गुरुवार, ५ जून, २००८

मी कोठे तरी हरवलो आहे...

दोन चार दिवस बोटे दुखावल्यामुळे शांत होतो [काहीच काम नव्ह्ते करण्यासारखे] तेव्हा बसून लहानपण / तारुण्यात पाय ठेवला ते वर्ष / जुने दोस्त / गाव / शेत हे सगळेव विषय डोक्यात एकदम घुमत होते... जे त्या वेळी केले ते आज करने शक्य देखील नाही... [जा पाहू कोणाच्या ही शेताचे पाट वेडे वाकडे करा कळेल, अथवा कोणाच्याही बंद दुकानावर अजून एक कुलूप चढवा रात्रीच्या रात्रीच.... जास्तच वेळ असेल व ताकत असेल जर मार खाण्याची तर पोलिसांच्या सर्व गाडीची हवा काढून दाखवा आजच्या घडिला... मग कळेल बालपण काय असते व तो काळ काय मस्त असतो]
पण तो काळच जबरदस्त.. होता..
आईच्या प्रेमावर कधी कधी बहीणीचे प्रेम देखील भारी पडायचे.. मार पडायच्या आधीच ताई मला बाहेर पाठवायची... तर बाबांचा मार पडणार असे लक्षण दिसताच अक्का माझ्या अभ्यासाची पिशवी व स्वतःचा गृहपाठ घेऊन बसायची... अक्काने मागीतले म्हणून जवळच्या आंबा.. चिंचा च्या बागेतून अंबे व चिंचा गोळा करुन तीच्या हाती द्यायचे व तीला च्या चेह-यावर एक अनामिक खुषी पाहत राहावे असे ते दिवस.. तीला माहीत असायचे अथवा माहीत होत असे की सगळे अंबे - चिंचा आंबट आहेत पण फक्त माझे मन राखा वे म्हणुन .. तीने लपवून बाजारातून अथवा आईने आणलेल्या चिंचा -अंबे मला द्यावयाची. ..शाळेत कधी अभ्यास पुर्ण न केल्या बद्द्ल तर कधी खोड्या केल्या बद्द्ल पडलेला मार रावलगाम च्या अथवा कुठल्याश्या तरी चॉकलेटीसाठी घरी न सांगणारी माझी शेजारीण... एक एक नमुने होते पण आज काल मी नमुना बनलो आहे... चॉकलेट तर रोजची बाब.. कच्चा अंबा.. चिंचा खाऊन देखील वर्षे उलटली आहेत.. खरंच मी हरवलो आहे... कधी पतंगासाठी जीव तोडून धावणारा मी.. आज जवळ एक साधा धागा देखील नाही.. पापाची टिकटी वर पतंगाच्या चार आण्या साठी मारामारी करणारा मी... आज पैसे देताना हे ही पाहत नाही की नोट कुठली आहे... समरोच्याने पैसे बरोबर परत दिले अथवा नाही.... खरोखर असे मला वाटत आहे मी हरवलो आहे... ... कधी कधी गरज म्हणून आई कडे चार पैसे मागताना केलेला आगतिक / निरागस / बेरकी / रडका चेहरा आठवला तर आज च्या जगण्याचे देखील अप्रुप वाटते... हजारोची उधारी मागण्यासाठी देखील वेळ नसलेला मी... कधी काळी सकाळ माझी राम मंदिराच्या आरतीने सुरु होत होती तर आता..कुठे ए.आर. रहमान च्या कुठल्याश्या गाण्याने तर कुठल्यातरी अनामिक गायकाच्या ओरडण्याने .... कधी काळी मित्रांच्या संगतीने दिवस सोडा महिने महिने कसे निघून गेले हेच कळायचे नाही...आज कामाच्या नादात वर्षांनू वर्ष कसे निघून गेले ह्याचा प्रत्येक क्षणाचा हिशोब आहे...कधी काळी मनसोक्त [कोल्हापुरी] शिव्या देत रस्तावरुन फिरुन झाले.... पण आज नेहमीचे बोलताना, कामाचे बोलताना देखील खोटा खोटा हसरा मुखवटा चेह-यावर ठेवा लागतो.... कधी नदी मध्ये तर कधी रंकाळ्यावर पोहताना ना पाण्याचा विचार केला न कधी वेळेचा पण आज आंघोळ करताना देखील वेळ व पाण्याचे बिल ह्याचा विचार करावा लागतो... कधी कट्यावर तर कधी गल्ली बोळात फिरताना मनात आले ते गाणे जोर जोरात ... भसड्या आवाजात गायले... पण आज स्वतः च्या घरामध्ये देखील गाताना भिती वाटते... लोक काय म्हणतील.... कधी असेच मित्रा बरोबर... पन्हाळा तर कधी जोतीबा...येथे कुलू मनाली अथवा जम्मू पटणीटोप वर जी सर येणार नाही ती तेथे येत असे, पण तेथे अंबा घाट पायी पालता घातला होता पण आज चार जिने चढावे लागलेच तर सर्वात प्रथम लिफ्टवाल्याला तर नंतर ईमारतीच्या मालकाला पन्नास शिव्या देत [मनातल्यामनात] चढतो... मित्राला भेटायचे आहे म्हणून कधी काळी.. बुधवार पेठ ते कळंबा सायकली वरुन फे-या मारल्या पण आज मोटर सायकली ला मायाने एक क्कीक मारण्याचा देखील दम नाही..आज पिताना देखील एक एक करुन मोजून पितो तर कधी तो काळ देखील होता... मित्राच्या भरोश्यावर बाटलीच्या बाटली गटवल्या होत्या... कधी तो काळ होता... एक हसली म्हणून महिनो महिने तीच्या घराच्या चकरा मारल्या व आज काळ आहे बाहेर साबण विकण्यासाठी आलेली युवती देखील हसत बोलते पण आमच्या चेह-यावर झक मारली व दरवाजा उघडला असे लिहले असते... काय करणार आम्ही पडलो सामान्य... पण दुनिये ने आम्हाला असामान्य बनवून ठेवले आहे.. कोणाला काय तर कोणाला काय... सर्वांनाच काहीना काही तरी विकायचे आहे.... पण मला स्वतःला एकदाच पुन्हा बघायचे आहे.. कसे समजवणार कोणाला.. माझ्यातला मी हरवला आहे...कधी खोड्या केल्या म्हणून तर कधी आळस केला म्हणून .... तर जरा वयात आल्यावर वाह्यातपणा केला म्हणून मार खाल्ला पण आज तसे दिलखोल मारणारे बाबा राहिले नाही ना तो मी खोडकर जैनाचे पोरं राहिलो नाही ह्याचेच दुखः जास्त आहे.... म्हणून म्हणतो आहे मी कोठे तरी हरवलो आहे...
राजे