मंगळवार, ११ मे, २०१०

स्पर्श ...

तुझे केस..तुझे ते गाल..
स्पर्शाने मोहरुन जाणे तुझे
वेडावलेला भारावलेला मी
डोळ्यांची हालचाल थोडी वेगळी
मनात हुरहुर वेगळी
स्पर्श तनाचा तो क्षणिक
होठांची थरथर मीठीत धुंद
शब्दांपेक्षा जास्त बोलले डोळे
मिठीत सुखावले दुखः सारे
माया ही क्षणीक
क्षणीक नाते स्पर्शाचे
तुझ्या व माझ्या मनाचे
नाते हे जन्मजन्मातरीचे

सोमवार, १० मे, २०१०

सय.....

असेच काहीतरी आठवले म्हणून.....

खुप दिवसानंतर फेसबुक लॉगईन केले, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं म्हणून बसून पुन्हा पुन्हा सगळे चेक केले, सर्व काही जसेच्या तसेच होते २-३ नवीन मित्र झाले होते, माझा वॉल मित्रांच्या मॅसेजने भरुन वाहत होता, पण नक्कीच कुठेतरी काहीतरी हरवले होते म्हणून परत एकदा चेक केले तर एक नाव मिसिंग निघाले. काहीच वाटले नाही, अपेक्षित नव्हते पण धक्कादायक ही नक्कीच नव्हते. मनात आले एकदा जीमेल तरी चेक करु, माहीत आहे एखादा फॉरवर्ड मेल, एखादी अ‍ॅड मेल व इतर फालतू मेल हे सोडून त्या आयडीवर काहीच येत नाही तरी न चुकता दररोज चेक करतोच. का ? माहीत नाही, बोटांना सवय झाली आहे शक्यतो. पण,

काही क्षण काहीच वाटले नाही, जवळ जवळ सगळे मेल डिलिट केले व ज्या निर्विकार मनाने लॉगईन केले होते त्याच निर्विकार मनाने लॉग ऑफ केले. मन निर्विकार होते, एकदम शांत जसे दुरवर परसरलेले वाळवंट. दुरदुर पर्यंत कसलीच छाया नाही ना कसला गोंधळ, सर्वकाही शांत. एक अनामिक चिर शांतेतेच हुडपलेल्या त्या वाळवंटासारखे माझे मन देखील असेच शांत होते.

एखादा चलचित्रपट समोर चालत असावा व आपण फक्त दर्शक होऊन त्याच्याकडे पहात रहावे व समोर झरझर गोष्टी घडत रहाव्या व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा हदयाने. एवढेच काहीतरी चालू होते बाकी सगळे शांत, त्या काही काळ आधी असलेल्या निरभ्र आकाशासारखे.


तुच तुच तुच... आठवतात त्या ओळी अजून मला, कित्येक दिवस समजवले होते की नको वेड्या पाऊसाच्या मागे लागू, पण नाही तुला समजवण्यात अर्थच नव्हता, तुझ्याबरोबर वाहत वाहत कुठवर आलो बघ ना, ना पुढे कोणी आपले ना मागे कोणी, फक्त एक अशांत अशी शांतता जशी वाळवंटात असते, एकदम अबोल, पण आत प्रचंड उलाघाल चालू असते तशीच. नको नको म्हणत असताना देखील सर्वकाही दिलेस मला. कधीकाळी हसणे विसरुन गेलो होतो व ध्येय नावाची कुठलीतरी भावना असते हे देखील. पण तुझ्या अस्तित्वामुळे कुठेतरी भरकटलेला हा जीव, मार्गस्थ झाला, जिवनाला नवीन दिशा मिळाली म्हणूपर्यंत काळरात्र आली व होत्याचे नव्हते झाले. माझ्यावरच अशी का वेळ येते प्रत्येक वेळी असा विचार करत बसलो, शुन्यासारखा.

किती वेळ, कुठे, का ? असले प्रश्न आमच्या सारख्या मुर्खांना कधीच पडत नाहीत. तळपता सुर्य असो व वेड्या सारखा कोसळणारा पाऊस अथवा रम्य चांदणी रात्र, सगळेच सारखे. मग ते रखरखते उंन्ह व तेवढ्याच त्वेषाने कोसळणारा तो पाऊस दोन्ही सारखेच. त्या समोर असलेल्या सरोवरासारखे आम्ही एकदम तटस्थ. भावनाच मेल्या तेथे बाकीच्या गोष्टींची काय तमा ? होते असे कधी कधी. प्रेमाने जवळ घेतलेले व आपल्या हदयाजवळ ठेवलेल्या फुलाचे काटे आपलेच हात करतात कधी कधी रक्तबंबाळ. चालायचेच जगाचा नियम.

उभ्या असलेल्या बाईकला किक मारणे व रस्ता दिसेल तसे हवे सारखे भरकटणे. वाटलेच थांबावे तर थांबायचे, बाईक कडेला उभी करुन कधी डोंगरमाथ्यावर तर कधी एखाद्या तळाच्या समोर वेड्यासारखं शुन्यात बघत उभे राहायचे व एखादी वेडी झुळूक आतपर्यंत स्पर्श करुन गेली तर भानावर आल्या सारखं इकडे तिकडे पाहायचे व कळत नकळत डोळ्याचा ओल्या कडा पुसत स्वतःशीच हसायचे, ते देखील चोरुन, मनमोकळेपणाने हसून देखील खुप दिवस झाले. किती दिवस झाले ह्याचा हिशोब पण नाही, व त्याची काळजीपण नाही.


एकदम संधीप्रकाशासारखी तु गायब झालीस.. आहेस आहेस म्हणूपर्यंत गायब. का कुठे, कशी ? काही माहीत नाही, छोटी मोठी वादळे आली होती पण ती वादळे तुला असे नजरेआड करतील असे मला आज ही वाट नाही. कारण नक्कीच काहीतरी वेगळे असेल अशी भाबडी आशा मनास होती. पण काही दिवसांनी ती पण चकनाचूर झाली, तु समोर येतेस पण एक ही शब्द न बोलता निघून जातेस, बाकी जगाशी बोलतेस, हसतेस पण मी ? तुझ्या त्या विश्वात कुठेच नाही ? तुझी वाट पाहत डोळ्यांना कधी स्वप्नांची सवय लागली तेच कळाले नाही, तुला आठवत असेल मी म्हणत असे तुला मला स्वप्ने कधीच येत नाहीत, माझे डोळे स्वप्न पाहूच शकत नाहीत.. ते पण बेचारे आता थकले म्हणून आजकाल मला स्वप्नात ही तुच दिसतेस. तुझ्या असतील नसतील त्या खाणाखुणा मी पुसून टाकल्या माझ्या जिवनातून पण हदयातून अजून तुला काढणे जमलेच नाही.

काळ रात्री येतात जातात माणसे बदलतात, मित्र बदलतात रात्री गणिक नाती बदलतात, पण तुझे व माझे नाते देखील बदलेल असे खरोखर कधीच वाटले नव्हते. दुखः कश्याचे करावे तेच कळत नाही म्हणून माझी जास्त ओढताण होत असावी, तु अचानक न सांगता गायब झालीस ह्याचे ? मी कुठे चुकलो हेच कळाले नाही ह्याचे ? की जे नियतीत होते ते अचानक नकळत घडले त्याचे ? तुटका फुटका ग्लास देखील चालत नाही लोकांना वापरायला तेथे जिवंत माणसाची कथा काय ! व जर हेच कारण असेल तर जा केले माफ तुला. वादळासारखी आलीस जिवनामध्ये व वादळासारखी गेलीस ही. काय बोलावे ? वादळे कधी कोणाचे भले करत नाहीत असा समज होता तो तुझ्यामुळे काहीकाळ तरी खोट ठरला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे मात्र नक्कीच समजले. कुवती बाहेर कधीच उडी मारु नये ही एक खुणगाठ बांधली गेली तुझ्यामुळे, भले किती ही समोरील देखावा तुम्हाला भुरळ पाडत असला तरी.

काय आहे माहीत आहे का, रणरणत्या उन्हामध्ये अचानक पावसाचा शिडकाव झाला व तो सुगंधीत मृदगंध सर्वत्र पसरला तर पाऊस सर्वांनाच हवा हवासा वाटतो, त्याच्या बरोबर आपण ही मनसोक्त भिजावे अशी आशा पल्वित होऊ लागते पण तोच जर पाऊस वेड्या सारखा कोसळू लागला व सर्वत्र चिखल व पाण्याचे साम्राज्य उभे करु पाहू लागला की लगेच त्याचा तिटकारा येतो.. किळसवाणा वाटतो, नकोसा होतो. होतं असे कधी कधी पण हेच सत्य आहे.

तरी ही, काही नावे माझ्या बरोबर जिवनभर माझ्या श्वासाबरोबर माझ्यासोबतीला असतील त्यातीलच एक तुझे देखील असेल, कृष्णाने म्हणे द्वारकेमध्ये सोपान बांधले होते त्याच्या जिवनात प्रत्येक्ष अप्रत्येक्षपणे त्याला घडवण्यात ज्याचा ज्याचा हात होता त्यांच्या नावाने. त्यात राधा ही होती व त्यात रुक्मणी देखील तसेच जरासंध देखील व तसाच कंस देखील. माहीत नाही स्वतःची कधी वीट देखील असेल की नाही ते पण माझ्या मनात एक सोपान तयार नक्कीच आहे त्यामध्ये एका पायरीवर तुझे नाव एखाद्या माझ्या आवडत्या फुलासारखं अढळ आहे.

दिवा मिणमिणतो आहे ह्याचा अर्थ तो विझला असा नाही, कधीतरी पुन्हा तेजाने झळाळू लागेल अथवा एकदम त्वेषाने जळून काही क्षणामध्ये बंद देखील होईल पण त्याचे अस्तित्व संपेल असे नाही, कुठे तरी तुझ्या मनामध्ये नक्कीच जळत राहील व तु त्याला कधी विझवू शकणार नाहीस व कधी विसरुपण.. तेवढे खरं प्रेम मी तुझ्यावर नक्कीच केले आहे. तुझा स्वभाव मला माहीत आहे, तु कधीच मागे वळून पाहणार नाहीस हे देखील तरी ही कुठेतरी असाच जिवनाच्या एखाद्या वळणावर भेटलोच तर, तुझे ते हास्य परत पहावयास मिळो हीच प्रार्थना त्या ईश्वराचरणी ज्याच्या इच्छेमुळे हे सगळे घडत गेले.

कधी तरी असेच आठवले म्हणून... हे वेड्यागत लिहीत गेलो... हे तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहीत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाला पुन्हा साद घालेल की नाही ते ही माहीत नाही, पण असे वेडे मेघ जागा बघून बरसतात का गं ? कुठेतरी हदयात कळ आली म्हणून हे शब्द उमटत गेले, अर्थ वेगळे संदर्भ वेगळे, तु वेगळी व ही कहानी वेगळी तरी कुठेतरी तुला स्पर्श करेल सुदुरवर पसरलेल्या त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबला मी केलेला स्पर्श, तुझ्या स्पर्शाला आसुसलेल्याप्रमाणे असाच अशांत वाहत राहील... ह्या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर.. तुझा स्पर्श झालाच तर वेड्यासारखा बरसेल माझ्या आश्रुतुन नाहीतर त्या वेड्या मेघातून व असाच एखाद दिवशी मुक्त होईल... कुणाच्या ही नकळत लाखो अरब थेंबाप्रमाणे....



( काल्पनीक : - नेहमी प्रमाणेच एक कशीच कथा, सुचली म्हणून लिहीत गेलो व पुर्ण झाली, कुठल्या ही जिवित व्यक्तीशी / कथेशी साम्य आढळले तर तो निवळ योगायोग समजावा. वादळामध्ये चिरतारुण्य लाभलेल्या आवेशामध्ये उभं असलेलं मनमोहक वट वृक्ष देखील मुळापासून उन्मळून पडतो तेथे सर्व सामान्याची काय गत, अश्याच एका उन्मळून पडलेल्या पण स्वतःची मुळे जपून असलेल्या, नवीन पालवी फुटण्याची वाट पाहत असलेल्या प्रेमीचे हे आत्मकथन. वेगवेगळ्या भावनिक कोल्होळातून जाताना त्याच्या मनाची अवस्था काय असू शकते हे जाणुन घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. )

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

होते असे कधी कधी !!!

होते असे कधी कधी
स्पर्शातून देखील बोल व्यक्त होतात
हात हतात धरुन देखील
कळत नकळत प्रेम व्यक्त होते..
शब्दांची गरज नसते कधी कधी
नकळत नजर बोलून जाते

होते असे कधी कधी..
मीठीत तुझ्या विरघळून जातो मी
जसे नभ विरघळावे बरसल्यावर आकाशी..
घुसमटलेल्या मातीतून जसा
वेडा मृदगंध पसरावा
अंग अंग शहारुन यावे
जसा तुझा स्पर्श जाणवावा

होते असे कधी कधी...
बंध सारे तुटूनी वाहते पाणी
ह्या धारेतून त्या धारेतून
जसा धरबंध नसावा कुठला
शब्दांना कुठलाच अर्थ नसावा

होते असे कधी कधी
नियम तुटतात तर कधी
शब्द मोकाट सुटतात
शब्दांना जे जमले नाही ते
स्पर्श व्यक्त करुन जातात..
डोळ्यांची भाषा डोळ्यास कळून जाते
होते असे कधी कधी....

रविवार, १८ एप्रिल, २०१०

शनिवार, १७ एप्रिल, २०१०

बंगलौर में स्टेडियम के बाहर धमाका

ख़बर आ रही है कि बंगलौर में चिन्नास्वामी स्टेडियम के बाहर बम धमाका हुआ है. यहाँ मुंबई इंडियंस और रॉयल चैलेंजर्स बंगलौर के बीच मैच होना है.


BBC NEWS

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

.........

स्वतःवर हसतो मी कधी कधी
वेडा होऊन खिडकीतून
बाहेर डोकावतो मी
स्वप्नवत जगातून बाहेर
पडण्याचा प्रयत्न करतो मी
पण दलदलीत
फसलेल्या जीवाप्रमाणे
जेवढा प्रयत्न करतो
तेवढाच तुझ्या आठवणीत
पुन्हा पुन्हा धसतो मी

रविवार, ११ एप्रिल, २०१०

प्रवास !

तु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो ? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड... एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे " ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे ". मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.

कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.

धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब ! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.

हर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार ?

तयारी ? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस !



क्रमशः