मंगळवार, २७ जानेवारी, २००९

दिल्ली ते दिल्ली ! भाग - ३

आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.



मागील भाग 



ठाण्याला पोहचल्यावर मला पहिल्यांदा कळाले की वंदना हे नाव बस स्थानकाचं देखील असू शकते....  लवकरच  रिक्षा पकडुन आम्ही मार्गस्थ झालो.. लुईसवाडी.  भव्य अश्या अपार्टमेंट जवळ पोहचु पर्यंत प्रभु आम्हाला मोबो वर  मार्गदर्शन करतच होते... लिफ्ट द्वारे ४थ्या मजल्यावर पोहचलो, दरवाजा उघडा ठेऊन एक वयाने आजोबा सारखे व्यक्ती बसलेले दिसले व आम्हाला बघताच ताडकन उठून आले व आत या म्हणत... आत घेतले !  काही क्षणामध्ये ओळख-पाळख झाली निलकांतने माझी ओळख करुन दिली व क्षणार्धात प्रभुने कट्टा चालू केला.

प्रभु " सर्वसाक्षी, विजुभाऊ, टार्या व रामदास येतीलच आता." मी " ह्म्म."  प्रभु " तु मिपावर का दिसत नाहीस ?"  मी " हम्म नाही, असंच थोडंस मतभेद" प्रभु " का ?"  मी "२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही"   त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;)  माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे ! " तुझ्या बाबाचं काय जातं ? " इति प्रभु.  पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो.."मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार...." असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा वर मी दोघे पण चिंतन करु शकलो.  हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले...  दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले..  तोच प्रभु म्हणाले " आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता..."  तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार  (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले " कुठे प्रवासाला ? " प्रभुने माझ्या कडे उंगलीदर्शन करुन सांगितले " ही त्याची.. राज जैन"  मी " सर्वसाक्षी साहेब, मी तुमचा मनोगत पासूनचा चाहता... तुमचं लेखन आवडतं बरं मला खुप."  आपला नेहमीचा मस्का ट्राय !
हसून " अच्छा... तुमच्या प्रतिक्रिया असतात.. "  आपल्या मस्काची वाट लागलेली पाहून मी तीच गोळी परत रामदास बुवा कडे पण फिरवली.. ते पण आपले स्मित हास्य करुन गप्प... मी मोठ्या प्रमाणे विचार करुन तोंड बंद ठेवले व त्यांच्या गप्पा मध्ये रस घेऊ लागलो.... 
तोच कोणी तरी म्हणाले " तुम्हीच का राज जैन ? वाटत नाही तुमच्या कडे पाहून"  मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत  कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो " हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे ? " तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... !   प्रभु म्हणाले "अरे लेका ल म्हणजे ... लंडनचा  ;) " एवढेच आम्ही एकले व मी व रामदास ह्याचा हास्य कार्यक्रम चालू झाला..." टारझनचा होता... फिरतो आहे आपल्या जेन बरोबर लेकाचा इलिफंटा वर... तीन वाजताच सांगितले होते की टायमात ये म्हणून आला तर ठीक... मी आता फोनच नाय करत."- प्रभु.


आत किचन मध्ये... काकु काही तरी तळत होत्या.. व त्याचा मंद असा सुवास बाहेर बैठकी मध्ये दरवळत होता... व पोटाले उंदिर जागे होऊन उड्या मारुन लागलेच होते तो पर्यंत पुन्हा लिफ्ट वाजली.... व तात्या आले... ! ती भरभक्कम काय मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;)   माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय ? मी उंदीर ते हत्ती !  त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... ! प्रभु म्हणाले " बस रे. जाशील. हे सर्वसाक्षी पण परोल वर आले आहेत... "  सर्वसाक्षी " हो कुटूंब गेलं आहे हळदी कुंकु करायला.. तो पर्यंत पेरोलच आहे... बाकी आठ ला मी पण जाणार.."


रामदासबुवा तर खुप मितभाषी आहेत बॉ... आमच्या बडबड्या ग्रुप मध्ये.. निलकांत-विजुभाउ व हे गप्पचुप ! त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... ! त्यावर ते पुन्हा हसून गप्प !   तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... ! एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. !   काकुंची व आपल्या मुलाची अभिषेक ची ओळख करुन दिली प्रभुंनी.... आम्ही नमस्कार केला...  तात्याने दंडवत घातला... आम्हाला आपल्यात असले संस्कार का नष्ट झाले ह्याचा विचार करण्यास एक संधी मिळाली... मी पुढे होऊन नमस्कार घालावा हा विचार करत होतोच.. पण काकु किचन मध्ये.. काय तर सुर-सुर वाजले म्हणून आत गेल्या... व माझा संस्कार दाखवा कार्यक्रम तेथेच बंद पडला..


पुन्हा चर्चेची गाडी मी मिपावर नसल्याच्या मुद्द्यावर.....  रामदास " तुम्ही मिपावर दिसत नाही आजकाल " प्रभु " येडझवा आहे.." साक्षी " हो तुम्ही दिसत नाही"  तात्या " सोडून गेला आहे... "  मी  एकाद्या निर्लज गुन्हेगारासारखा हसत " नाही हो... येतो आहे.. येणार आहे... " म्हणत ... म्हणालो " तात्या, क्लास झाला आहे.. परवा दिल्ली पोहच्लो की लॉग इन होतो.. " ... विजुभाउ पण हसत म्हणाले " ह्म्म.. पाहू"   तात्या पण " पाहू"  असे म्हणुन पण तात्या मी निघतो, असे सांगून पार झाले !


पुन्हा फोन प्रभुचा.. " आला... येईल आता लगेच टार्या... त्याला घेऊन येतो मी... बसा.." अहो आम्ही पण येतो " साक्षी साहेब पण चला मी पण येतो असे म्हणून.. मागे मागे... त्याच्या मागे रामदास बुवा... त्यासर्वांच्या मागे निलकांत.... आता मोकळ्या हॉल मध्ये मी बसून काय करु.... व काही तरी पोटात गेल्यावर धुराडे काढणे जरुरि म्हणून मी पण त्याच्या मागे मागे... प्रभु सर ह्या वयात देखील  ;)  सर सर चार मजले उतरून खाली गेले... पाय-यांनी... ! मला स्वतःची लाज वाटू नये म्हणून मी-विजुभाउ-निलकांत... सर्वजण देखील त्याच्या पाठी मागे पाय-या उतरुन खाली गेलो... !


जवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले व चर्चा पुन्हा रंगू लागली... दोन एक धुराडे सोडून होऊ पर्यंत साक्षी साहेबांनी सुभाषचंद्र बोस ह्याच्या बद्दल तसेच काही अनाम क्रातिंवाराबद्द्ल उत्तम माहीती सांगितली !  पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता..  पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली !  तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत  (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. ! पण माझ्या मनातील प्रश्न मी तीथेच गिळला व पुन्हा चर्चेत सहभागी झालो... तो पर्यंत निलकांत व साक्षी ह्यांची गाडी लई पुढे गेली होती व मुद्दे काहीच कळत नव्हते... हे पाहून मी पुन्हा एक धुराडा सोडला व निचिंत पणे उभा राहीलो...


प्रभु ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने एकटेच परत आले.. टार्याला विसरलेली काय ? असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला पण येवढ्या वयस्कर  ;)  मानसाला कसे विचारावे म्हणून गप्प बसलो... तोच मागून एक रिक्षा दिसली व दोनचार टन वजन भरले असावे ह्या प्रकारे हळू हळू.. पुढे येत होती... मी विचार करतच होतो... की वाहतूकीच्या साधनातून लोक आपले वजनी सामानाची का ने-आण करतात, मुंबई मध्ये काही कायदा आहे का नाही.. हा प्रश्न मी निलकांतला विचारावे म्हणून सारावलो होतो तोच.. त्याच रिक्षातून... एक सुकुमार... नवयुवक आपले एक ट्नी धुड सांभाळत बाहेर पडला... व रिक्षावाल्याला पैसे देऊन आमच्या कडे पाहून हसू लागला..  व प्रभु सरांच्या कडे आला...  ह्याला कुठे तरी पाहीला आहे हा विचार डोक्यात घण घालू लागला व सर्वाच्या खरडवह्या डोळ्यासमोरुन काढल्यावर टारझन म्हणजे हाच नमुना ह्यावर शिक्कामोर्तब केला.


" अरे हेच काय राज जैन, वाटत नाय यार..."  असा चार-पाच वेळा माझा उलेख त्याने केला व ह्याला उचलून चवथ्यामाळावरुन सरळ ग्राऊडला टाकावे ह्यासाठी माझे हात सळसळू लागले पण मी ६० किलो तो ६०० किलो कुठ पेलवणार ह्या व्यवसायीक हिशोबाने मी तो विचार रद्द करुन त्याच्या विनोदाला दाद दिली.   :D  थोड्या वेळाने टार्याची पण पोट पुजा झाली ( त्याच्या गळ्यातच चिकटले असेल... पोटापर्यंत पोहचलेच नसेल पण .. राहु दे)  पुन्हा एकदा अभिषेक ची ओळख परेड झाली व गाडी त्याच्या शिक्षणावर पोहचली... !  अभिषेक कडे पाहून व त्याचे शिक्षण पाहून आनंद झाला... त्याने कुठला तरी उच्च कोर्स लावला आहे व त्या कोर्स साठी फक्त १०० सिट साठी काही शे अर्ज होते त्या पण  हा पहिल्या पाच मध्येच निवडला गेला असे काहीतरी मला कळाले ( आम्ही दहावी पास... ते पण.. कसे दे देवालाच माहीत.. त्यामुळे त्याची डीटेल देऊ शकत नाही) 


वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.. एक निलकांत सोडला तर बाकी सगळे मला नवीन होते व त्यांना मी नवीन पण जसे काही वर्षापासूनचे जुने सवंगडी बोलावेत वागावेत असे सगळे वागले... खुप आनंद झाला.... ! कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... ! व रामदास-साक्षी-प्रभु-विजुभाउ एका गुप्त मिटींग ला जाण्यासाठी व निलकांत-टार्या पुणे ला जाण्यासाठी व मी दिल्ली ला जाण्यासाठी बाहेर पडलो... !


प्रभु, निलकांत, विजुभाउ, साक्षी साहेब, तात्या व रामदास बुवा ह्या सर्वांनाच भेटून आनंद झाला ! असेच आपण नेहमी भेट राहू हा आशावाद घेऊन मी.. मिपावर पुन्हा लिहते झाल्यावर काय काय फाडायचे व काय काय शिवायचे ह्याचे प्लान करत आपल्या ट्रेन कडे रवाना झालो !


 


हुश्श !!!


 


समाप्त !


 


पण ह्यावेळचा माझा प्रवास माझ्या जन्मभर लक्ष्यात राहील मी एक-दोन नाही तर चांगले ९ मिपा करांना भेटलो... चार जनांशी फोनवर बोललो ! सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. ! याहू ग्रुप वर शेकडोंनी मित्र व जीमेल मध्ये काही हजार आयडी पण कोणाशी भेटावे.. कोणासाठी आपला कामधंदा सोडून जावे एवढी आत्मीयता मला कधीच झाली नाही पण मिपावर ती आत्मियता निर्माण झाली व अनेक वर्षापासून अमराठी मित्राच्या गराड्यात हरवलेला राज जैन... परत आपल्याच मातीच्या... भाषेच्या मित्रांच्या जगात आला... हे पाहून त्या देवाला देखील आनंद झाला असेल... !


 

शुक्रवार, २३ जानेवारी, २००९

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

आई ने जाताना माझ्या आवडिचे बेसनचे लाडु व भडंग करुन दिला व काही पैसे खिश्यात ठेवले, अक्काने पण आपला बॉलपेन दिला व म्हणाली " दादा, परिक्षा देऊनच, ये. परत." मी जसा कैद्याला फाशीसाठी घेऊन जातात तसे तोंड करुन बाबाच्या मागे चालू लागलो, थोड्या वेळाने कोल्हापुर बस स्थानकावर आलो, बाबांनी मला एके जागे बसवलं व ते गाडीची टाईमींग विचारायला गेले, समोर मुतारी होती.. मी आपलं सामान तेथेच व्यवस्थीत लावले व सरळ मुतारी कडे गेलो. विधी आवरल्यावर बाहेर आलो तर बाजुलाच एक ज्युसचे दुकान होतो.. खिश्यात पैसे होतेच मी आपला एक ज्युस घेतला व आपलं पित तेथेच उभा राहीलो.. ज्युस संपला गाड्या बाहेर जाण्याचं गेट तेथेच चार पावलं पुढं.... बाहेर एक उलट्या छत्री मध्ये स्टिकर विकत होता... मी सरळ त्याच्या कडे.. हिमॅन माझा आवडता.. त्यातील काही स्टीकर पाहण्याच्या नादात वेळ कसा निघून गेला कळालेच नाही... इकडे बाबा दोन्-एक मिनिटामध्येच आले असतील पिशवी तेथेच व मी गायब हे पाहून त्यांचे डोके भडकले.. ते शोध शोध मला शोधू लागले व मी आपला स्टीकरवाल्याच्या मागे.... तो मला वैतागुन आपली जागा बदलत होता मी कुत्राच्या शेपटासारखा च्या मागे... अर्धा एक तास झाला असेल मला हवा असलेला हि-मॅन मला मिळाला.. ! मी तो हि-मॅन घेऊन परत फिरत फिरत गाड्या येणाच्या गेट ने बस स्थानकावर गेलो.. पण चुकिच्या गेट ने आत आलो होतो त्यामुळे कुठ बसलो होतो ते विसरलो मी आपला बाबांना शोधत.. समोर असलेल्या पुणे-मुंबई स्थानकाजवळ आलो (जे कोल्हापुरला गेले आहेत त्यांना माझी चक्कर समजली असेलच. ) मी आपला बाबांना शोधत होतो व बाबा मला.... पाच-दहा मिनिटातच बाबा समोरुन पिशवी घेउन येताना दिसले, मी पळतच त्याच्या जवळ व म्हणालो.. " कुठ हरवला होता... मी कधी पासून शोधतो आहे.. " झालं बाबांनी एक वाजवली व म्हणाले " तुला जागा सोडू नको म्हणून सांगितले होते ना ?" मी आपला कानचोळत व डोळे फुसत त्याच्या मागोमाग बस मध्ये जाऊन बसलो.

बाबांनी मला अण्णाच्या तावडीत दिला व म्हणाले " काहीच महीने आहेत संभाळून घ्या, पण सुधारयलाच हवा." अण्णा हो म्हणाले व हसले. ( त्यावेळी त्यांच क्रिप्टीक मला समजलं नाही प्रभु संगे नव्हते ना ) बाबा निघून गेले व अण्णानी कोंबडीची मान पकडावी तशी माझी पकडली व हसत म्हणाले " कशाला सारखा मार खातोस.." मी म्हणालो " तुम्हीच तर मारता." अण्णाने डोळे वटारले व मी आपली पिशवी घेउन सरळ हॉल कडे घुम ठोकली.

चांगले पंधरा वीस दिवस मी एकदम व्यवस्थीत राहीलो.. ना दंगा, ना पळापळ.. अभ्यास व्यवस्थीत... सकाळी टायमात उठणे.. व्यायाम... कश्यात कश्यात चुक नाही... त्या दिवसामध्ये अण्णाला पण विचित्र वाटले असावे इतका मी सुधरल्या सारखा राहू लागलो, शेवटी निलला राहवले नाही व त्याने विचारलेच " राज, काय झालं ? तु असा एकदम व्यवस्थीत का वागत आहेस ?" मी म्हणालो " अरे काहीच महीने आहेत आई म्हणाली आहे की मी सरळ वागलो तर मला पुढील वर्षी येथे ठेवणार नाहीत." निल हसत म्हणाला " माझी आई पण असे म्हणाली होती मला मी सरळ वागत आहे बघून पुन्हा तीन वर्षाची फी भरली मागच्याच वर्षी." असे म्हनून तो गेला. माझ्या डोक्यात किडा उठला.. जर अण्णाने सांगितले की मी चांगला वागत आहे व बाबांनी पुन्हा फी भरली तर ?

अण्णाचे दिवस पुन्हा फिरले फक्त तो तेच पंधरा वीस दिवस सुखाने झोपला असेल..... हा हाल झाला की हॉस्टेल मध्ये कुठ ही कट् असा आवाज झाला तरी तो "राजा.." असे किंचाळायचा. खुप त्रास दिला त्यांना मी त्या काळात.... पण शांतीसागर महाराजांच्या जन्म दिनानिमित्य प्रमुख पाहूण्याच्या समोर भाषणासाठी कोणच उभं राहत नव्हतं त्यावेळी मी हात वर केला होता व व्यवस्थीत चांगले भाषण दिले होते व पाहुण्याच्याकडुन पेनचं गिफ्ट पण मिळवलं होतं तेव्हा मात्र अण्णा आनंदला होता जाम... ! त्यानंतर मी किती ही खोड्या केल्या .. त्रास दिला पण अण्णाने हात नाही उचलला.... फक्त डोळ्यानेच रागवायचा... २६ जानेवारीच्या दिवशी पण त्याने माझ्या कडुन पाहुण्याच्या समोर भाषण म्हणवून घेतले... माझा इतिहास चांगलाच होता व स्मरणशक्ती त्यामुळे मी हातात लिहलेला कागद न घेताच मनानेच भाषण देत असे तेच अण्णाला आवडले असावे... अण्णा सुधरला होता की मी सुधरलो होतो माहीत नाही पण आमच्यात जुळु लागलं होतं...

पण तो शनिवार आला व सगळी गडबड झाली... जवळच्या गावात राहणा-या विद्यार्थांनी खबर आणली गावाच्या जत्रेची पुढील शनिवारी कुंभोज गावात जत्रा होती व हॉस्टेल च्या मुलांना तिकडे जाण्यास मनाई होती.. पण मी आमच्या हॉल मधील दहा-पंधरा मुलांच्या समोर व्यवस्थीत भाषण दिले व प्लॅन करुन दिला की कसे जायचं व यायचं पोरं जाम खुश.. अण्णाला पटवायची तयारी मी केली होती... तो शनिवार आला सकाळच्या शाळे नंतर मी अण्णाकडे गेलो व डोंगरावर फिरायला जाण्याची परवानगी मागितली.. अण्णा म्हणाला.. " कोणाला तरी बरोबर घेऊन जा, व संध्याकाळी आल्यावर मला काय काय पाहीले.. काय काय फळे दिसली ह्याची नोंद करुन दे. " मी मनात म्हणालो.. " ह्यात पण अभ्यासच ? " आमच्या शाळेत तो एक विषय होता... !

आम्ही मस्त पैकी चांगले चार्-पाच तास जत्रे मध्ये भरकटलो.. जे मनाला येईल ते केलं... ! कोणाला गोळ्या खायच्या होत्या त्याने गोळ्या खाल्या.... कोणाला... चिवडा खायचा होता त्यानं ते खालं... मला केक खायचा होता मी केक खल्ला ( स्वतः च्या पैशाने) आम्ही मस्त पैकी मजा करुन पाचच्या आत हॉस्टेल जवळ पोहचलो, कोणाला काही ही न बोलण्याची सर्वांना शपथ दिली व सगळे आपल्या हॉल वर परतलो.

पण साला एक फुटिर निघाला... गद्दार.. माझ्या केक ची खबर अण्णाला दिली कोणी तरी सोमवारी-मंगळवारी ! अण्णाचे हात शक्यतो शिवशिवत असावेत कोणाला तरी मारण्यासाठी मी तावडीत सापडलोच होतो... धु धु धुतला !! प्रचंड मार म्हणजे काय हे मला त्या दिवशी समजले ! जेव्हा मारुन थकले तेव्हा त्यांनी एकच वाक्य बोलले " केक खाताना मजा आली का नाही ? धर्म भ्रष्ट केलास...." माझे डोके च्मकले मी म्हणालो " अण्णा, मी केक खाल्ला तर ह्यात धर्म कुठे आला मधी..." परत धुतला .. व म्हणाले " अंड्याचा केक खल्लास वर धर्म कुठे बुडाला" मी त्या परिस्थिती पण चेह-यावर हसू आणत म्हणालो " अण्णा, तो केक अंड्याचा नव्हता.. केक म्हणजे चॉकलेट आहे ते... त्याचे नाव केक आहे.. लाल रंगाचं... शाळेच्या दुकानात पण मिळते" अण्णा वरमला... एका पोराला जवळ बोलवलं व विचारलं की केक नावचं चॉकलेट येतं का ते.. तो हो म्हणाला.. अण्णाने मला सोडलं ! तो वरमलेला पाहून मी विचारलं " तुम्हाला कोण म्हणालं की मी केक खल्ला ? " अण्णा माझ्या कडे बघत म्हणाला " कोणी नाही जा आपल्या हॉल वर.. चल." मी गुमान हॉलवर आलो... जे संगे आलो होते जत्रेला त्या सर्वाच्यावर संशय.

तो फुटिर निघाला म्हणून काय झालं त्याचा पण एक दोस्त फुटीर झाला व मला सुचना दिली की कोणी अण्णाला सांगितलं !

"गुंडगिरी करतोस, तुम्ही कोल्हापुरची पोरं, एक जात गुंड... ! का मारलंस त्याला ? " मी गप्प मान खाली घालून उभा... फुटीराने जशी मला बातमी दिली होती त्या नुसार त्याला मी धुतला होता... चांगल अंघोळीच्या विहीरी मध्ये धक्का दिला होता... " त्याचा जिव गेला असता तर ? तु काय केले असतेस ? " अण्णा आपल्या टिपीकल भाषेमध्ये आला होता... त्याचा राग त्याच्या थरथरण्यावर कळालाच होता... त्याने एका शिपायाला बोलवलं व म्हणाला " ह्याचं नाव लिहून घे. ह्याचा शाळेतून दाखला घेऊन ये. मी ऑफिस मधुन येथला दाखला घेऊन येतो. ह्याला पाठवा परत घरी कोणाचा तरी जीव घेईल हे कार्ट"

कुणाचा जिव घेण्याचा का प्लान नव्हता माझा व घरी परिक्षे शिवाय जाणे म्हणजे तेथे पण मार... ह्या दोन्ही गोष्टी मुळे मी रडू लागलो व अण्णाच्या पायात बसलो व पुन्हा चुक करणार नाही हाच एक घोष लावला ! काय झालं काय माहीत पण अण्णा वरमला..! त्यानंतर मी दोन महीने पुर्ण शांतते मध्ये काढले व शालेय परिक्षेचा निकाल हाती येऊ पर्यंत अण्णाच्या हाताला लागलो नाही, जेव्हा निकाल हाती आला... तेव्हा आई-बाबा येणार होते घेण्यासाठी... २ च्या बस ने मी.. सकाळी अण्णा कडे गेलो व अण्णाला म्हणालो " अण्णा... मी पास झालो. बाबा येणार आहेत मला घेऊन जाण्यासाठी." अण्णानी माझ्या केसातून हात फिरवला व म्हणाले " ठीक. घरी जास्त दंगा करु नकोस... जेव्हा मोठा होशिल तेव्हा मला येऊन नक्की भेट... मला माहीत आहे तु पुन्हा येणार नाही इकडे"

*******************
२००७
*******************

कित्येक वर्षानंतर मी बाहुबलि मध्ये गेलो होतो... तेच हॉस्टेल... तेच हॉल.. तीच शाळा...तेच भोजनालय... तेच मंदिर.... थोडे फार नवीन बांधकाम सोडले तर काहीच बदलले नव्हते... दोन चार पोरं समोरुन येताना दिसली.... पांढरा शर्ट... काळी चढ्डी ! टिपीकल बाहुबली शाळेचा ड्रेस. त्यांना विचारलं " शाळा चांगली आहे का रे ? " मुलं " हो " मी " हॉस्टेल? " पोरं काहीच बोलली नाही नुस्तेच हसलीत.... जसा मी हसत होतो त्याकाळी... मी " अण्णा अजून मारतो का रे ? " मुलं " अण्णा. नाही... पण अण्णा हॉस्टेल बघत नाहीत आता.. ते आपल्या रुम मध्येच असतात.. " त्यांनी नवीन अण्णाचे नाव सांगितले पण माझे लक्ष तिकडे नव्हतेच.. मी सरळ अण्णाच्या जुन्या रुम वर गेलो.... तीच टिपिकल रुम... काही ही बदल नाही.... पुस्तकांचे रॅक एका बाजुला... खॉट एका बाजुला... दोन लाकडी खुच्या... व एक छोटेखानी किचन. मी बेड वर पाहीले अण्णा आराम करत होते... मी आत गेलो व पाया जवळ बसलो, व अण्णा अजून पर्यंत तसाच ड्रेस घालत होते जसा मी बघीतला होता.. पांढरा सदरा व पांढरे धोतरं ! त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.... त्यांनी डोळे उघडले व म्हणाले " मी आपल्याला ओळखले नाही." मी म्हणालो " अण्णा, मी राज जैन... कोल्हापुरचा.. येथे होतो... १९** मध्ये... एकच वर्ष " डोक्याला जरा ताण देत म्हणाले " राजा, अप्पासोचा मुलगा. कपडे व्यापारी" ते मला विसरले नाहीत हे पाहू माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले , मी त्यांच्या पायावर हात ठेवत म्हणालो " हो, तोच, मी." खुप गप्पा मारल्या त्याच्या सोबत.... व जाताना शेवटी म्हणालो.... " अण्णा, एक सत्य सांगतो... त्यावेळी कुंभोज मध्ये मी केकच खाल्ला होता.. अडां केक. तुम्ही ज्या मुलाला बोलवले होते ना की केक नावाचं चॉकलेट आहे का नाही... विचारायला... तो निल होता... तो माझ्या साठी खोटं बोलला होता... " अण्णा हसत म्हणाले " तु जेव्हा जाण्यासाठी आला होतास ना माझ्या कडे... त्याच्या आधीच निल माझ्या कडे माफी मागून गेला होता... व खरं काय ते सांगून देखील. " मी त्याच्याकडे बघतच राहीलो.... अण्णा म्हणाले " आपला धर्म अहिंसा शिकवतो.. इतकी वर्ष झाली... कुठे ना कुठे तुला देखील अहिंसेचे महत्व कळालेच असेल नाही ! मग.. आम्ही हॉस्टेल मध्ये शाळेमध्ये हेच शिकवण्याचा प्रयत्न करतो.. बस पण तुम्ही मुलं ... तुझ्यासारखी वात्रट मुंल हा स्वर्ग सोडून पळुन जायला बघतात..."

मी त्यांना पुन्हा नमस्कार करुन बाहेर आलो व बाहुबली मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे वळलो.

समाप्त.

गुरुवार, २२ जानेवारी, २००९

दिल्ली ते दिल्ली ! भाग - २

ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली व माझा ग्लास भरुन दिला....

क्रमशः

पुढे चालू :

मी तिला विचारलं हा पुजा प्रकार रोजच चालतो का ? ति मानेनच हो म्हणाली.. व माझा अर्धा भरलेला ग्लास तीने परत फुल केला. ती काही उत्तर देणार नाही हे लक्ष्यात आले होते... पण मनाची उलाघाल काही कमी झाली नाही मी तर तीला विचारलं..." बार मध्ये अशी पुजा ? जरा विचित्र नाही वाटत> ?" ह्या वेळी ती माझ्या कडे बघून हसली व म्हणाली " पहली बार ही आए हो क्या ? पुजा तो हर बार में होती होगी, यह भी तो धंदा है... धंदा चालु करणे के पहलें जरा भगवान को याद किया तो क्या हुवा ?" मी ह्म्म्म म्हणालो व पुन्हा एक प्रश्न विचारला " पण हे देवाला चालतं का ? नाही ज्या हातानी तुम्ही दारु पाजता त्याच हाताने देवाला.. पुजा घालता ? " ती ने जर विचित्र नजरेनेच पाहीले व तीला माझ्या प्रश्नातील खोच समजली असावी... ती म्हणाली " उसी ने नसीब में लिखा है, जो लडका है ना... पुजा कर रहा था.. विनोद.. बहुत अच्छा गाता है... आपने अभी सुना ना.. पर कोई उसे फिल्म में गाने का मोका नही देगा.. पता है क्युं ... उस के नसीब में बार में ही गाना लिखा है | " मी मानडोलावली व पुन्हा विचारलं " तुम यहा क्या काम करते हो ? " ती उत्तरली व म्हणाली " सर्विस." तोच एक जवळ-जवळ ८० वर्षाचा म्हातारा आपल्या हातातील छडी टेकत माझ्या समोरच्या टेबलावर येऊन बसला व ती मला नजरेनेच बघ म्हणाली व त्याच्या जवळ गेली... त्याने काही ऑर्डर दिली.. ती त्याचा पॅग घेऊन आली... त्या म्हाताराच्या खांद्यावर हात ठेऊन ती तेथेच उभी राहीली... म्हातारा तीचा हात हातात घेऊन आपला पॅग पित बसला.. पाच मिनिटामध्येच तो आपले बिल व टिप देऊन लगालगा बाहेर निघून गेला... बिल तीने कॅशियर पाशी जमा केलं व जी आंन्टी होती तीच्या हातात टिप दिली.. आंन्टीने ती १००-१५० ची टिप कॅशियर कडुन सुट्टे करुन घेतले (दहा दहाच्या नोटा) व सर्व लेडीज मध्ये बरोबर वाटले.. व शेवटचे दहा रुपये... साईला वाहिले !

ती परत माझ्या टेबला जवळ आली व म्हणाली "देखा ! यह है पहली कमाई दिन की" मी तिला विचारलं " अजब आहे सगळं, पण तुला हे आवडतं करायला" ती म्हणाली " ह्म्म हो, कारण शॉर्ट मध्ये जास्त पैसा मिळतो, देखो ना अभी ५.३० हुवा है... ११.०० बजे तक फुल धंदा होता है... पगार छोड के पाच-सातसों हात में एक्ट्रा मिलता है... बदले में क्या सिर्फ दारु तो पिलानी है |" मी धन्य आहेस ह्या नजरेने तीला बघत पुन्हा आपला ग्लास उचलला... तीचा फोन आला म्हणून ती बाहेर निघून गेली.. !

मी बील मागवले व टिप ठेऊन बाहेर पडलो... डोक्यातून बारचा विचार जातच नव्हता..असे नाही की कधी बार मधे गेलो नाही पण हा अनुभव नवीन होता..... खुदा की कायनात के हजार रंग... ! त्या बार मध्येच कानावर पडलेले गाणे गुणगुणत मी पुन्हा निताच्या ऑफिस मध्ये आलो... साडेसात वाजलेच होते... थोड्या वेळात गाडी पण आलीच व मी आपल्या सिट वर जाऊन बसलो... !

सकाळी सहाच्या आसपास कोल्हापुरला गाडि पोहचली तेव्हा जाग आली आपली बॅग उचलत मी बाहेर येण्यासाठी निघालो तोच एक आंन्टी किंचाळली... मी दचकुन मागे बघितले तर ती आंन्टी माझ्याकडेच बघून दात खात होती.. मी चुकुन तीच्या पन्नास किलोच्या पायावर माझा छोटासा पाय दिला होता.. मी स्वारी स्वारी म्हणत कसा कसा जिव वाचवून गाडीतून खाली आलो व सरळ सैयाद्री वर जाउन रुम बुक करन्यासाठी वळलो तोच एक पोलिस वाला माझ्याकडे आला व म्हणाला" साहेब, बोलवत आहेत.." व समोर उभ्या असलेल्या पोलिस गाडी कडे बोट दाखवलं ! च्यामयला सकाळ सकाळी काय लचांड असा विचार करत साहेबापाशी पोहचलो तो म्हणाला " बॅग में क्या है ? " शक्यतो माझा अवतार बघून त्याला वेगळीच शंका आली असावी... मी म्हणालो " साहेब मी इथलाच आहे मराठी येतं, बाकी बॅगेत काहीच नाही कपडे आहेत्...बघनार असाल तर उघडतो" असे म्हणत मी आपल्या जॉकेटचे बाहे वर केले व बॅग उघडली... तो म्हणाला " राहु दे राहु दे, उत्तर भारतीय दिसताय ? " मी नवल वाटल्याचे चेह-यावर दाखवत म्हणालो " हो, दिल्लीचा तुम्हाला कसं कळालं" तो जरा गर्वातच म्हणाला " तु जो हातात लाल दोरा बांधला आहेस त्या त्यावरुन... मी पण बांधला आहे बघ.. हरिद्वारला गेलो होतो तेव्हा" मी हसलो व ठीक ठिक म्हणालो व त्यांना जाण्याची परवानगी मागितली " साहेब जाऊ का ? रुम वर जाउन आंघोळ करायची आहे व महालक्ष्मीला पण जाणे आहे" तो मानेनेच ठिक म्हणाला व मी आपली बँग सांभाळत हॉटेल मध्ये पोहचलो !

*******

दुस-या दिवशी घरी पोहचलो व झोपलं ( काय काय केलं १५ दिवस हे लिहणे योग्य वाटत नाही... उगाच क्रमशः का वाढवा :? हा उच्च विचार करुन मी सरळ जानेवारीच्या १७ तारखेवर येतो.

*******

१७ला धडपडत मी पुण्यात पोहचलो.. धडपड ह्यासाठी की मी चुकुन कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये बसलो होतो :) दुपारी आमच्या परम मित्र निलकांतला फोन करुन नेहमी प्रमाणे विसरलेला त्याचा पत्ता घेतला व त्याच्या घराकडे कुच केली. व्यवस्थीत डब्बल रिक्षा भाडे देऊन मी त्याच्या घरी पोहचलो पण निलकांत घरी पोहचलाच नव्हता त्यामुळे टाईम पास साठी त्याचा लॅपटॉप उघडून बसलो दहा मिनिटात येतोच असे सांगणारा मित्र बरोबर अडीच तासाने पोहचला :) त्यानंतर आम्ही एका गुप्त मिटींग साठी एका गुप्त जागी गेलो ( गुप्त ह्यासाठी की मला नाव आठवत नाही आहे आता :( )
पुर्ण मिटिंग संपु पर्यंत फायर ब्रीगेडला बोलवावे लागेल एवढा धुर आम्ही सोडला, तेव्हा बाकी समाजमनाची काळजी घेत आम्ही बाहेर आलो ( आम्ही म्हणजे बाकीचांनी नावे गुप्त ठेवावी की नाही ह्याची कल्पना दिली नाही आहे त्यामुळे मी धम्याचं, आद्याचं व इनो'बाचे नाव घेत नाही आहे) मी व निलकांत मंडळी बाहेर आलो तो छोटे खानी कट्टा संपवला. फोटो प्रयोजन झाले नाही समक्ष्व.

दुस-या दिवशी सकाळी निलकांत द्वारे देवाचा (प्रभु) नंबर भेटला व फालतु काही न बोलता ठाणेला येणे एवढाच आदेश देऊन देव गायब झाले ;) दोन तासात सांगा ही गुप्त सुचना आमच्या कानावर आलीच होती, निलकांतला तयार करुन ( बिझी असतो बेचारा, नेहमी काही ना काही तरीच काम करत असतो) येतो म्हणुन आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.


क्रमशः

दिल्ली ते दिल्ली !

१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत.. मावस बहीणीचा पत्ता घेतला नाही आहेस.. तीचा फोन नंबर पण मेल मध्ये... धन्य आहेस... आता मुंबैला रात्र हॉटेल मध्येच काढ.. अशी अनेक मुक्ताफळे स्वतःवर उधळून झाल्यावर मी जरा स्थीर स्थावर होऊन इकडे तिकडे पाहीले तर समोरच्याच बर्थ वर एक २५-३० वर्षाची आंन्टी बसलेली दिसली.. मी एक स्माईल दिल्यावर ती नाक मुरडुन आपले डोके पुस्तकात घालून बसली ती बसलीच ! च्यामायला म्हणालो हे झेंगाट चांगले आहे .... टीपी होईल असा विचार केला तर ही बया... नाक मुरडत आहे... आता उद्या सकाळ पर्यंत काय करायचं हा डोक्याला शॉट.. ट्रेन मध्ये झोपणे हा आमचा स्वभावच नाही त्यामुळे गडबड होते ... तास भर मोबाईलचा जिव खल्ला व मेलो मेलो म्हणत जेव्हा तो स्वतःच बंद झाला तेव्हा विचार करु लागलो की आता काय करावे ? आपली बर्थ सोडून सरळ आजू बाजूच्या डब्ब्यामध्ये काय काय चालू आहे... कोण कोण महारथी बसले आहेत पहावे म्हणून पायात चपला अडकवुन निघालो, दोन तीन बर्थ सोडल्यावर एका आजी बरोबर दोन चिमुकली पोरं बसलेली दिसली... त्यांना हाय केलं व सरळ तेथे बसलो ! थोडा टिपी केला तोच टिकीट चेकर आला टिकीटे दाखवली व त्याच्या बरोबरच फिरत फिरत सेकंड क्लास मधुन थर्ड क्लास मध्ये पोहचलो... अर्धा एक तासाने तो पण मोकळा व मी पण... मी हाय हल्लॉ केलं व थोडा टिपी त्याच्याशी केला जेवणाची वेळ झाली होती... जेवण केले व परत आपल्या बर्थ वर येऊन आडवा झालो, तो पर्यंत ती आंन्टी पुस्तकातून बाजूला झालीच होती... मी तीला पुन्हा स्माईल देऊन विचारलं " मुंबई ? " ती ने त्रासीक मुद्रेतून नुस्तेच मान डोलाऊन उत्तर दिले व गप्प बसली.. मी म्हणालो.. च्यामायला दोन शब्द तोंडातून बाहेर काढायला हा कसला चेंगुस पणा... छे !

हा प्रवास असाच निरस पणे पार पडला व मी धड्पणे दादर ला पोहचलो ! एका नेट वर जाऊन... मेल मधुन मावस बहीणीचा पत्ता शोधला व त्यांना आधी फोन केला तेव्हा कळाले ते पण सुट्टी साठी घरी गेले ( बेळगावला) मी म्हणालो झालं सुट्ट्लो !

निता मध्ये जाऊन एक कोल्हापुर आधी बुक केलं ! त्याच्या कडे सामानची बॅक भिरकावली व म्हणालो आलोच मुंबई दर्शन करुन येतो ८ला संध्याकाळी तो पर्यंत बँग संभाळा. तो हो म्हणायची देखील वाट पाहीली नाही सरळ कॅब केली व सिध्दी विनायकला गेलो दर्शन घेऊन समुद्र किनारा पाहत... हिरवळीचा थोडा अस्वाद घेत मज्जा करु म्हणून चोपाटीवर गेलो तर छे.. कोणीच नव्हते.. दोनचार म्हातारी कोतारी सोडली तर... म्हणून... सरळ परत गेट वे ऑफ ईडिया जवळ आलो व तेथे २६/११ च्या काही खुणा दिसतात ते का पाहीले पण ताज ची रंगरंगोटी करुन पुर्ण चकाचक केले होते ते पाहून समाधान वाटले व तास एक भर समुद्र, बोटी व पाखरे पाहत घालवले... काही पाखरांना चारा देण्याचा प्रयत्न केला पण ती पाखरं आपले आपले झेंगाट बरोबर घेऊनच आले होते त्यामुळे जरा निराशा पदरी (खिश्यात) पडली.

पाचच्या आसपास दहिसरला पोहचलो व एकाला म्हणालो भाइ इकड टाइमपास काठी काय आहे का ? .. तो मला म्हणाला.. क्या साब, यही सामने तो है... असे म्हणून "स्वागत" बार कडे बोट दाखवले जे समोरच होते.... ! मी अरे वा खुशी खुशी मध्ये हसत म्हणालो.. क्या बात है... मुल्ला आखं बंद करे तो भी मसजीद के सामनेच"

पण च्या आयला संध्या काळी पाचच्या आसपास बार बंद होता... मी त्या गेट किपर जवळ गेलो व त्याला काही अडजेस्टमेंट विचारली तो माझ्या थोबाडाकडे बघत आत गेला व दोन मिनिटाने आला व म्हणाला "अंदर जाओ" मी लगेच आत पोहचलो तर आतील दृष्य पाहून दचकलोच... मुंबई मध्ये बार मध्ये मी अनेकदा गेलो होतो पण दहिसर बाजूला कधीच नाही व एकटाच तर जिवनामध्ये कधीच नाही पण हा स्वागत बार एकदम अजबच वाटला मला !

५०० स्केअर फुटामध्ये बार.. टेबल्स व खुर्च्या... व १० बाय १० च्या जागेत एक स्टेज.. स्टेजला लागुनच बेजों चे साहित्य... बाजुला तीन चार खुर्च्या ओळीने.. त्या च्या डाव्याबाजुला कॅश देवाण्-घेवाण टेबल... व त्याच्या परत डाव्या बाजुला... छोटासा बोळ..वजा रुम व आत स्टोर रुम ! इनमीन १० टेबलं व प्रत्येक टेबलासाठी चार खुर्च्या... ! पण साफ सफाई चांगली दिसत होती.. ! आत गेल्या गेल्या उजव्या बाजुला एका कोप-यात एक ५० च्या आसपासचा मानव बसला होता.. समोर एक ग्लास... व चकणा... ! मी मनातून जरा समाधान व्यक्त केले की चला एकटाच नाही आहे... ! एक अंधारातील टेबल बघून ते काबीज केले व ऑर्डर घेण्यासाठी कोणी येईल का हे पाहू लागलो तोच... एक २७-२८ च्या आसपासची तरुण मुलगी.. पांढ-या रंगाची साडी, पांढरी टिकली... पांढ-या बांगड्या..... " बाइ बाई माझा आज रंग पांढरा.." असे काही गुणगुणते की काय असे मनाला वाटुन गेलं पण नाही ती सरळ माझ्या टेबल जवळ आली व म्हणाली "क्या आज बहोत जल्ल्दी ? " मी जरा दचकलोच मी कधी येथे रोज येतो यार.. मी तिला म्हणालो " नाही हो बाई, मी आज पहील्यांदा आलो आहे येथे..." तीने माझ्या कडे वरुन खाली पर्यंत व्यवस्थीत पाहीले व टिशर्ट - जिन्सची पॅन्ट व स्पोर्टशुज बघुन तिला मी एखादा कॉलेज कुमार वाटलो असावा म्हणून तीने अंदाजपंच्चे गोळी झाडली होती की इकडे कुठे म्हनून.. तीने ऑर्डर घेतली आपली नेहमीचीच फॉस्टर पण मुंबैला आल्यावर ब्रन्ड चेंज रॉयल चेंलेंज ! ती एक बाटली आणली व केला ग्लासामध्ये ती भरुन झाल्या हाती देऊन तीथेच उभी राहीली, आता ही का उभी ... म्हनून मी तीला प्रश्नार्थक नजरेने विचारण्याचा केवलवाणा प्रयत्न केला पण ही डिम्म... ! शेवटी मीच तिला हातानेच बाजूच्या खुर्चीवर तर बस म्हणालो .. तर म्हणते कशी " नही नही, यही मेरी डुटी है " च्यामायला म्हणजे बीयर संपे पर्यंत ही बया डोक्यावरच उभी राहणार तर... ! लवकरात लवकर बीयर संपवावी व येथून पळावे हा विचार डोक्यात उडु लागला तोच दरवाजा उघडला व एका मागोमाग एक अशा सात -आठ जणी आत आल्या व त्यातील चार्-पाच माझ्या टेबलाकडे आल्या... मी धास्तावून... हातातला ग्लास रिचवला तोच त्या आलेल्या जणीं माझ्या बाजुला जी उभी होती तिला बाजुला घेऊन गेल्या व कुजबुजु लागल्या.. मी हुश्य केलं व निवांत पै़की आपली बियर ग्लास मध्ये ओतली... !

थोड्यावेळातच मला लक्ष्यात आलं होतं की आपण चुकुन लेडीज बार मध्ये आलो आहोत... व येथे लेडीज वेटर सिस्टम आहे... व तो स्टेज व बेंजो का आहे तेथे ह्याची ही कल्पना आलीच. थोड्या वेळाने अजुन चार बाया आल्या वर स्टेजवर ठेवलेल्या खुर्ची वर जाऊन बसल्या... त्यांच्या मागोमाग.. बंजोवादक व २५-३० वर्षाची दोन तरुण मुलं पण आली.. ! थोडा वेळ त्यांनी बंजो बरोबर काही चाळे केले व बेंजो वादकांच्या बॉस ने ओके म्हणून हात वर केला त्याच बरोबर... सगळ्याजणी आपापल्या चपला काढून... दोन्ही कर जोडून उभ्या राहील्या व एक मुलगा हातामध्ये आरती घेऊन स्टेजच्या समोर असलेला पडदा दुर सारत उभा राहीला.. पडद्या मागे साईबांबाची एक चांगलीच मोठी मुर्ती व बाजुला गणपती बप्पा बसलेले ! च्यामायला हे काय नवीन लचांड हा... डोक्यात विचार सुरु होऊ पर्यंत गजाननाची आरती चालू झाली... छे च्यामायला हातात ग्लास .. पोटात बियर व समोर गजाननाची आरती..ची सुरवात... झटपट ग्लास खाली ठेवला... समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास रिचवला व शुज काढुन उभा राहीलो... ! सुखकर्ता दुखःहर्ता.. किती तरी गोड आवाजामध्ये तो युवक आरती म्हणत होता... व बाकीचे फक्त सपोर्टसाठी टाळ्या वाजवत होते... व ठेका धरत होते... काही क्षणातच माझे ही हात ठेका धरु लागले व सुख कर्ता संपल्या संपल्या काही क्षणामध्येच ... शिरडी वाले साई बाबा.. आया है ते रे.. दर पे.... हे सह वाद्य - व सह गायनात चालू झाले... वाह क्या... बात थी... कोणी काही ही म्हणो पण एका मंदिरापेक्षा जास्त सुंदर पध्दतीने ते गाणे मी एकले व त्याच रंगात रंगुन गेलो..! प्रार्थाना संपली तरी ही मी काही क्षण बेसावध अवस्थेतच होतो.... तो तरुण मुलगा माझ्या समोर कधी... पुजेची थाळी घेऊन आला कळालेच नाही.. मी दिपावरुन हात फिरवत.. डोक्याला लावला व खाली खुर्चीवर बसलो... व ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली व माझा ग्लास भरुन दिला....

क्रमशः