शुक्रवार, २३ जानेवारी, २००९

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

आई ने जाताना माझ्या आवडिचे बेसनचे लाडु व भडंग करुन दिला व काही पैसे खिश्यात ठेवले, अक्काने पण आपला बॉलपेन दिला व म्हणाली " दादा, परिक्षा देऊनच, ये. परत." मी जसा कैद्याला फाशीसाठी घेऊन जातात तसे तोंड करुन बाबाच्या मागे चालू लागलो, थोड्या वेळाने कोल्हापुर बस स्थानकावर आलो, बाबांनी मला एके जागे बसवलं व ते गाडीची टाईमींग विचारायला गेले, समोर मुतारी होती.. मी आपलं सामान तेथेच व्यवस्थीत लावले व सरळ मुतारी कडे गेलो. विधी आवरल्यावर बाहेर आलो तर बाजुलाच एक ज्युसचे दुकान होतो.. खिश्यात पैसे होतेच मी आपला एक ज्युस घेतला व आपलं पित तेथेच उभा राहीलो.. ज्युस संपला गाड्या बाहेर जाण्याचं गेट तेथेच चार पावलं पुढं.... बाहेर एक उलट्या छत्री मध्ये स्टिकर विकत होता... मी सरळ त्याच्या कडे.. हिमॅन माझा आवडता.. त्यातील काही स्टीकर पाहण्याच्या नादात वेळ कसा निघून गेला कळालेच नाही... इकडे बाबा दोन्-एक मिनिटामध्येच आले असतील पिशवी तेथेच व मी गायब हे पाहून त्यांचे डोके भडकले.. ते शोध शोध मला शोधू लागले व मी आपला स्टीकरवाल्याच्या मागे.... तो मला वैतागुन आपली जागा बदलत होता मी कुत्राच्या शेपटासारखा च्या मागे... अर्धा एक तास झाला असेल मला हवा असलेला हि-मॅन मला मिळाला.. ! मी तो हि-मॅन घेऊन परत फिरत फिरत गाड्या येणाच्या गेट ने बस स्थानकावर गेलो.. पण चुकिच्या गेट ने आत आलो होतो त्यामुळे कुठ बसलो होतो ते विसरलो मी आपला बाबांना शोधत.. समोर असलेल्या पुणे-मुंबई स्थानकाजवळ आलो (जे कोल्हापुरला गेले आहेत त्यांना माझी चक्कर समजली असेलच. ) मी आपला बाबांना शोधत होतो व बाबा मला.... पाच-दहा मिनिटातच बाबा समोरुन पिशवी घेउन येताना दिसले, मी पळतच त्याच्या जवळ व म्हणालो.. " कुठ हरवला होता... मी कधी पासून शोधतो आहे.. " झालं बाबांनी एक वाजवली व म्हणाले " तुला जागा सोडू नको म्हणून सांगितले होते ना ?" मी आपला कानचोळत व डोळे फुसत त्याच्या मागोमाग बस मध्ये जाऊन बसलो.

बाबांनी मला अण्णाच्या तावडीत दिला व म्हणाले " काहीच महीने आहेत संभाळून घ्या, पण सुधारयलाच हवा." अण्णा हो म्हणाले व हसले. ( त्यावेळी त्यांच क्रिप्टीक मला समजलं नाही प्रभु संगे नव्हते ना ) बाबा निघून गेले व अण्णानी कोंबडीची मान पकडावी तशी माझी पकडली व हसत म्हणाले " कशाला सारखा मार खातोस.." मी म्हणालो " तुम्हीच तर मारता." अण्णाने डोळे वटारले व मी आपली पिशवी घेउन सरळ हॉल कडे घुम ठोकली.

चांगले पंधरा वीस दिवस मी एकदम व्यवस्थीत राहीलो.. ना दंगा, ना पळापळ.. अभ्यास व्यवस्थीत... सकाळी टायमात उठणे.. व्यायाम... कश्यात कश्यात चुक नाही... त्या दिवसामध्ये अण्णाला पण विचित्र वाटले असावे इतका मी सुधरल्या सारखा राहू लागलो, शेवटी निलला राहवले नाही व त्याने विचारलेच " राज, काय झालं ? तु असा एकदम व्यवस्थीत का वागत आहेस ?" मी म्हणालो " अरे काहीच महीने आहेत आई म्हणाली आहे की मी सरळ वागलो तर मला पुढील वर्षी येथे ठेवणार नाहीत." निल हसत म्हणाला " माझी आई पण असे म्हणाली होती मला मी सरळ वागत आहे बघून पुन्हा तीन वर्षाची फी भरली मागच्याच वर्षी." असे म्हनून तो गेला. माझ्या डोक्यात किडा उठला.. जर अण्णाने सांगितले की मी चांगला वागत आहे व बाबांनी पुन्हा फी भरली तर ?

अण्णाचे दिवस पुन्हा फिरले फक्त तो तेच पंधरा वीस दिवस सुखाने झोपला असेल..... हा हाल झाला की हॉस्टेल मध्ये कुठ ही कट् असा आवाज झाला तरी तो "राजा.." असे किंचाळायचा. खुप त्रास दिला त्यांना मी त्या काळात.... पण शांतीसागर महाराजांच्या जन्म दिनानिमित्य प्रमुख पाहूण्याच्या समोर भाषणासाठी कोणच उभं राहत नव्हतं त्यावेळी मी हात वर केला होता व व्यवस्थीत चांगले भाषण दिले होते व पाहुण्याच्याकडुन पेनचं गिफ्ट पण मिळवलं होतं तेव्हा मात्र अण्णा आनंदला होता जाम... ! त्यानंतर मी किती ही खोड्या केल्या .. त्रास दिला पण अण्णाने हात नाही उचलला.... फक्त डोळ्यानेच रागवायचा... २६ जानेवारीच्या दिवशी पण त्याने माझ्या कडुन पाहुण्याच्या समोर भाषण म्हणवून घेतले... माझा इतिहास चांगलाच होता व स्मरणशक्ती त्यामुळे मी हातात लिहलेला कागद न घेताच मनानेच भाषण देत असे तेच अण्णाला आवडले असावे... अण्णा सुधरला होता की मी सुधरलो होतो माहीत नाही पण आमच्यात जुळु लागलं होतं...

पण तो शनिवार आला व सगळी गडबड झाली... जवळच्या गावात राहणा-या विद्यार्थांनी खबर आणली गावाच्या जत्रेची पुढील शनिवारी कुंभोज गावात जत्रा होती व हॉस्टेल च्या मुलांना तिकडे जाण्यास मनाई होती.. पण मी आमच्या हॉल मधील दहा-पंधरा मुलांच्या समोर व्यवस्थीत भाषण दिले व प्लॅन करुन दिला की कसे जायचं व यायचं पोरं जाम खुश.. अण्णाला पटवायची तयारी मी केली होती... तो शनिवार आला सकाळच्या शाळे नंतर मी अण्णाकडे गेलो व डोंगरावर फिरायला जाण्याची परवानगी मागितली.. अण्णा म्हणाला.. " कोणाला तरी बरोबर घेऊन जा, व संध्याकाळी आल्यावर मला काय काय पाहीले.. काय काय फळे दिसली ह्याची नोंद करुन दे. " मी मनात म्हणालो.. " ह्यात पण अभ्यासच ? " आमच्या शाळेत तो एक विषय होता... !

आम्ही मस्त पैकी चांगले चार्-पाच तास जत्रे मध्ये भरकटलो.. जे मनाला येईल ते केलं... ! कोणाला गोळ्या खायच्या होत्या त्याने गोळ्या खाल्या.... कोणाला... चिवडा खायचा होता त्यानं ते खालं... मला केक खायचा होता मी केक खल्ला ( स्वतः च्या पैशाने) आम्ही मस्त पैकी मजा करुन पाचच्या आत हॉस्टेल जवळ पोहचलो, कोणाला काही ही न बोलण्याची सर्वांना शपथ दिली व सगळे आपल्या हॉल वर परतलो.

पण साला एक फुटिर निघाला... गद्दार.. माझ्या केक ची खबर अण्णाला दिली कोणी तरी सोमवारी-मंगळवारी ! अण्णाचे हात शक्यतो शिवशिवत असावेत कोणाला तरी मारण्यासाठी मी तावडीत सापडलोच होतो... धु धु धुतला !! प्रचंड मार म्हणजे काय हे मला त्या दिवशी समजले ! जेव्हा मारुन थकले तेव्हा त्यांनी एकच वाक्य बोलले " केक खाताना मजा आली का नाही ? धर्म भ्रष्ट केलास...." माझे डोके च्मकले मी म्हणालो " अण्णा, मी केक खाल्ला तर ह्यात धर्म कुठे आला मधी..." परत धुतला .. व म्हणाले " अंड्याचा केक खल्लास वर धर्म कुठे बुडाला" मी त्या परिस्थिती पण चेह-यावर हसू आणत म्हणालो " अण्णा, तो केक अंड्याचा नव्हता.. केक म्हणजे चॉकलेट आहे ते... त्याचे नाव केक आहे.. लाल रंगाचं... शाळेच्या दुकानात पण मिळते" अण्णा वरमला... एका पोराला जवळ बोलवलं व विचारलं की केक नावचं चॉकलेट येतं का ते.. तो हो म्हणाला.. अण्णाने मला सोडलं ! तो वरमलेला पाहून मी विचारलं " तुम्हाला कोण म्हणालं की मी केक खल्ला ? " अण्णा माझ्या कडे बघत म्हणाला " कोणी नाही जा आपल्या हॉल वर.. चल." मी गुमान हॉलवर आलो... जे संगे आलो होते जत्रेला त्या सर्वाच्यावर संशय.

तो फुटिर निघाला म्हणून काय झालं त्याचा पण एक दोस्त फुटीर झाला व मला सुचना दिली की कोणी अण्णाला सांगितलं !

"गुंडगिरी करतोस, तुम्ही कोल्हापुरची पोरं, एक जात गुंड... ! का मारलंस त्याला ? " मी गप्प मान खाली घालून उभा... फुटीराने जशी मला बातमी दिली होती त्या नुसार त्याला मी धुतला होता... चांगल अंघोळीच्या विहीरी मध्ये धक्का दिला होता... " त्याचा जिव गेला असता तर ? तु काय केले असतेस ? " अण्णा आपल्या टिपीकल भाषेमध्ये आला होता... त्याचा राग त्याच्या थरथरण्यावर कळालाच होता... त्याने एका शिपायाला बोलवलं व म्हणाला " ह्याचं नाव लिहून घे. ह्याचा शाळेतून दाखला घेऊन ये. मी ऑफिस मधुन येथला दाखला घेऊन येतो. ह्याला पाठवा परत घरी कोणाचा तरी जीव घेईल हे कार्ट"

कुणाचा जिव घेण्याचा का प्लान नव्हता माझा व घरी परिक्षे शिवाय जाणे म्हणजे तेथे पण मार... ह्या दोन्ही गोष्टी मुळे मी रडू लागलो व अण्णाच्या पायात बसलो व पुन्हा चुक करणार नाही हाच एक घोष लावला ! काय झालं काय माहीत पण अण्णा वरमला..! त्यानंतर मी दोन महीने पुर्ण शांतते मध्ये काढले व शालेय परिक्षेचा निकाल हाती येऊ पर्यंत अण्णाच्या हाताला लागलो नाही, जेव्हा निकाल हाती आला... तेव्हा आई-बाबा येणार होते घेण्यासाठी... २ च्या बस ने मी.. सकाळी अण्णा कडे गेलो व अण्णाला म्हणालो " अण्णा... मी पास झालो. बाबा येणार आहेत मला घेऊन जाण्यासाठी." अण्णानी माझ्या केसातून हात फिरवला व म्हणाले " ठीक. घरी जास्त दंगा करु नकोस... जेव्हा मोठा होशिल तेव्हा मला येऊन नक्की भेट... मला माहीत आहे तु पुन्हा येणार नाही इकडे"

*******************
२००७
*******************

कित्येक वर्षानंतर मी बाहुबलि मध्ये गेलो होतो... तेच हॉस्टेल... तेच हॉल.. तीच शाळा...तेच भोजनालय... तेच मंदिर.... थोडे फार नवीन बांधकाम सोडले तर काहीच बदलले नव्हते... दोन चार पोरं समोरुन येताना दिसली.... पांढरा शर्ट... काळी चढ्डी ! टिपीकल बाहुबली शाळेचा ड्रेस. त्यांना विचारलं " शाळा चांगली आहे का रे ? " मुलं " हो " मी " हॉस्टेल? " पोरं काहीच बोलली नाही नुस्तेच हसलीत.... जसा मी हसत होतो त्याकाळी... मी " अण्णा अजून मारतो का रे ? " मुलं " अण्णा. नाही... पण अण्णा हॉस्टेल बघत नाहीत आता.. ते आपल्या रुम मध्येच असतात.. " त्यांनी नवीन अण्णाचे नाव सांगितले पण माझे लक्ष तिकडे नव्हतेच.. मी सरळ अण्णाच्या जुन्या रुम वर गेलो.... तीच टिपिकल रुम... काही ही बदल नाही.... पुस्तकांचे रॅक एका बाजुला... खॉट एका बाजुला... दोन लाकडी खुच्या... व एक छोटेखानी किचन. मी बेड वर पाहीले अण्णा आराम करत होते... मी आत गेलो व पाया जवळ बसलो, व अण्णा अजून पर्यंत तसाच ड्रेस घालत होते जसा मी बघीतला होता.. पांढरा सदरा व पांढरे धोतरं ! त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.... त्यांनी डोळे उघडले व म्हणाले " मी आपल्याला ओळखले नाही." मी म्हणालो " अण्णा, मी राज जैन... कोल्हापुरचा.. येथे होतो... १९** मध्ये... एकच वर्ष " डोक्याला जरा ताण देत म्हणाले " राजा, अप्पासोचा मुलगा. कपडे व्यापारी" ते मला विसरले नाहीत हे पाहू माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले , मी त्यांच्या पायावर हात ठेवत म्हणालो " हो, तोच, मी." खुप गप्पा मारल्या त्याच्या सोबत.... व जाताना शेवटी म्हणालो.... " अण्णा, एक सत्य सांगतो... त्यावेळी कुंभोज मध्ये मी केकच खाल्ला होता.. अडां केक. तुम्ही ज्या मुलाला बोलवले होते ना की केक नावाचं चॉकलेट आहे का नाही... विचारायला... तो निल होता... तो माझ्या साठी खोटं बोलला होता... " अण्णा हसत म्हणाले " तु जेव्हा जाण्यासाठी आला होतास ना माझ्या कडे... त्याच्या आधीच निल माझ्या कडे माफी मागून गेला होता... व खरं काय ते सांगून देखील. " मी त्याच्याकडे बघतच राहीलो.... अण्णा म्हणाले " आपला धर्म अहिंसा शिकवतो.. इतकी वर्ष झाली... कुठे ना कुठे तुला देखील अहिंसेचे महत्व कळालेच असेल नाही ! मग.. आम्ही हॉस्टेल मध्ये शाळेमध्ये हेच शिकवण्याचा प्रयत्न करतो.. बस पण तुम्ही मुलं ... तुझ्यासारखी वात्रट मुंल हा स्वर्ग सोडून पळुन जायला बघतात..."

मी त्यांना पुन्हा नमस्कार करुन बाहेर आलो व बाहुबली मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे वळलो.

समाप्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: