३५ मिहै..बाकी है.. सर पोहचे नही है एयर पोर्ट पे "
ती " किस के नाम पे है तिकीट "
समोरुन "मीस्टर राज जैन ! "
ती " ठिक है.. पोहच जायेंगे ! "
फोन ठेऊन परत आली व म्हणाली " दादा, तु टिकीट बुक केले आहेस , तुझ्या फ्लाईटचा टाईम झाला आहे त्यांचाच फोन आला होता "
मी " अरे, राहू दे.. मी प्लान रद्द केला आहे .. चल जेऊन घे "
ती " पण तु आताच कुठे चला होतास रात्री... "
मी " कुठ नाही "
ती " काही लपवत तर नाही आहेस ना "
मी " अगं काही नाही.."
ती " दादा.."
मी " मनिषा... जेव आता "

पाच-दहा मिनिटामध्ये जेवण उरकलं व आम्ही वर टेरेस वर आलो !

ती " दादा, तुझा मोबाईल दे पाहू.. घरी फोन करते "
मी " खाली रुम मध्ये आहे बघ चार्जिंगला "

काही मिनिटे निघून गेली !

ती " दादा, तु तिला भेटायला जाणार होतास उद्या ? "
मी उडालोच... !
मी " तुला कोणी सांगितलं ? "
ती " खाली तीचाच फोन वाजत होता जेव्हा मी खाली गेले होते"
मी " मग ? तु काय म्हणालीस "
ती " त्या सटवीला दिल्या चांगल्या चार ठेवणीतल्या कोल्हापुरी शिव्या .. व म्हणाले की पुन्हा फोन नको करुस"
मी कपाळाला हात मारुन घेतला व म्हणालो " ३० मिनिटामध्ये.. तु ही एकच ओळ बोललीस ? शक्यच नाही.. ! इतके वर्ष ज्या वेळेची तु वाट पाहत होतीस झालं ! समाधान झालं तुझं ! "
ती " जे काही हाल झाले तुझे हे सगळे तीच्यामुळे... तु अजून लग्न केलं नाहीस हे तीच्यामुळे... मग काय मी तीची आरती ओवाळू ? " असे म्हणत... ती रडू लागली..!
मी तीच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणालो.. " बाळ, दुस-याला कधीच दोष देऊ नये.. कर्म व त्याचे फळ आपलंच ! त्याचा उत्तराधिकारी कोणीच नाही.. चल तु तुझ्या मनातील बोललीस ना तीला.. तुझा राग गेला मनातून.. आता शांत हो.. ! "
ती " मला नाही जमत तुझ्या सारखं नेहमी शांत राहणं ... तीच्या बरोबर झालेल्या प्रेमाची गोष्ट देखील तु शांत पणेच सांगितलीस... तीच्या लग्नाची गोष्ट पण तु शांत पणेच सांगितलीस.. व विभाची..पण.. मला नाही रे जमत "
मी "नको काळजी करुस ! बस ! जे होत आहे ते होऊ दे ! आता तु तीला शिव्या दिल्यास, काही बोललीस म्हणून का मी तुला रागवेन ? नाही ना.. मग ! तीच्या आधीचा माझ्यावर हक्क तुझा बाळ... देन डॉन्ट वरी.. ! चुप बस आता... विवेक हिला घेऊन जा रुम मध्ये.... सकाळी बोलु आपण... "

ह्म्म! आता ?
पुढे काय ?
त्या बिचारीचा देखील काही दोष नाही.. ना मनिषाचा... !
तीला समजवावे लागेल.. नाहीतर कुठेतरी मनाला घाव लागेल !

************

मी " हलो !"
समोरुन " हलो, कोण ?"
मी "राज, राज जैन. आपण कोण ? "
तो "माणिक बोलतोय मी, राज"
मी "अरे माणिक.. कसा आहेस लेका ?"
तो " मी मजे में . तु कुठे आहेस .. कसा आहेस ?"
मी "अरे मी पण मजेत... दिल्लीतच आहे ! तुझ्या दिदीला फोन दे पाहू जरा"
तो "थांब हं.. देतो.. ( " दिदी.. राज को फोन छे.. रुममांसे उठाले").... राज.. एक मिनिट हं !"
ती " हलो,... राज !"
मी " माणिक फोन ठेव आता..."
तो " ठिक ठिक.."
मी " लेकाची अजून सवय नाही गेली तर "
ती " तुझी गेली ? "
मी " ते सोड.. काल रात्री मनिषा... तीच्या वतीने मी माफी मागतो.. रियली.. "
ती " राहु दे राज, पण खुप टिखट बोलली ती त्याचंच दुखः झालं "
मी " अरे मला माहीतच नव्हतं की तुझा फोन आला आहे.. मी टेरसवर होतो"
ती " पण तीचा हक्कच काय मला बोलायचा "
मी " हक्क ! तुला नाही कळायचं.. "
ती " का ? मला का नाही कळणार ?"
मी " काही नाती जपावी लागतात... ते तीला कळतं"
ती " म्हणजे, मला नाही कळत ? "
मी " मी असे नाही म्हणालो "
ती " मग ?"
मी " अरे ! ते सोड.. काय म्हणाली ती तुला ?"
ती " बापरे... किती तरी बोलली ! काही वेळ मलाच कळाले नाही काय म्हणाली ते"
मी " ह्म्म ठीक झालं नाही कळालं ते.. ती खास कोल्हापुरी भाषा आहे तुला नाही कळायची "
ती "अरे पण तीला झालं काय होतं ? ठीक आहे.. तुझ्या माझ्यात जे नातं आहे ते आपलं पर्सनल आहे ना त्यामध्ये ती कुठे आली ?"
मी " हे बघ, ती मला भाऊ मानते व मी तीला बहीण... तीच्या सुखः-दुखः मध्ये... मी जशी साथ दिली तशीच तीने देखील दिली"
ती " कुठे होती ती ? तु जेव्हा.. महाराष्ट्र सोडून भारतभर भटकत होतास तेव्हा कोठे होती ? मीच तुझ्याशी बोलत असे .. तुला धीर देत असे"
मी "अहमं !"
ती " अहमं ? म्हणजे ? "
मी " काही नाही... जशी तु संपर्कात होतीस तशीच ती देखील होती .. ती लग्न झालानंतर देखील संपर्कात होती व तू ?"
ती "तुला माझं सासरं माहीत आहे ना कसे आहे ते ! "
मी " तिचे सासरे.. देखील तुझ्या सार-यापेक्षा जास्तच कट्टर आहेत... सासू देखील खाष्ट आहे.. फोनला हात लावू देत नव्हते लग्नानंतर कित्येक महीने"
ती " तु मला हे का सांगतो आहेस ? "
मी " तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं ते"
ती " आपण पुन्हा भांडणार आहोत का ह्या विषयाला घेऊन ?"
मी " मला नाही वाटत की आपण भांडत आहोत.. पण नेहमी प्रमाणे तुझा आवाज चढत आहे.. बस इत्येकच "
ती "...... ठिक ! सोड हा विषय !"
मी " ठीक !"
ती " तु येणार होतास ? काय झालं "
मी " मनिषा जो पर्यंत येथे आहे तो पर्यंत तर नाही "
ती "राज, मी काही दिवसात परत जाणार आहे... मग माहीत नाही पुढे मागे भेट होईल की नाही ! "
मी " हो माहीत आहे... "
ती " तरी ही तू .. "
मी "एक स्पष्ट बोलू ? "
ती " बोल."
मी " आपल्या भेटीतून काय प्राप्त होईल ?... सरळ सरळ हे म्हणतो आहे.. आपण का भेटावे असे तुला वाटतं ?"
ती " तुला वाटतं आहे .."
मी " प्रथम इच्छा तु व्यक्त केली होतीस"
ती " म्हणजे सरळ सांग तुला नाही भेटायचं आहे ?"
मी "मी असे नाही म्हणालो.. पण एक उगाच डोक्यात आलेला प्रश्न तुला विचार ला का भेटायचं आहे ? "
ती " दोस्ती म्हणून.. एक मैत्रींच नातं म्हणून तरी भेटूच शकतो ना ?"
मी " देन... माझ्या जुन्या मित्रा... जरा तुला वाट पहावीच लागेल.. माझी बहीण लग्नानंतर प्रथमच माझ्या घरी आली आहे...."
ती " ठिक आहे.. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा भेट... फोन जरुर कर आधी !"
मी " ठिक"

*****
मनिषा "दादा, चहा देऊ का ?"
मी " ह्म्म, हा दे ! विवेक कुठ आहे ?"
ती " झोपलाय अजून.. तू तीलाच फोन केला होतास ना आता ?"
मी " हो यार.."
ती " तू.. कश्याला तीच्या मागे आहेस अजून.."
मी "तुला कोण म्हणालं की मी तीच्या मागे आहे म्हणून ? "
ती " मग हा फोन का ? तीला भेटण्याचं प्रयोजन काय ? कुठल्या नात्यानं भेटणार आहेस ? मित्र म्हणून ? शक्य आहे ते ? "
मी "माहीत नाही... पण कधी वेळ मिळालाचं तर.. तीला फोन करतच असतो मी ... काही तरी ईकडेचे तिकडचे बोलुन मोकळा होत होतो... पण तीच लग्न झाल्या पासुन बोललंच नव्हतो.. हा तीचा माझा दुसरा-तीसरा संपर्क असावा सध्याच्या दिवसातील बस.."
ती " पण ह्यात माझ्या प्रश्नांच उत्तर कुठे आहे.. "
मी " देईन.. योग्य वेळी देईन."

****
क्रमशः

अव्यक्त क्षण

****
परवा चूकन तुझ्या लग्नाचे फोटो फ्लिकर वर भेटले.. खुपच छान दिसत होतीस लग्नाच्या दिवशी... कुठेच अपसेट दिसली नाहिस हे पाहू खुप बरं वाटलं , हा त्या दिवशी माझा वाढदिवस होता शक्यतो तु विसरलीस... कित्येक वर्ष तु मला न चुकता शुभेच्छा देत होतीस न चुकता... .. पण त्या दिवशी तु विसरली... मी खुप वेळ वाट पाहीली होती तुझ्या फोनची.. पण तो फोन काही वाजलाच नाही.. असेच दिवस दिवस काढले पण तुझा फोन आला नाही.. एक दिवस दुसराच कोणी सांगून गेला की तुझं लग्न झालं म्हणून.. मी इतका वाईट ही नव्हतो गं.. तु मला स्वतःच सांगितले नाहीस.. लग्नाच्या दोन दिवस आधी तु माझ्याशी तास भर गप्पा मारल्यास... त्यावेळी तर सागायचे .. पण तुझं मन मला कधीच कळालंच नाही.. !

तुला आठवतो तो गज्या.. तु त्याला गजकर्ण म्हणायचीस.. फक्त तुला चिढवतो म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो होतो... व त्याने माझा हात मोडला होता.. त्या दिवशी पण तु अशीच .. काना डोळा करुन निघून गेली होतीस ... सर्वाच्या समोर... पण संध्याकाळी हॉस्पीटल मध्ये आली होतीस भेटायला..... जेव्हा त्या व्यक्तीने तुझ्या लग्नाची बातमी दिली .. तेव्हा कोठे तरी वाटलं होतं.. की दोन-एक दिवसामध्ये.. फोन करुन.. बोलली तर असतीस माझ्याशी.. पण तो फोन आलाच नाही कधी !

तुला आवडतो म्हणून निळा रंग वापरायचो... तुला आवडतो म्हणून पिच्चर पाहायचो.. फक्त तुला आवडते म्हनून मला कधीच नआवडलेली शेपुची भाजी आवडीने खायचो... पण तुला माझी आवड कधी कळलीच नाही... तु आपल्याच दुनिये मस्त राहीलीस... आपले रस्ते कधी वेगळे झाले हे तुलाच काय मला देखील कधी समजलेच नाही.. तुझ्यासाठी तुझ्या घरासमोरुन मारल्या जाणा-या चकरा कधी कमी झाल्या... कळत न कळत कधी बंद झाल्या हे तुला कळालेच नाही... दिवसातुन दहादा येणारा माझा फोन कधी येणं बंद झाला तुला कळालेच नाही...!! हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही... खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस ! तुझ्या मनात असलेली माझ्या बद्दलची भावना मला कधीच उमजली नाही... तुला माहीत होतं की मी वेडा आपले विचार कधी व्यवस्थीत व्यक्त करु शकणारच नाही तरी देखील तु एकदा ही विचारलं नाहीस !

गरब्याच्या रात्री.. तुझ्या कळत न कळत मी तुझ्या पाठीशीच असायचो ! तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू ... तोच मी तुझ्या समोर येऊन... तुला घरापर्यंत सोबत करायचो... आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच ! पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही ! छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं ... ! तुला आठवत असेल तु एकदा नापास झाली होतीस कुठल्याश्या तरी परिक्षेत... व तु रडून रडून डोळे लाल करुन बसली होतीस.. राम मंदिराच्या मागच्या बागेत.... त्यावेळी देखील तुला आधार देण्यासाठी मीच आलो होतो.. तुला कधी झोप लागली व तु माझ्या खांद्यावर विसावलीस हे तुला लक्षात देखील नसेल.. पण तुझे गालावर सुकलेले अश्रु पाहू माझे पाणावलेले डोळे.. तुला कधी उमजलेच नसतील !

मी जेव्हा जेव्हा माझं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा... तु काही ना काही कारण सागून तेथून निघून जात असे... पण जेव्हा तु स्वतः आपलं प्रेम व्यक्त केलं होतस तेव्हा तु विसरली होतीस... की मी तुझ्या पासून किती दुरावलो होतो.... ! तरी ही ... सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो... पण जसं जसे... तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो... ! आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला न बोलवता त्याला बोलवलंस तेव्हाच खरं तर ह्या कहानीचा अंत होणे गरजेचे होते पण मी वेडा... तुला पुन्हा पुन्हा माफ करत राहीलो .. व तु कधी पुन्हा येशील माझ्या कडे ही आशा करत बसलो !

****
खुप वर्षी झाली होती आपल्या अनाम नात्याला... शक्यतो तु मला विसरली देखील असशील पण मी अधीमधी तुझी माहीती शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत होतो... कधी काळी एकदोन चकरा देखील तुझ्या घरासमोरुन मारल्या.. एकदा तु दिसलीस ही.. मोठी वेणी बांधलेली मागे... गुजराती पध्दतीची ती सिल्कसाडी... गळ्यात मंगळसुत्र... कानातील सोन्याच्या रिंगा... हात देवपुजेचे साहित्य ... ह्म्म बरोबर एक लहान छकुलासा गोंडस मुलगा... असेल ३-४ वर्षाचा... तु आंबाबाईच्या मंदिरामध्ये.. आली होतीस... तु जेथे उभी होतीस त्याचा बरोबर मागे दगडी खांबाच्या मागेच मी उभा होता... तु एकदा पदर सावरायला मागे वळली होतीस... एक क्षण शक्यतो नजरेला नजर मिळाली असे वाटताच मी तेथून बाहेर पडलो... व बाजूच्या छोटेखानी मंदिरामध्ये घुसलो.. ! थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला! ह्म्म तो तुझा नवरा होता.. शक्यतो तुम्ही देवी दर्शनालाच आला होता... !

काही दिवसापुर्वीच तुझी मैत्रीण भेटली होती नेट वर चॅटींग मध्ये.. बोलता बोलता ओळख झाली व जुन्या आठ्वणी पुन्हा हिरव्या झाल्या... ! तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे... ! खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो... ! तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो! पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा ? राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी ? नकोच तुला भेटणे ! पण पुन्हा पुन्हा विचार डोक्यात येत गेले व मी त्या मैत्रीणीला हो भेटतो म्हणून सांगितले !

तुझ्या भेटण्याच्या विचारानेच अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात... कधी काळी हरवलेल्या वाटा... पुन्हा सापडतील ह्याची आशा देखील कधी केली नाही मी.. पण तो योग पुन्हा येत आहे.. माहीत नाही तु मला ओळखशील की नाही... म्हातारा जरी दिसत नसलो तरी मध्ये खुप मोठा काळ वाहून गेला आहे... ज्या काळ्या भोर केसांचा मला कधी काळ माज होता ते केस आता थोडे थोडे पांढरे झालेले आहेत... डोळ्यावर चष्मा चढला आहे.. व आज काल फ्रेंच कट दाढी देखील ठेवली आहे.. माहीत नाही तु ओळखशील की नाही... पण तु अजून तशीच दिसत असशील नाही... त्या तुझ्या पुढे पुढे करणा-या केसाच्या लटा.. आज देखिल हलकेच गालाला स्पर्श करत विसावल्या असतील.. तुझे ते टपोरे डोळे आज देखील तुझ्या मनातील सुख / दुखाचे भाव जसेच्या तसे प्रतिबिंबीत करत असतील... आज देखील देखील तु पहाटे पहाटे अंगणात रांगोळीचा सडा घालत असशील व चुकुन कोणी वेगाने गाडी घेऊन घरा समोरुन गेला तर बाहेर येऊन पाहत असशील की मी तर नाही... दिवस दिवस भर फोन वर गप्पा मारणे तुझ्या इतकं मला कधी जमलंच नाही... त्या तुझ्या मित्राच्या गाडीचे.. पैश्याचे... स्टाईलचे तु केलेलं कौतुक मला कधी जिव्हरी लागलं ह्याचा तु विचारच केला नाही व अचानक एक दिवस मी सोडून गेल्या वर मात्र फिर फिर भिंगरी सारखी गावभर मला शोधत फिरली होतीस .. तेच प्रेम .. तोच भाव आज देखील असेल का तुझ्या मनात ? अशी अनेक प्रश्न मनाच्या कोप-यात चरफडत आहेत... बोचत आहेत.. व कोठे ना कोठे मी संपत आहे !

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ५

दोन एक दिवसानंतर बाबांनी सुट्टी घेतली व म्हणाले " तयार हो, तुला सोडून येतो, परत पळून घरला येऊ नकोस समजले का ?" आईने कपडे भरलेच होते पिशवीत, खायला म्हणून लाडू व चिवडा करुन दिला होता, मी ते घेऊन गुमान बाबांच्या पाठी मागे चालू लागलो पण घरातून बाहेर पडताना आईला नजरेनेच सांगितले मी नाही राहणार तेथे.. पुन्हा पळून येणार.

दुपारच्या दरम्यान बाबा मला घेऊन अण्णाच्या खोलीत पोहचले व म्हणाले " अण्णा, हा लई वात्रट आहे, जरा ठीक ठाक वळण लावा ह्याला" अण्णा " मी काय बळण लावू ह्याला, ह्याला बघून अजून दोनचार पोरं पळून गेली मागच्या आठवड्यात, तुम्ही ह्याला घरीच घेऊन जा. तेथेच राहू दे." मी एकदम खुष झालो पण झालेली खुषी चेह-यावर दिसली व बाबांनी एकदम कान खेचले व म्हणाले " राजा, लेका तंगडचं तोडतो बघ तुझं... पुन्हा हसलास तर" अण्णाची समजुत घालून बाबा परत गेले व मी परत आपल्या हॉस्टेल मध्ये !

बाकीच्या पोरांच्यात माझं जरा नाव झालंच होतं.. चार-पाच वेळा पळुन गेलो होतो ह्याचंच त्याना नवल वाटत असे.. त्यामुळं बाकीची पोरं माझ्या बरोबरच फिरु लागली, अण्णाच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नव्हती, मग अण्णाने एक एक पोराला धमकीच्या सुरात समजवले की माझ्या नादी लागू नका.

सगळ व्यवस्थीत चालू होतं, पण मध्येच पुर्व परिक्षा झाली व नेहमी प्रमाणे मी पास झालो पण जरा मार्क कमी पडले व ३५% नेच पास झालो ! मग शाळेत वळ पडू पर्यंत मारला.... व संध्याकाळी अण्णाने धुतला व शेवटी घरी पत्र लिहिले व बरोबर माझे मार्कशीट पण पाठवले ! मी विचार केला बाबा येथे आले म्हणजे झालं.... सगळ्याच्या समोरच मार खाण्याची पाळी.. एक चुकीसाठी तीन तीन वेळा मार ? पळायची तयारी कर पुन्हा... तावडीत सापडलो तर मेलो.. हाच विचार करत रात्रभर जागून काढली व पहाटे पहाटेच बाहेर पडलो.. !

रात्री ३.३० / ४.०० च्या आसपास चा वेळ होता अण्णा अजून झोपलाच होता व मंदिर देखील शांत शांत दिसत होतं... ! मी हळुच खाली उतरलो व मेन रोडनेच चालत चालत.. गेटचा बाहेर आलो.. एक आजोबा बाहेर उभे होते... मला पाहून हसले व म्हणाले " सकाळ सकाळी फिरणे चांगली सवय आहे बाळा " मी " हो" म्हणालो व सरळ हातकलंगडेचा रस्त्ता पकडला
जरा वेगानेच मी जवळ जवळ अर्धा रस्ता पार केला... तो पर्यंत सुर्य उगवला होता म्हणजे अण्णाला माहीत झाले असनार की मी गायब आहे ! तेव्हा मी जरा आड रस्त्यानेच चालु लागलो व मेन सांगली हायवे वर दोन्-तीन तासात पोहचलो. चालता चालता विचार केलाच होता कुठ जायचे ह्याचा, जवळच जयसिंगपुर होतं व इचलकरंजी विरुध्द दिशेला पण दोन्ही पैकी एका बाजूला !
जयसिंगपुरला आत्या राहत होती.. व इचलकरंजीला माऊशी.. मी जयसिंगपुरला जाणे नक्की केले... कारण बाबाच्या स्वप्नात पण हा विचार येणार नाही की मी जयसिंगपुरला जाऊ शकतो !

कधी बैलगाडितून कधी... सायकलसवारी करुन.. कधी मध्ये.. ट्रक मधून प्रवास करत मी दहाच्या दरम्यान जयसिंगपुरला पोहचलो ! पण एक लोचा होता.. मी आत्याच्या गावी कधीच आलो नव्हतो.. त्यांनी मला बघितलं होतं पण मला त्यांच नावच आठवत नव्हतं.. फक्त दोन गोष्टी आठवल्या.. मगदुम मळा.. व कागवाडे अत्त्या !

मी फिरत फिरत मगदुम मळ्यात पोहचलो तर इन मीन तीन घरं ! मी विचार केला ह्यातलंच कुठली तरी एक घर .. नक्की ! मी सर्वात प्रथम येणा-या घरात घुसलो.. व विचारले " कागवाडे अत्या ?" आतुन एक बाई आली म्हणाली.. " कागवाडे ? इथं कोणीच नाही राहत, आम्ही पण नवीन आहोत.. मागे पाटिल बाईंना ईचार" मी पाटिल बाई कडे पोहचलो " काकु, कागवाडे अत्याचे घर ? " त्यांनि मला नखशिकांत पाहीले व म्हणाली " तु जेवढ्या वयाचा आहेस तेवढी वरिस झाली त्यांना मळा सोडून" मी टरकलोच .. तो च त्या म्हणाल्या " ते तर धरणगुत्तीला गेले आहेत राहायला कवाच" धरणगुत्ती नाव कानावर येताच सगळा उलगडा झाला.. मी म्हणालो " ठीक ठीक..." धरणगुत्तीची आत्या.. व जयसिंगपुरची अत्या जवळ जवळच राहत होत्या.. वे धरणगुत्तीची अत्या आमच्या अघरी नेहमी येत असे... ! व मी देखील सुट्टीला गेलो होतो त्याच्या मळात !

मळा ते सांगली हायवे कमीत कमी ३ किलोमिटर ! म्हणजे सहा किलोमिटरचा चक्कर... ! व जयसिंगपुर ते धरणगुत्ती ८ किलोमीटर ! तीन च्या आसपास मी धरणगुत्ती मळ्यात पोहचलो व शेतातल्या झोपडीत पोहचलो ! जवळ पास कोणी दिसतच नव्हतं.. धरणगुत्ती अजून दोन एक किलोमीटर .. पण हे आत्याचे शेत हे नक्की माहीत होतं... ! त्यामुळे मी बिन्धास्त होतो.. आत गेलो.. जेवण बांधून ठेवलेले होते.. मस्त पैकी जेवलो.. व ताणून दिली.. !

"राजा, तु कवा आलास रे" मी डोळे चोळत बघीतलं तर आजोबा समोर.. मी त्यांना मीठी मारली व म्हणालो.. " दुपारी" आजोबा " कुणा बरोबर आलास व कसा आलास ?" मी " पळून आलो, हॉस्टेल मधून... चालत आलो जयसिंगपुर पासून येथे पर्यंत" आजोबांनी कप्पाळाला हात लावला व मला सायकल वर बसवून गावाकडे निघाले व म्हणाले " लेका राजा... येवढ कसं काय रे चालास तु ? पाय दुखत हायत का नाय ? " मी म्हणालो " बाहुबली मध्ये.. कसरत करुन .. आता नाय दुखत पाय"
आजोबा म्हणाले " पण तु पळालासच का ?"

संध्याकाळ पर्यंत आम्ही घरी पोहचलो व दोन्ही अत्यांना माझा प्रताप व्यवस्थीत समजला... पण सकाळ ३.०० वाजल्यापासून.. दुपार पर्यत केलेल्या पायपीटीमुळे अथवा थकव्यामुळे मला रात्री जबरदस्त ताप चढला... ! रात्रभर अत्याने माझ्या डोक्यावर पाणाचा पट्ट्या लावून जागून काढली तेव्हा कुठे सकाळी जरा मला आराम आला... व मी निवांत झोपलो..

आजोबांनी गावातल्या एकाला आमच्या घरी पाठवले व घरी निरोप द्यायला सागितले..! दुस-या दिवशी सकाळ सकाळच्या बसने आई-बाबा व अक्का धरणगुत्तीला पोहचले तेव्हा मी बाजूच्या पोरा बरोबर कवडीचा खेळ खेळत बसलो होतो पाठीमागून रट्टा बसणार येवढ्यात अत्याने बाबांना थांबवले व मला बाजूला केले.. व म्हणाली " अण्णा, लहान आहे अजून.. परवा रात्री लई ताप पण हुता त्याला.. राहू दे मारु नकोस.. मी लई मारलय आधीच. पण पोरंग लई शहाणं हाय बघ.. आपल्या आत्येचा पत्तापण त्याला थाव हाय "
बाबा म्हणाले " पळाला म्हणून मारत नव्हतो.... पण पळून जाण्यासाठी जेवढं डोकं वापरतो तेवढं आभ्यासात का नाही वापरत."
आजोबा म्हणाले " एवढंच कार्ट... हाय पण जीव लई हाय ह्याच्या मंदी... खेळ हाय व्ह.. ह्या वयात... दहा -पंधरा मैल चालणं .. तरी बरं.. अप्पासो हा लेकाचा इकडंच आला... जरा कुठ अजून गेला असता तर ह्याला शोधायचा कुठ ?... "

आई बरोबर मी बसलो होतो, आई म्हणाली " तुला इकडे कसं यावसं वाटलं...इचलकरंजीला का नाही गेलास मग ?"
मी म्हणालो " मी इचलकरंजी आहे ते तात्यांनी तुम्हाला लगेच कळवले असते म्हणून ईकडे आलो"

क्रमश :